Breaking News

साऊथ चायना सी व व्यापारी करांच्या मुद्यावर ऑस्ट्रेलिया चीनविरोधात आक्रमक

कॅनबेरा – ‘डब्ल्यूएचओ’ अर्थात ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’मध्ये चीनविरोधी ठराव मांडणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा चीनविरोधी सूर अधिकच आक्रमक झाला आहे. चीनने ऑस्ट्रेलियाच्या उत्पादनांवर कर लादल्याने, ऑस्ट्रेलियाने चीनला जागतिक व्यापार संघटनेत खेचण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी भारतातील ऑस्ट्रेलियाच्या उच्चायुक्तांनी साऊथ चायना सीच्या मुद्यावर चीनवर निशाणा साधला आहे. एकापाठोपाठ घडलेल्या या घटनांनी आधीच ताणलेले ऑस्ट्रेलिया-चीन संबंध अधिकच चिघळले आहेत.

काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाने ‘डब्ल्यूएचओ’त चीनमधील कोरोना साथीची संपूर्ण चौकशी व्हावी यासाठी युरोपिय देशांच्या सहाय्याने ठराव दाखल केला होता. या प्रकरणावरून चीनने ऑस्ट्रेलियाला परिणामांची धमकीही दिली होती. त्यानंतर चीनने ऑस्ट्रेलियाच्या उत्पादनांवर ८० टक्क्यांहून अधिक कर लादणे, लक्ष वेधून घेणारे ठरते. चीनने आपल्या निर्णयाचे समर्थ करताना यासंदर्भातील चौकशी २०१८ सालापासून सुरू होती, असा खुलासा केला.

मात्र चीनच्या धमकीसमोर आपण झुकणार नसल्याचे ऑस्ट्रेलियाने आपल्या कृतीतून दाखवून दिले. चीनकडून करांची घोषणा झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने चीनला थेट जागतिक व्यापार संघटनेत खेचण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाचे कृषीमंत्री डेव्हिड लिटलप्राउड यांनी ही माहिती दिली.

चीनविरोधात नव्या व्यापारी संघर्षाचे संकेत देणाऱ्या ऑस्ट्रेलियाने ‘साऊथ चायना सी’च्या मुद्यावरुनही चीनला फटकारले आहे. ऑस्ट्रेलियाचे भारतातील उच्चायुक्त बॅरी ओफॅरल यांनी, ऑस्ट्रेलिया यापुढेही आपल्या युद्धनौका व लढाऊ विमानांची साऊथ चायना सीमधील गस्त चालू ठेवेल, असे बजावले. त्याचवेळी चीनव्यतिरिक्त इतर देशांकडून या भागात सुरु असणाऱ्या हालचालींनाही ऑस्ट्रेलिया समर्थन देईल, असेही ओफॅरल यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय समुदाय कोरोना साथीशी मुकाबला करण्यासाठी धडपडत असताना चीनकडून आपल्या सामरिक महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही आठवड्यांपूर्वी चीनने व्हिएतनामची बोट बुडवली होती. साऊथ चायना सीमधील काही भागांचे परस्पर नामकरण करून त्यावर आपला अधिकार असल्याचेही जाहीर केले होते. या क्षेत्रात गस्त घालणाऱ्या अमेरिकी युद्धनौकेला पिटाळल्याचा दावाही चीनकडून करण्यात आला होता.

चीनच्या या कारवायांवर अमेरिकेसहित सर्वच देशांनी तीव्र आक्षेप घेतले असून चीनला रोखण्यासाठी हालचालीही सुरु केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियासारख्या आघाडीच्या देशाकडून घेण्यात आलेला आक्रमक पवित्रा चीन आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटा पडत असल्याचे स्पष्ट संकेत देत आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info