अमेरिकेला कोणत्याही परिस्थितीत युद्ध हवे आहे

- रशियाचा आरोप

मॉस्को/वॉशिंग्टन – अमेरिकेला कोणत्याही परिस्थितीत रशिया-युक्रेन युद्ध हवे आहे, असा गंभीर आरोप रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला. अमेरिकेकडून युरोपात होणारी लष्करी तैनाती व युद्धासंदर्भात करण्यात येणारे दावे याचे निदर्शक आहेत, असे रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोव्हा यांनी बजावले. अमेरिकेबरोबरच नाटोलाही रशिया-युक्रेन भागात शांतता नको असल्याचे रशियाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी म्हटले आहे. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी, युक्रेन मुद्यावरून रशिया व अमेरिका समोरासमोर खडे ठाकल्यास महायुद्धाला सुरुवात होईल, असे वक्तव्य केले आहे. जर्मन दैनिक ‘डर स्पिगेल’ने, रशियाने १६ फेब्रुवारीला युक्रेनवर आक्रमणाची योजना आखली असल्याचे वृत्त दिले आहे.

युद्ध हवे आहे

गेले काही दिवस अमेरिकेकडून रशिया-युक्रेन संघर्षाबाबत सातत्याने आक्रमक दावे केले जात आहेत. अमेरिकेचे वरिष्ठ अधिकारी व माध्यमे सातत्याने रशिया कधीही युक्रेनवर आक्रमण करु शकतो, असे इशारे देत आहेत. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी याबाबत नाराजी व्यक्त करताना अशा इशार्‍यांमुळे युक्रेनमध्ये अकारण घबराटीचे वातावरण तयार होत असल्याचे म्हटले होते. मात्र त्यानंतरही अमेरिकेकडून अशा प्रकारचे दावे सुरूच असून रशियाने त्यावर खरमरीत प्रत्युत्तर दिले आहे.

‘अमेरिकेतील सत्ताधार्‍यांचा उन्माद आता अधिक उघडपणे दिसू लागला आहे. अमेरिका व पाश्‍चात्य देशांमधील अँग्लो-सॅक्सन गटालाच कोणत्याही परिस्थितीत युद्ध हवे आहे. चिथावणी, धमक्या व अपप्रचार या माध्यमातून अमेरिका आणि सहकारी देश त्यांच्या अंतर्गत समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. अमेरिकेतील लष्करी-राजकीय आघाडी पुन्हा एकदा सामान्य लोकांचे जीवन उद्ध्वस्त करण्यास सज्ज झाली आहे. पाश्‍चात्यांचा लष्करवाद व साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षा उघडा पडत असून सारे जग ही गोष्ट पहात आहे’, अशा शब्दात रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोव्हा यांनी अमेरिकेवर टीका केली.

युद्ध हवे आहे

रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री आंद्रे रुडेन्को यांनीही पाश्‍चात्य देशांना लक्ष्य केले. ‘नाटोला युक्रेनमध्ये शांतता नको आहे. नाटोचा उद्देश फक्त रशियाला रोखणे व कमकुवत करणे हाच आहे. त्यामुळे रशियाने हल्ला करणार नाही असे वारंवार सांगितले असले तरीही नाटो सदस्य देश आमच्यावर विश्‍वास ठेवत नाहीत. पाश्‍चात्य देशांसह युक्रेनला रशियाच्या बोलण्याकडे दुर्लक्षच करायचे आहे’, असा दावा रुडेन्को यांनी केला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी गुरुवारी युक्रेनमधील अमेरिकी नागरिकांना देश सोडण्याचे निर्देश दिले. यासंदर्भात बोलताना त्यांनी अमेरिका व रशियाने परस्परांवर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली तर महायुद्ध भडकेल, असा इशारा दिला होता. त्याचवेळी अमेरिका पोलंडमध्ये तीन हजार अतिरिक्त जवान पाठवित असल्याची घोषणाही केली होती. अमेरिकेने युरोपात नव्या लष्करी तैनातीची घोषणा करण्याची गेल्या १५ दिवसांमधील ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी केलेल्या घोषणेत अमेरिकेने पोलंडसह जर्मनी तसेच रोमानियामध्ये लष्करी तुकड्या तैनात करण्याचे जाहीर केले होते.

दरम्यान, ‘डर स्पिगेल’ या जर्मन वृत्तपत्राने रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणासंदर्भात खळबळजनक दावा केला आहे. रशिया १६ फेबु्रवारीला युक्रेनवर हल्ला चढविणार असल्याची माहिती पाश्‍चात्य गुप्तचर यंत्रणांना मिळाली असल्याचे जर्मन वृत्तपत्राने म्हटले आहे. या पार्श्‍वभूमीवर शनिवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन व फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन शनिवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी फोनवरून बोलणी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info