प्योनग्यँग/सेउल – उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग उन यांनी दक्षिण कोरियाबरोबरीला सर्व संपर्क तोडल्याची घोषणा केली आहे. यात दोन देशांमधील राजनैतिक विभाग व लष्करामध्ये असलेल्या हॉटलाइन्सचा समावेश आहे. दक्षिण कोरियातील काही गटांकडून, उत्तर कोरियाविरोधात होणाऱ्या कारवाया रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करून दक्षिण कोरियारोबरचा संपर्क तोडण्यात येत असल्याचे उत्तर कोरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने सांगितले. गेल्याच आठवड्यात उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग उन यांची बहीण किम यो जाँगने दक्षिण कोरियाला धमकावल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.
दोन वर्षांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाचा ऐतिहासिक दौरा करून उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग उन यांची भेट घेतली होती. या भेटीच्या पार्श्वभूमीवरच उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया यांच्यातील संबंध सुरळीत करण्यासाठी दोन देशांमध्ये ‘लायजन ऑफिस’ची स्थापना करण्यात आली होती. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे इन यांनीही उत्तर कोरियाबरोबरील संबंध सुधारण्यासाठी पुढाकार घेतला होता. असे असतानाही गेल्या वर्षी व्हिएतनाममध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प व उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग उन यांच्यात अण्वस्त्रांवरून झालेली चर्चा फिस्कटली होती. त्यानंतर उत्तर कोरियाने पुन्हा एकदा अमेरिका व दक्षिण कोरियाला धमकावण्यात सुरुवात केली होती. उत्तर कोरियाकडून एकामागोमाग एक अशा क्षेपणास्त्र चाचण्याही करण्यात आल्या होत्या. गेल्याच महिन्यात दोन देशांच्या सीमेवर लष्करी चकमक उडाल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले होते. मात्र आता थेट दोन्ही देशांमधील सर्व प्रकारचा संपर्क तोडून उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग उन यांनी आपले आक्रमक इरादे दाखवून दिले आहेत.
संपर्क तोडताना उत्तर कोरियाने दक्षिण कोरियातील काही गटांकडून, उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग उन यांच्याविरोधात सुरू असणाऱ्या कारवायांचे कारण पुढे केले आहे. दक्षिण कोरियातील काही गटांकडून उत्तर कोरियात सातत्याने बलून्स सोडण्यात येतात. या बलून्समध्ये हुकूमशहा किम जाँग उन यांच्याविरोधातील तसेच उत्तर कोरियातील जनतेवर होणाऱ्या अत्याचारांची माहिती छापलेली असते. अनेकदा त्यातून अन्नधान्य, इलेक्ट्रॉनिक उपकरणे व इतर सामग्रीही पाठविली जाते. दक्षिण कोरियातील गटांकडून होणाऱ्या या कारवाया वाढल्या असून त्या रोखण्यात राष्ट्राध्यक्ष मून अपयशी ठरल्याचा ठपका उत्तर कोरियाने ठेवला आहे. हेच निमित्त पुढे करीत दक्षिण कोरिया हा उत्तर कोरियाचा शत्रू असल्याचे सांगून यापुढे सर्व प्रकारचे संपर्क तोडण्यात येत आहेत, असे उत्तर कोरियाकडून जाहीर करण्यात आले. उत्तर कोरियातील सरकारी वृत्तसंस्था ‘केसीएनए’ने दिलेल्या वृत्तात, यापुढे उत्तर कोरिया दक्षिण कोरियाबरोबर समोरासमोर बसून बोलणी करणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे नजीकच्या काळात दोन्ही देशांमध्ये चर्चा होऊन तोडगा निघण्याची शक्यताही निकालात निघाल्याचे दिसत आहे. येत्या काही दिवसांमध्ये उत्तर कोरिया एखादी क्षेपणास्त्र चाचणी घेऊन कोरियन क्षेत्रातील तणावात अधिकच भर टाकण्याचा प्रयत्न करेल असे संकेतही काही विश्लेषकांनी दिले आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |