अमेरिकेतील कोरोनाव्हायरसच्या बळींची संख्या व्हिएतनाम युद्धापेक्षा अधिक

अमेरिकेतील कोरोनाव्हायरसच्या बळींची संख्या व्हिएतनाम युद्धापेक्षा अधिक

वॉशिंग्टन – अमेरिकेत कोरोनाव्हायरसच्या साथीने घेतलेल्या बळींची संख्या ५८,६०५ वर गेली आहे. चार दशकांपूर्वी झालेल्या व्हिएतनामच्या युद्धापेक्षाही अधिक जीवितहानी अमेरिकेला या साथीमुळे सोसावी लागली आहे. व्हिएतनाम युद्धालाही कितीतरी मागे टाकेल, इतक्या प्रमाणात अमेरिकेला या साथीमुळे जीवित व आर्थिक हानी सोसावी लागत असल्याचे सांगून विश्लेषकांनी या साथीच्या भयावहतेकडे अमेरिकी जनतेसह साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.

६ फेब्रुवारी रोजी अमेरिकेत या साथीने पहिल्या रुग्णाचा बळी घेतला होता. त्यानंतर तीन महिन्यांहून कमी कालावधीत अमेरिकेत या साथीने दगावलेल्यांची संख्या ५८ हजारांवर पोहोचली आहे. त्याचबरोबर अमेरिकेत या साथीच्या १०,३६,००० हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. अवघ्या १८ दिवसात देशातील कोरोनाबाधितांची संख्या दुपटीने वाढल्याची माहिती जॉन हॉप्किन्स विद्यापीठाने दिली. येत्या काळात अमेरिकेतील कोरोनाच्या बळींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते, असा दावा येथील वैद्यकीय अधिकारी करीत आहेत.

ब्रिटनमध्ये गेल्या चोवीस तासात या साथीने ६०१ जण दगावले असून या देशातील साथीच्या एकूण बळींची संख्या २२,३७० वर पोहोचली आहे. ब्रिटनमधील वृद्धाश्रमात कोरोनाने बळी गेलेल्यांची संख्या देखील यात जोडली जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात देशातील कोरोनाच्या बळींच्या संख्येत वाढ होईल, असे दावे ब्रिटनमधील वैद्यकीय अधिकारी करीत आहेत. ब्रिटीश जनतेने लॉकडाउनचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन परराष्ट्रमंत्री डॉमिनिक राब यांनी केले आहे. अन्यथा देशात या साथीची दुसरी लाट धडकेल, असे राब यांनी बजावले आहे.

गेल्या चोवीस तासात कोरोनामुळे इटलीमध्ये ३८२ जणांचा बळी गेला असून या देशातील एकूण बळींची संख्या २७,३५९ वर गेली आहे. तर स्पेनमध्ये या साथीने गेल्या चोवीस तासात ३२५ जण दगावले असून एकूण २४,२७५ जणांचा बळी गेला आहे. गेल्या चोवीस तासात जर्मनीत २०२ जण दगावले असून १,३०४ नवे रुग्ण आढळले आहेत. जर्मनीतील या साथीच्या एकूण बळींची संख्या ६,३३० वर गेली आहे.

रशियामध्ये या साथीचे एकूण ९७२ बळी गेले असून कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या ९९,३९९ वर गेली आहे. रशियातील कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढत असून राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी यावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info