इदलिबमधील तुर्कीच्या हल्ल्यात सिरियाचे १८४ सैनिक ठार  – तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाची माहिती

इदलिबमधील तुर्कीच्या हल्ल्यात सिरियाचे १८४ सैनिक ठार  – तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाची माहिती

इस्तंबूल/दमास्कस – गेल्या चोवीस तासात तुर्कीच्या लष्कराने सिरियाच्या इदलिबमध्ये चढविलेल्या हल्ल्यात अस्साद राजवटीच्या १८४ सैनिकांना ठार केल्याचे तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केले. तर रशियाने चढविलेल्या हवाई हल्ल्यात १५ नागरिकांचा बळी गेल्याचा आरोप ब्रिटनस्थित सिरियन मानवाधिकार संघटनेने केला. दरम्यान, इदलिबमधील या संघर्षावर संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त केली असून दोन्ही गटांनी संघर्षबंदी लागू करावी, असे आवाहन केले आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून तुर्कीच्या लष्कराने इदलिबमध्ये सिरियन लष्कराविरोधात ‘ऑपरेशन स्प्रिंग शिल्ड’ लष्करी मोहीम छेडली आहे. इदलिबमधील जनतेवर हल्ले चढविणार्‍या अस्साद राजवटीविरोधात ही कारवाई करीत असल्याचे तुर्कीचे म्हणणे आहे. बुधवारी तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, इदलिबमधील मंगळवारपासूनच्या कारवाईत १८४ सिरियन सैनिकांचा बळी गेला. तर सिरियन लष्कराचे चार रणगाडे, दहा लष्करी वाहनेदेखील नष्ट केली.

१ मार्चपासून तुर्कीच्या लष्कराने छेडलेल्या या लष्करी मोहिमेअंतर्गत सिरियन राजवटीशी संबंधित तीन हजाराहून अधिक गोष्टी नष्ट केल्याचा दावा तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने केला. यामध्ये १५१ रणगाडे, ४७ हॉवित्झर्स तोफा, तीन लढाऊ विमाने, आठ हेलिकॉप्टर्स, तीन ड्रोन्स, आठ हवाई सुरक्षा यंत्रणा, ५२ हून अधिक रॉकेट लॉंचर्स, १२ रणगाडाभेदी क्षेपणास्त्रे तर जवळपास १०० लष्करी वाहने नष्ट केल्याचे तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

याआधीही तुर्कीने इदलिबमधील संघर्षात सिरियन लष्कराचे मोठे नुकसान झाल्याचा दावा केला होता. यावेळी सिरियन मुखपत्रांनी तुर्कीचे दावे खोडून काढले आहेत. इदलिबमधील संघर्षात तुर्की व तुर्कीसंलग्न गटांना मोठी जीवितहानी सोसावी लागत असल्याच्या बातम्या सिरियन मुखपत्रांनी प्रसिद्ध केल्या आहेत. त्याचबरोबर तुर्कीसंलग्न गटाच्या जखमी जवानांचे फोटोग्राफ्सही सिरियन माध्यमांनी छापले आहेत. त्यामुळे इदलिबमधील संघर्षातील नुकसानाबाबत एकूणच गूढ निर्माण झाले आहे.

पण सिरियातील संघर्षात सर्वच गटांनी मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याचा आरोप संयुक्त राष्ट्रसंघाने केला आहे. अस्साद राजवटीबरोबरच त्यांचे समर्थन रशिया, इराण तसेच तुर्कीसंलग्न बंडखोर सिरियातील जीवित तसेच वित्तहानीसाठी जबाबदार असल्याचा ठपका राष्ट्रसंघाने ठेवला. यासाठी अस्साद राजवटीसह सर्वच गटांवर युद्धगुन्हे दाखल करण्याची आवश्यकता असल्याचे राष्ट्रसंघाने म्हटले आहे.

दरम्यान, इदलिबमधील संघर्षाप्रकरणी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची गुरुवारी भेट घेतली. या भेटीच्याआधी रशियाने अस्साद राजवटीची लष्करी कारवाई रोखून इदलिबमध्ये संघर्षबंदी लागू करावी, असे आवाहन तुर्कीने केले होते. पण तुर्कीनेच इदलिबमधील संघर्षबंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप रशियाने केला होता. त्यामुळे पुतिन व एर्दोगन यांच्या भेटीचे महत्त्व वाढले आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info