अमेरिकेचे ‘सुपर डूपर क्षेपणास्त्र’ रशिया आणि चीनलाही मागे टाकेल – राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे ‘सुपर डूपर क्षेपणास्त्र’ रशिया आणि चीनलाही मागे टाकेल – राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन – ‘अमेरिकेचे लष्कर सुपर डूपर क्षेपणास्त्र विकसित करीत आहे. हे क्षेपणास्त्र रशिया आणि चीनकडे असलेल्या क्षेपणास्त्रांपेक्षा अधिक वेगवान व ध्वनीच्या तब्बल १७ पट वेगाने प्रवास करणारे असेल’, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. अमेरिकन ‘स्पेस फोर्स’च्या ध्वजाचे अनावरण करताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या हायपरसोनिक क्षेपणास्त्राची माहिती दिली.

अमेरिकेच्या संरक्षणदलातील सहावी कमांड म्हणून ‘स्पेस फोर्स’ची उभारणी करण्यात आली आहे. अंतराळातील अमेरिकेच्या हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेचे ही नवी कमांड महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या कमांडच्या ध्वजाचे अनावरण केले. त्यावेळी आपल्या शत्रूंचा सामना करण्यासाठी अमेरिकेने प्रगत शस्त्रास्त्रांची निर्मिती सुरू केल्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली. यामध्ये ‘सुपर डूपर क्षेपणास्त्राचा’ समावेश असल्याचे ट्रम्प म्हणाले.

‘जगातील सर्वात वेगवान क्षेपणास्त्र अमेरिकेकडे आहे. रशिया ध्वनीच्या पाच पट वेगाने प्रवास करणाऱ्या क्षेपणास्त्राची निर्मिती करीत आहे. तर चीन ध्वनीच्या सहा पट वेगाने प्रवास करणारे क्षेपणास्त्र विकसित करीत आहे. पण अमेरिका ध्वनीच्या १७ पट वेगाने प्रवास करणारे क्षेपणास्त्र तयार करीत आहे’, असे सांगून अमेरिकेकडे जगातील सर्वात वेगवान हायपरसोनिक क्षेपणास्त्र येणार असल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिली. अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनने देखील राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या घोषणचे समर्थन करुन हायपरसोनिक क्षेपणास्त्रावर काम सुरू असल्याचे सांगितले.

अमेरिकेच्या वायुसेनेने गेल्या महिन्यात काही आघाडीच्या शस्त्रास्त्रनिर्मिती कंपन्यांशी चर्चा करुन हायपरसोनिक क्षेपणास्त्र पारंपरिक स्फोटके व आण्विक स्फोटकांनी सज्ज करण्याबाबत चर्चा केली होती. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या लष्कराला टेक्सास येथे हायपरसोनिक क्षेपणास्त्राच्या चाचणीसाठी मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे अमेरिकेचे लष्कर आणि वायुसेना या सुपर डूपर हायपरसोनिक क्षेपणास्त्रांनी सज्ज होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

English        हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info