सिरियातील संघर्षात ४८ जण ठार

सिरियातील संघर्षात ४८ जण ठार

दमास्कस – सिरियाच्या वायव्येकडील भागात लष्कर आणि दहशतवादी यांच्यात पेटलेल्या संघर्षात ४८ जण ठार झाले आहेत. सिरियात लागू झालेल्या संघर्षबंदीनंतर पहिल्यांदा एवढ्या मोठ्या संख्येने संघर्ष पेटून जीवितहानी झाल्याचे समोर येत आहे. तर सिरियातील रशियाच्या सर्वात मोठ्या लष्करी तळावरही दहशतवाद्यांनी हल्ला चढविला आहे. त्याचबरोबर सिरिया आणि तुर्कीच्या लष्करातही संघर्ष पेटल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

मार्च महिन्यात सिरियन लष्कराने रशियाच्या सहाय्याने इदलिबचा ताबा मिळविल्यानंतर वायव्य सिरियामध्ये संघर्षबंदी लागू करण्यात आली होती. रशियाने पुढाकार घेऊन या संघर्षबंदीची घोषणा केली होती. पण सुमारे दीड महिन्यानंतर या संघर्षबंदीचे उल्लंघन झाले असून अल कायदासंलग्न ‘हुरास अल-दीन’ या गटाने सिरियन लष्करावर हल्ले चढविले. रविवारी झालेल्या या हल्ल्यात व त्यानंतरच्या संघर्षात सिरियन लष्कर आणि संलग्न गटाचे ३५ जवान ठार झाले. तर अल कायदासंलग्न गटाचे १३ दहशतवादी देखील मारले गेले.

तर या हल्ल्याच्या काही तास आधी लताकिया प्रांतातील अल-खेमिन या रशियन लष्कराच्या सर्वात मोठ्या तळावर दहशतवाद्यांनी रॉकेट हल्ले चढविले. या लष्करी तळावर रशियाची ‘एस-४००’ तसेच इतरही हवाई सुरक्षा यंत्राणा तैनात आहेत. त्यामुळे या रॉकेट हल्ल्यांमध्ये रशियन तळाचे काहीही नुकसान झाले नाही, असे सांगितले जाते. त्याचवेळी तुर्कीच्या ताब्यात असलेल्या सिरियातील ‘अल बाब’ या तळावर सिरियन लष्कराशी संलग्न असलेल्या गटाने हल्ले चढविल्याचा दावा केला जातो. यात तुर्कीच्या लष्कराचे नुकसान झाल्याची चर्चा सुरू आहे. या हल्ल्यानंतर तुर्कीने देखील सिरियन लष्कराच्या ठिकाणांवर हल्ले चढविल्याच्या बातम्या येत आहेत.

दरम्यान, सिरियातील अस्साद लष्कर, संलग्न गट यांचे तुर्कीचे लष्कर आणि दहशतवादी गटांमधील हल्ले तीव्र झाले आहेत. सिरियातील या संघर्षावर संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनिओ गुतेरस यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच सिरियातील सर्व गटांनी संघर्षबंदीचे पालन करण्याचे आवाहन गुतेरस यांनी केले आहे.

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info