‘आयएस’चे हजारो दहशतवादी सिरियातून लिबियात घुसले – जॉर्डनचे राजे अब्दुल्लाह यांचा इशारा

अम्मान, दि. १५ (वृत्तसंस्था) – ‘‘सिरियातील ‘आयएस’ दहशतवाद्यांचा प्रभाव कमी झालेला नाही, तर तो अधिक वाढला आहे. कारण हजारोंच्या संख्येने असणार्‍या या दहशतवाद्यांची सिरियातून लिबियात तस्करी करण्यात आली आहे. लिबियातील या दहशतवाद्यांची उपस्थिती हा युरोपिय देशांसाठी सर्वात मोठा धोका ठरतो’’, असा इशारा जॉर्डनचे राजे अब्दुल्लाह यांनी दिला. फ्रान्सच्या आघाडीच्या वृत्तवाहिनशी बोलताना राजे अब्दुल्लाह यांनी ही माहिती दिली. ‘आयएस’च्या या उद्गमनामुळे धोका असलेल्या सर्वच देशांनी यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे आवाहनही जॉर्डनच्या राजांनी केले.

     

या आठवड्याच्या अखेरीस युरोपिय नेते लिबियातील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी ब्रुसल्स येथे एकत्र येणार आहेत. जॉर्डनचे राजे अब्दुल्लाह देखील या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर, फ्रान्सच्या वृत्तवाहिनीशी बोलताना राजे अब्दुल्लाह यांनी लिबिया तसेच पर्यायाने युरोपिय देशांसमोर उभे ठाकलेल्या ‘आयएस’च्या धोक्याची जाणीव करून दिली.

‘‘गेल्या वर्षभरात ‘आयएस’च्या दहशतवाद्यांनी इराक आणि सिरियाच्या सीमाभागात आपला प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढविला आहे. या दहशतवाद्यांपासून आखाती देशांबरोबर युरोपिय देशांना देखील धोका निर्माण झाला आहे. कारण सिरियाच्या इदलिबमधील या हजारो दहशतवाद्यांना उत्तर सिरियामार्गे जहाजात भरुन लिबियात उतरविले जात आहे. ‘आयएस’चे दहशतवादी यूरोपच्या अधिक जवळ आले आहेत’’, असा इशारा राजे अब्दुल्लाह यांनी दिला.

‘आयएस’च्या दहशतवाद्यांची सिरियातून लिबियात कुणाच्या सहाय्याने तस्करी केली जाते, याबाबत राजे अब्दुल्लाह यांनी माहिती दिली नाही. पण याआधी सिरिया तसेच लिबियातील बंडखोर लष्करप्रमुख जनरल खलिफा हफ्तार यांनी ‘आयएस’ व तुर्कीमध्ये सलोखा असल्याच आरोप केला होता. तुर्की ‘आयएस’च्या दहशतवाद्यांना विमानात बसवून लिबियात उतरवित असल्याचा ठपका हफ्तार यांनी ठेवला होता. लिबियातील सराज राजवटीच्या सुरक्षेसाठी तुर्की त्रिपोलीतील पंतप्रधान कार्यालयाभोवती ‘आयएस’च्या दहशतवाद्यांचे कडे तयार करीत असल्याचा दावा हफ्तार यांनी केला होता.

अशा परिस्थितीत, ‘आयएस’चे हजारो दहशतवादी सिरियातून लिबियात दाखल होण्याच्या जॉर्डनच्या राजांनी दिलेल्या इशार्‍याचे महत्त्व वाढले आहे.

हिंदी   हिंदी   

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info