रशियाची नाराजी सीरियन राष्ट्राध्यक्ष अस्साद यांना भोवणार – प्रसारमाध्यमांचा दावा

रशियाची नाराजी सीरियन राष्ट्राध्यक्ष अस्साद यांना भोवणार – प्रसारमाध्यमांचा दावा

मॉस्को/दमास्कस – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन सीरियन राष्ट्राध्यक्ष बशर अल अस्साद यांच्यावर नाराज असून, अस्साद यांना सत्तेवरून हटविण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे दावे प्रसारमाध्यमांनी केले आहेत. अस्साद यांच्यावर इराण व इराणसमर्थक ‘लॉबी’चा असलेला प्रभाव हे त्यामागील प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे. गेल्या महिन्यात रशियन माध्यमांमध्ये अस्साद यांच्याविरोधात प्रसिद्ध झालेले लेख व रशियातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हे दावे करण्यात आल्याचे म्हटले आहे.

गेल्या महिन्यात रशियन सरकारशी जवळीक असणाऱ्या प्रसारमाध्यमांनी अस्साद यांच्याविरोधात एक लेखमाला प्रसिद्ध केली होती. या लेखात अस्साद हे भ्रष्टाचारी व कमकुवत नेते असल्याची माहिती देण्यात आली होती. सिरियात एक सर्वेक्षण करण्यात आल्याचे व त्यात अस्साद यांना फक्त ३२ टक्के जनतेचा पाठिंबा असल्याचेही त्यात सांगण्यात आले होते. २०२१ साली सिरियात होणाऱ्या निवडणुकीत अस्साद यांना जिंकण्याची संधी नसल्याचा दावाही रशियन लेखात करण्यात आला होता.

काही दिवसांनी ही लेखमाला इंटरनेटवरून गायब करण्यात आली. त्यानंतर रशियन वृत्तवाहिनीच्या अरब भाषिक संकेतस्थळावर एकेकाळी अस्साद यांचा समर्थक असणाऱ्या उद्योजकाची मुलाखत प्रसिद्ध करण्यात आली. त्यात बशर अल अस्साद म्हणजे बुडते जहाज असून रशियाने त्यांची साथ सोडून द्यावी, असा सल्ला त्या उद्योजकाने दिल्याचे दाखविले होते.

यापाठोपाठ अस्साद यांच्या अंतर्गत वर्तुळारील ‘रामी मखलौफ’ला झालेली अटक व त्यांच्यात झालेले मतभेद यामागेही रशियाचा दबाव असल्याचे मानले जाते. मखलौफ हा अस्साद राजवटीतील इराण ‘लॉबी’चा घटक असून सिरियातील ५० टक्क्यांहून अधिक अर्थव्यवस्थेवर त्याचे नियंत्रण असल्याचे मानले जाते. मखलौफ यांच्याबरोबरच अस्साद यांच्या राजवटीत असलेले इराण समर्थक आणि त्यांच्याकडून घेण्यात येणारे निर्णय रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासाठी डोकेदुखी बनल्याचे दावे रशियन सूत्रांकडून करण्यात येतात.

पुतिन यांच्या आखातातील धोरणांमध्ये सीरिया प्रमुख घटक असून, त्यातील यश त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. मात्र स्वतःची राजवट टिकविण्यासाठी रशियाचे सहाय्य घेणारे अस्साद राजकीय सुधारणा व पुनर्बांधणीसाठी रशियाला झुकते माप देण्याचे टाळत आहेत.

सिरियातील विरोधकांशी चर्चा करण्यास दिलेला नकार, इराणच्या सहकार्याने तुर्कीचे नियंत्रण असलेल्या भागात चढवलेले हल्ले व इराणी कंपन्यांना देण्यात येणारी कंत्राटे या गोष्टी त्याचाच भाग असल्याचे मानले जाते. त्यामुळे रशियाकडूनही नाराजीचे संकेत देण्यास सुरूवात झाली आहे. इस्रायलकडून सिरियावर होणारे वाढते हल्ले व रशियाने त्याकडे केलेला कानाडोळा

हा रशियाने अस्साद व इराण या दोघांनाही दिलेला संदेश असल्याचा दावाही रशियन सूत्रांनी केला.

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info