‘कोरोनाव्हायरस’ साथीवरून अमेरिका घबराट पसरवित आहे – चीनचा आरोप

‘कोरोनाव्हायरस’ साथीवरून अमेरिका घबराट पसरवित आहे – चीनचा आरोप

बीजिंग – ‘वुहान कोरोनाव्हायरस’ चीनसह जगभरात थैमान घालत असताना, यावरून राजकीय वाद सुरू झाला आहे. वुहानमधील राजनैतिक अधिकार्‍यांना माघारी बोलावून व आपल्या जनतेला चीनमध्ये प्रवासबंदी करून अमेरिका जाणीवपूर्वक घबराहट माजवित असल्याचा आरोप चीनने केला. तसेच या आघाडीवर अमेरिकेकडून चीनला सहाय्य मिळत नसल्याची तक्रार चीनने केली आहे. या साथीमुळे आत्तापर्यंत ३६०हून अधिक जणांचा बळी घेतला असून याचा चीनच्या पर्यटन, चित्रपट उद्योग व शेअरबाजाराला तब्बल ६०० अब्ज डॉलर्सचा फटका बसला आहे.

‘कोरोनाव्हायरस’, प्रवासबंदी, हुआ चुनयिंग, अमेरिका, साथ, चीन, इंधनगेल्या वर्षाच्या अखेरीस चीनमध्ये सुरू झालेली ‘वुहान कोरोनाव्हायरस’ची साथ अमेरिकसह २५ देशांमध्ये फैलावली असून दररोज त्यात नवनव्या देशांची व रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे संबंधित देशांनी विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू केल्या असून अमेरिकेने याबाबतीत व्यापक धोरण स्वीकारल्याचे समोर आले आहे. ‘वुहान कोरोनाव्हायरस’चा स्रोत असलेल्या वुहानमधून आपल्या राजनैतिक अधिकार्‍यांना तसेच नागरिकांना माघारी आणण्याचा निर्णय घेणारा अमेरिका हा पहिला देश ठरला होता.

त्यानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने ‘डोन्ट ट्रॅव्हल’ असा स्पष्ट इशारा देणारी ‘वॉर्निंग’ आपल्या नागरिकांसाठी जारी केली होती. चीनच्या हुबेई प्रांतामधून माघारी येणार्‍या नागरिकांना अमेरिकेने १४ दिवसांसाठी प्रतिबंधित क्षेत्रात ठेवण्याची घोषणा केली आहे. त्यापाठोपाठ अमेरिकेतून कोणत्याही देशाचा नागरिक पुढील दोन आठवड्यांसाठी चीनचा प्रवास करणार नाही, असा आदेशही दिला आहे. अमेरिकेतील बहुतांश विमान कंपन्यांनी चीनमधील आपल्या फेर्‍या पुढील सूचनेपर्यंत स्थगित केल्या आहेत.

अमेरिकेने एकामागोमाग घेतलेल्या या निर्णयाची जगातील इतर देशांकडूनही पुनरावृत्ती होत आहे. त्यामुळे ‘वुहान कोरोनाव्हायरस’च्या साथीवरून आंतरराष्ट्रीय समुदायात भीतीचे वातावरण तयार होत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे चीनच्या सत्ताधारी राजवटीत अस्वस्थता निर्माण झाली असून त्यांनी अमेरिकेला लक्ष्य केले आहे.

‘कोरोनाव्हायरस’, प्रवासबंदी, हुआ चुनयिंग, अमेरिका, साथ, चीन, इंधन‘अमेरिकेने साथीच्या फैलावानंतर चीनला कोणत्याही प्रकारचे सहाय्य पुरविलेले नाही. उलट वुहानमधून आपल्या राजनैतिक कार्यालयातील कर्मचारी माघारी बोलावण्याचा निर्णय सर्वात आधी अमेरिकेने घेतला. त्यानंतर चिनी नागरिकांच्या अमेरिकेतील प्रवेशावर बंदी घालण्याचा निर्णयही अमेरिकेनेच घेतला होता. जागतिक आरोग्य संघटनेने त्याची गरज नसल्याचे सांगितले असतानाही, अमेरिकेने असे निर्णय घेतले. यातून अमेरिका घबराटीचे वातावरण तयार करून ते जगभरात पसरवित आहे’, असा आरोप चीनच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांच्याकडून करण्यात आला.

‘वुहान कोरोनाव्हायरस’वरून चीनबाबत तयार झालेल्या वातावरणाचा मोठा फटका चिनी अर्थव्यवस्थेला बसला आहे. साथ रोखण्यासाठी चीनने काही शहरांमध्ये ‘लॉकडाऊन’चा निर्णय घेतल्याने पर्यटन, हॉटेल व चित्रपट उद्योगाला जबरदस्त फटका बसला आहे. गेल्या काही दिवसात या उद्योगांना जवळपास १७० अब्ज डॉलर्सचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. चीनमधील साथीमुळे गुंतवणुकदारांमध्येही भीतीचे वातावरण असून त्यांनी चीनच्या शेअरबाजारातून तब्बल ४०० अब्ज डॉलर्सहून अधिक गुंतवणूक काढून घेतली आहे.

चीनमधील साथीचा फटका इंधनक्षेत्रालाही बसला असून इंधनाची मागणी प्रतिदिन तब्बल ३० लाख बॅरल्सनी घसरली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर होणार्‍या दैनंदिन व्यवहारांमध्ये हा वाटा जवळपास २० टक्क्यांचा असून ९/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर प्रथमच इंधनक्षेत्राला इतक्या मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. सोमवारी आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधनाचे दरही घसरले असून प्रति बॅरल ५५ डॉलर्सपर्यंत खाली आले आहेत. २०२० सालच्या सुरुवातीपासून अवघ्या एका महिन्यात इंधनाच्या दरांमध्ये १२ टक्क्यांहून अधिक घसरण झाली असून चीनसारख्या देशातील घटलेली मागणी हे त्याचे प्रमुख कारण मानले जाते.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info