नायजर लष्कराच्या कारवाईत बोको हरामचे ७५ दहशतवादी ठार

नायजर लष्कराच्या कारवाईत बोको हरामचे ७५ दहशतवादी ठार

निआमे – नायजर लष्कराने केलेल्या मोठ्या कारवाईत ‘बोको हराम’ या दहशतवादी संघटनेच्या ७५ दहशतवाद्यांना ठार केले आहे. नायजर व नायजेरिया या दोन्ही देशांमध्ये ही कारवाई करण्यात आल्याची माहिती नायजर लष्कराने दिली. गेल्या आठवड्यात बोको हरामच्या दहशतवाद्यांनी नायजरच्या लष्करी तळावर हल्ला चढविला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून हाती घेण्यात आलेल्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

नायजर लष्कराने टप्प्यांमध्ये कारवाई केली. पहिल्या टप्प्यात सोमवारी नायजरमधील ‘दिफा’ शहराबाहेर कोमादौगौ नदीजवळ हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात २५ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. या कारवाईत दोन जवान जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

दुसऱ्या टप्प्यात नायजेरियात बोको हरामचा तळ असणाऱ्या ‘लेक चाड’मध्ये हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये ५० दहशतवादी मारले गेल्याची माहिती नायजरच्या संरक्षण विभागाने दिली. यावेळी हवाईहल्लेही करण्यात आले असून बोको हरामचा मोठा शस्त्रसाठा नष्ट करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

गेल्या दशकात स्थापन झालेल्या बोको हरामला संपवल्याचे दावे नायजेरियन सरकारकडून करण्यात आले आहेत. मात्र नायजेरियाच्या शेजारी देशांमध्येही बोको हरामचा प्रभाव वाढत असून नायजरमधील कारवाईतून ही बाब स्पष्ट झाली आहे. २००९ सालपासून ईशान्य नायजेरियात आपल्या कारवायांना सुरुवात करणाऱ्या बोको हरामच्या हिंसाचारात आतापर्यंत ३० हजारांहून अधिक जणांचा बळी गेला असून २० लाख नागरिकांना विस्थापित व्हावे लागले आहे.

दरम्यान, गेल्या काही महिन्यात नायजेरियाच्या वायव्य भागात बंडखोर गटांमध्ये तीव्र हिंसाचार भडकला असून तब्बल २३ हजार नागरिकांवर विस्थापित होण्याची वेळ ओढवली आहे. हे बहुतांश विस्थापित नायजरमध्ये दाखल झाले असल्याची माहिती संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात देण्यात आली. गेल्या वर्षीही सुमारे २० हजारांहून अधिक नायजेरियन नागरिकांनी नायजरमध्ये आश्रय घेतला होता.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info