‘कोरोनाव्हायरस’ साथीवर नियंत्रण मिळविण्यात चीन अपयशी ठरला – सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्युरोची कबुली

‘कोरोनाव्हायरस’ साथीवर नियंत्रण मिळविण्यात चीन अपयशी ठरला – सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्युरोची कबुली

बीजिंग – गेल्या वर्षाच्या अखेरीस वुहान शहरातून सुरू झालेल्या ‘कोरोनाव्हायरस’च्या साथीवर नियंत्रण मिळविण्यात अपयशी ठरल्याची स्पष्ट कबुली चीनच्या सत्ताधारी राजवटीने दिली आहे. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीच्या पॉलिटब्युरोची बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात, अपयशाची कबुली देतानाच चीनमध्ये सध्या पसरणारी साथ चिनी यंत्रणांच्या व प्रशासनाच्या क्षमतेची कसोटी घेणारी असल्याचा दावा करण्यात आला.

डिसेंबर महिन्यात ‘वुहान’ शहरातून सुरू झालेल्या ‘कोरोनाव्हायरस’च्या साथीने चीनमध्ये ४२५ जणांचा मृत्यू झाला आहे. ‘कोरोनाव्हायरस’च्या साथीची लागण झालेल्यांची संख्या २० हजारांवर गेली असून अवघ्या २४ तासात तब्बल तीन हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचवेळी सोमवारी एका दिवसाच्या अवधीत साथीमुळे ६४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती चीनच्या यंत्रणांनी दिली. ‘कोरोनाव्हायरस’ची साथ सुरू झाल्यानंतर चीनने अवघ्या १५ दिवसात दोन विशेष रुग्णालयांची उभारणी केली असून त्यापैकी वुहानमधील पहिले रुग्णालय सोमवारी कार्यरत झाले आहे.

गेल्या दोन दशकात वेगाने आर्थिक प्रगती करून अमेरिका व युरोपिय देशांना आव्हान देणारी महासत्ता म्हणून चीनने ओळख तयार केली होती. मात्र प्रगत पाश्‍चात्य देशांना आपले सामर्थ्याचे प्रदर्शन दाखविणारा हा देश रोगाच्या साथीचा योग्य रितीने मुकाबला करु शकत नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. यापूर्वी २००३ साली आलेली ‘सार्स’च्या ‘बर्ड फ्ल्यू’च्या साथींवरून चीनच्या राजवटीवर टीकास्त्र सोडण्यात आले होते. ‘कोरोनाव्हायरस’च्या साथीत त्याचीच पुनरावृत्ती होताना दिसते.

अवघ्या २४ तासांपूर्वी चीनने अमेरिका ‘कोरोनाव्हायरस’च्या साथीवरून जगात घबराट पसरवित असल्याचा आरोप केला होता. मात्र त्याच चीनने आता अमेरिकेच्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या पथकाला ‘कोरोनाव्हायरस’ साथीच्या मुद्यावर उपाययोजना शोधण्यासाठी आमंत्रित केल्याचे समोर आले आहे. अमेरिकेवर आरोप केल्यानंतर काही तासातच चीनच्या राजवटीने आपल्या अपयशाची कबुली देणारे निवेदन प्रसिद्ध केले, ही गोष्ट देखील लक्ष वेधून घेणारी ठरते. 

‘कोरोनाव्हायरस’वरील नियंत्रणाच्या अपयशाची कबुली देणार्‍या चीनने ‘लॉकडाऊन’ करण्यात येणार्‍या शहरांच्या संख्येत वाढ केल्याची माहिती समोर आली आहे. वुहानपासून शेकडो किलोमीटर्सच्या अंतरावर असणार्‍या ‘हँगझाऊ’ व ‘तैझाऊ’ शहरात मंगळवारपासून ‘लॉकडाऊन’चे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान वुहानच्या जनतेकडून तक्रारीचे सूर उमटण्यास सुरुवात झाली असून ‘कोरोनाव्हायरस’च्या साथीची व्याप्ती सरकारकडून देण्यात येणार्‍या माहितीपेक्षा अनेक पटींनी जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info