कोरोनाव्हायरस साथीचा फैलाव रोखण्यासाठी जागतिक समुदायाकडून व्यापक उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू

जीनिव्हा/पॅरिस/वॉशिंग्टन – चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेली ‘कोरोनाव्हायरस’ची भयंकर साथ अवघ्या दोन महिन्यात जगातील १५०हून अधिक देशांमध्ये पसरली आहे. या साथीची लागण दीड लाखांहून अधिक नागरिकांना झाली असून बळींची संख्या सहा हजारांनजिक पोहोचली आहे. या पार्श्‍वभूमीवर जागतिक समुदायाने आक्रमक उपाययोजना हाती घेतल्या असून त्यात ‘लॉकडाऊन’सह ‘पब्लिक हेल्थ इमर्जन्सी’ची घोषणा, ‘स्पेशल डिझास्टर झोन्स’ जाहीर करणे, लष्करी तैनाती व विशेष अर्थसहाय्य यांचा समावेश आहे.

 

गेल्या आठवड्यात जागतिक आरोग्य संघटनेने ‘कोरोनाव्हायरस’ची साथ जागतिक महामारी असल्याची घोषणा केली होती. ही घोषणा करतानाच आंतरराष्ट्रीय समुदायाने पुरेशा गांभीर्याने साथीकडे लक्ष न दिल्याने अशी वेळ आल्याची जाणीव करून दिली होती. त्याचवेळी यापुढे साथ अधिक पसरू नये यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता असून उपाययोजनांची व्याप्ती वाढविण्याचे आवाहन केले त्यानंतर जगातील अनेक देशांनी त्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली असून त्याची अंमलबजावणीही चालू झाली आहे.

चीनपाठोपाठ युरोपात ‘कोरोनाव्हायरस’च्या साथीचा फैलाव सर्वाधिक झाला असून इटली, स्पेन, जर्मनी, फ्रान्स, स्वित्झर्लंड, नॉर्वे व ब्रिटनला चांगलाच फटका बसला आहे. इटलीत २१ हजारांहून अधिक रुग्ण आढळले असून बळींची संख्या १४००वर गेली आहे. इटली सरकारने गेल्याच आठवड्यात पूर्ण देशभरात ‘लॉकडाऊन’ची घोषणा केली होती. मात्र त्यानंतरही या देशातील रुग्ण व बळींच्या संख्येत सातत्याने भर पडत असल्याचे दिसत आहे. गेल्या २४ तासात इटलीत ३,४००हून अधिक रुग्ण आढळल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली.

इटलीपाठोपाठ स्पेनमध्येही ‘कोरोनाव्हायरस’च्या साथीचा फैलाव वेगाने होत असल्याचे समोर आले. स्पेनमध्ये शनिवारी जवळपास दीड हजार नव्या रुग्णांची नोंद झाली असून बळींची संख्या जवळपास २००च्या नजिक गेल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांच्या पत्नीला ‘कोरोनाव्हायरस’ची लागण झाल्याचेही वृत्त देण्यात आले आहे. रुग्ण व बळींची संख्या वाढत असल्याने सुरुवातीला ‘इमर्जन्सी’ची घोषणा केलेल्या स्पेनने आता इटलीप्रमाणे पूर्ण ‘लॉकडाऊन’ जाहीर केला आहे.

युरोपातील इतर देशांनीही आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केली असून फ्रान्सने हॉटेल्स, चित्रपटगृहे, कॅफेज् आणि महत्त्वाचे कामकाज नसलेले व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचवेळी लांबचा प्रवास व वाहतुकीवर निर्बंध आणण्याचे संकेतही फ्रान्सच्या सरकारने दिले. फ्रान्सचे पंतप्रधान एदुआर्द फिलिप यांनी सध्याची ‘कोरोनाव्हायरस’ची साथ हे शतकातील सर्वात मोठे आरोग्यविषयक संकट असल्याची चिंता व्यक्त केली आहे.

जर्मनीतील रुग्णांची संख्या पाच हजारांवर गेली असून ब्रिटनमध्येही साथीची व्याप्ती वाढताना दिसू लागली आहे. २४ तासांच्या अवधीत ब्रिटनमध्ये साथीत बळी गेलेल्यांची संख्या ११वरून २१वर गेल्याचे समोर आले आहे. या पार्श्‍वभूमीवर ब्रिटीश सरकारने साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी लष्कर तैनात करण्याचे संकेत दिले आहेत.

ऑस्ट्रियाचे चॅन्सेल सेबॅस्टियन कर्झ यांनी जमावबंदीचे आदेश दिले असून पाच किंवा अधिक नागरिकांच्या एकत्र येण्यावर बंदी घातली आहे. रोमानियाने आणीबाणी लागू करण्याचे संकेत दिले असून झेक रिपब्लिकने देशातील सर्व नागरिकांची तपासणी करण्याची तयारी सुरू केली आहे. स्लोव्हाकियाने आपल्या देशाच्या सीमा बंद केल्याचे वृत्त समोर आले आहे. युरोपातील अनेक विमानकंपन्यांनी अमेरिका तसेच आशियाई देशांमध्ये जाणारी उड्डाणे थांबविल्याचे जाहीर केले आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info