वॉशिंग्टन – चीनने कोरोनाव्हायरसची माहिती दडवून न ठेवता वेळीच उघड केली असती, तर या विषाणूचा प्रसार चीनच्या एका भागापुरताच मर्यादित राहिला असता. पण चीनने तसे केले नाही आणि त्याची जबरदस्त किंमत सार्या जगाला चुकती करावी लागत आहे, अशा घणाघाती शब्दात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनचे वाभाडे काढले. आत्ताही चीन या साथीबाबत देत असलेली माहिती खरी असावी, अशी अपेक्षा असल्याचा टोला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी लगावला. तर संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना दुजोरा देऊन चीनमुळे सारे जग संकटात आल्याचा ठपका ठेवला आहे.
कोरोनाव्हायरस किंवा ‘कोविड-१९’ असा या विषाणूचा उल्लेख करण्याच्या ऐवजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प याला ‘चायनिज व्हायरस’ म्हणत आले आहेत. गुरुवारी माध्यमांना संबोधित करताना, अमेकिेच्या राष्ट्राध्यक्षांनी या साथीच्या फैलावाला चीनच कारणीभूत असल्याचा थेट आरोप केला. चीनने वेळीच याची माहिती उघड केली असता, तर ही साथ चीनच्याच एखाद्या भागापुरतीच मर्यादित राहिली असती आणि तिचा जगभरात फैलाव झाला नसता. पण चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने ही माहिती दडपण्याचा निर्णय घेतला, सारे जग याची जबर किंमत चुकती करीत आहे. जग महाभयंकर चिनी व्हायरसच्या कचाट्यात सापडले आहे, असे ट्रम्प म्हणाले.
‘ही साथ पसरू शकेल, अशी चिंता मला वाटत होती. म्हणूनच मी तत्काळ चिनी नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी केली होती. त्यावेळी अमेरिकी माध्यमांनी माझ्यावर वंशद्वेषाचे आरोप केले होते’, याचीही आठवण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना करून दिली. ट्रम्प यांच्या या आरोपानंतर अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रसंघातील माजी राजदूत निक्की हॅले यांनीही चीनला धारेवर धरले. सध्या चीन कोरोनाव्हायरसचा सामना कशारितीने करायचा, याचे जगासमोर उदाहरण घालून देण्याचा आव आणत आहे. पण प्रत्यक्षात या साथीचा जगभरातील फैलाव चीनमुळेच झालेला आहे, हे विसरता येणार नाही, असे हॅले म्हणाल्या.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केलेल्या आरोपांना दुजोरा देताना हॅले यांनी चीनवर आरोपांचा भडीमार केला. चीनने या विषाणूबाबतची माहिती जगजाहीर केली असती, तर ही साथ ९५ टक्के इतक्या प्रमाणात रोखता आली असती, याचा जगभरात फैलाव झालाच नसता, असा दावा निक्की हॅले यांनी केला. दरम्यान, अमेरिकेत या साथीमुळे आणीबाणी लागू करण्यात आली असून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आता ‘डिफेन्स प्रॉडक्शन ऍक्ट’ लागू करावा, अशी मागणी अमेरिकन संसदेच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांनी केली आहे.
अमेरिकेत रुग्णांवर उपाचर करणार्यांना पुरेशा प्रमाणात आवश्यक ती वैद्यकीय साधने मिळत नाहीत. त्यांचा तुटवडा भासत आहे, त्यामुळे या साथीचा सामना करताना खूप मोठ्या अडचणी येत आहेत. याची दखल घेऊन या साधनांचे उत्पादन वाढविण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी हा कायदा लागू करावा, असे पेलोसी यांनी म्हटले आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |