हौथी बंडखोरांचा सौदीवर भीषण हल्ला सौदी व मित्रदेशांचे ५०० सैनिक ठार – इराणकडून हौथींच्या कारवाईचे समर्थन

हौथी बंडखोरांचा सौदीवर भीषण हल्ला सौदी व मित्रदेशांचे ५०० सैनिक ठार – इराणकडून हौथींच्या कारवाईचे समर्थन

सना/तेहरान – येमेनमधील हौथी बंडखोरांनी सौदी अरेबियाच्या सीमेवरील लष्करी तळावर चढविलेल्या घणाघाती हल्ल्यात ५०० सैनिक ठार झाल्याचा दावा हौथी बंडखोराचे प्रवक्ते ‘मोहम्मद अब्दुल सलाम’ यांनी केला. तसेच सौदी व अरब मित्रदेशांच्या सुमारे दोन हजार सैनिकांना हौथी बंडखोरांनी ताब्यात घेतले आहे, असे ‘सलाम’ यांनी जाहीर केले. सौदी व अरब देशांच्या या लष्करी आघाडीचे नेतृत्व पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख राहिल शरिफ यांच्याकडे होते.

हौथी बंडखोरांनी सौदीच्या लष्करी तळावर चढविलेल्या हल्ल्याची सविस्तर माहिती रविवारी आंतरराष्ट्रीय माध्यमांसमोर मांडली. सौदीच्या ‘नजरान’ येथील लष्करी तळावर याआधीही हौथी बंडखोरांनी हल्ला केला होता. दरवेळी या लष्करी तळावर सौदीचेच सैनिक तैनात होते. त्यापार्श्‍वभूमीवर, गेल्या आठवड्यात हौथी बंडखोरांनी क्षेपणास्त्रे व ड्रोन्सचे सौदीच्या सैनिकांवर हल्ले चढविले. यानंतर सौदीचे लष्कर व हौथी बंडखोरांमध्ये सुमारे ७२ तास संघर्ष सुरू होता.

या संघर्षात आघाडी घेऊन हौथी बंडखोरांनी लष्करी तळावर धाव घेतली तेव्हा सौदी व मित्रदेशांच्या सैनिकांनी पळ काढला. यावेळी हौथींच्या हल्ल्यात सौदी व अरब मित्रदेशांचे ५०० सैनिक ठार झाले, अशी माहिती बंडखोरांचे प्रवक्ते ‘मोहम्मद अब्दुल सलाम’ तसेच ‘याह्या सरी’ यांनी दिली. अजूनही सौदी व अरब मित्रदेशांचे दोन हजार सैनिक आपल्या ताब्यात असल्याचा दावा हौथी बंडखोरांनी केला. तसेच या हल्ल्याचा व्हिडिओ आणि फोटोग्राफ्स हौथींनी प्रसिद्ध केले. यातील एका व्हिडिओमध्ये सौदी व मित्रदेशांचे सैनिक हौथी बंडखोरांसमोर शरणागती पत्करत असल्याचे दिसत आहे.

‘आपल्या ताब्यातील सैनिकांची काळजी असेल तर सौदी व अरब मित्रदेशांच्या सैनिकांनी येमेनमधून माघार घ्यावी. मात्र सौदी व अरब मित्रदेशांनी आपल्यावर हल्ले चढविले तर यापुढेही सौदीवर अशीच कारवाई केली जाईल’, अशी धमकी हौथी बंडखोरांनी दिली. त्याचबरोबर आपल्या मागण्या मान्य करण्याशिवाय सौदीसमोर दुसरा पर्याय नसल्याचा दावा बंडखोरांचे प्रवक्ते ‘सलाम’ यांनी केला.

दरम्यान, हौथी बंडखोरांनी आपल्या ताब्यातील ३५० कैद्यांच्या सुटकेची घोषणा केली आहे. यामध्ये तीन सौदी नागरिकांचाही समावेश असेल. पण हौथी बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या सौदी व अरब देशांच्या सैनिकांबाबत तडजोड केली जाणार नसल्याचे बंडखोरांनी स्पष्ट केले.

तीन वर्षांपूर्वी सौदी अरेबिया व अरब-इस्लामी देशांनी दहशतवादाविरोधात ‘इस्लामिक मिलिटरी काऊंटर टेररिझम कोएलेशन’ची (आयएमसीटीसी) स्थापना केली होती. नाटोच्या धर्तीवर अरब-इस्लामी देशांची दहशतवादविरोधातील ही लष्करी संघटना उभारून सौदीने ‘आयएमसीटीसी’चे नेतृत्व पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख राहिल शरिफ यांच्याकडे सोपविले होते. २०१७ सालापासून शरिफ या लष्करी आघाडीचे नेतृत्व करीत होते.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info