अमेरिकेच्या क्षेपणास्त्रांवरून चीनची जपानला धमकी

अमेरिकेच्या क्षेपणास्त्रांवरून चीनची जपानला धमकी

बीजिंग/टोकियो – अमेरिकेच्या भू-राजकीय कारस्थानाला बळी पडून त्यांची क्षेपणास्त्रे आपल्या भूमीवर तैनात करू नका अन्यथा त्याचे गंभीर परिणाम तुम्हालाच भोगावे लागतील, अशा खरमरीत शब्दात चीनने जपानला धमकावले आहे. चीनच्या आक्रमक वर्चस्ववादी कारवायांना रोखण्यासाठी अमेरिकेने इंडो-पॅसिफिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर लष्करी तैनातीचे धोरण राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जपानसह काही पूर्व आशियाई देशांमध्ये मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची तैनाती करण्याची योजना आहे. त्यावर चीनची तीव्र प्रतिक्रिया उमटली असून अमेरिकी क्षेपणास्त्रांच्या तैनातीची शक्यता असलेल्या देशांवर दडपण आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

अमेरिका, क्षेपणास्त्र, जपानला धमकी, चीन

‘ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे जपानी लष्कराच्या हालचाली नेहमीच शेजारी देश व आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधून घेणाऱ्या राहिल्या आहेत. जपानने इतिहासातून योग्य धडे शिकण्याची गरज आहे. आपल्या राज्यघटनेचा आदर राखून जपानने शांततामय व बचावात्मक धोरणाचे पालन करावे आणि त्याप्रमाणे निर्णय घ्यावा. मात्र जपानने अमेरिकेची क्षेपणास्त्रे तैनात करण्याबाबत पावले उचलली तर चीन स्वस्थ बसणार नाही आणि त्याचे परिणाम जपानला भोगावे लागतील,’ असा सज्जड इशारा चीनने दिला.

जपानबरोबरच पूर्व आशियातील इतर देशांनाही चीनने धमकावले आहे. ‘जपानबरोबरच आशियातील इतर देशही क्षेत्रीय शांतता व स्थैर्याचा विचार करतील अशी अपेक्षा आहे. पूर्व आशियाई देशांनी अमेरिकेकडून मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र तैनातीबाबत सुरू असणाऱ्या प्रयत्नांना नकार देऊन जबाबदारीने पावले उचललावीत, असे चीनला वाटते. या देशांनी अमेरिकेच्या भू-राजकीय कारस्थानाला बळी पडू नये’, असे चीनच्या संरक्षण विभागाचे प्रवक्ते वु कियान यांनी बजावले.

अमेरिका, क्षेपणास्त्र, जपानला धमकी, चीन

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अमेरिका रशियाबरोबरील ‘इंटरमिडिएट रेंज न्यूक्लिअर फोर्सेस ट्रिटी’मधून (आयएनएफ) बाहेर पडली होती. त्यानंतर अमेरिकेने पुन्हा एकदा मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र विकसित करण्यास सुरुवात केली आहे. या क्षेपणास्त्रांचा पल्ला ५०० ते ५,५०० किलोमीटर इतका असल्याचे सांगण्यात येते.

गेल्या काही महिन्यात चीनने साऊथ चायना सीसह इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील कारवाया मोठ्या प्रमाणात वाढविल्या आहेत. हॉंगकॉंग व तैवानसह संपूर्ण साऊथ चायना सी तसेच ईस्ट चायना सीवर ताबा मिळवण्याची वर्चस्ववादी महत्त्वाकांक्षा यामागे आहे. चीनच्या या महत्त्वाकांक्षेला वेसण घालण्यासाठी अमेरिका पुढे सरसावली असून जपान, भारत व ऑस्ट्रेलिया तसेच आग्नेय आशियाई देशांचे सहाय्य घेत आहे.

जपानसह आशियाई देशांमध्ये प्रगत क्षेपणास्त्रे व इतर संरक्षण तैनाती हा चीनला रोखण्याच्याच धोरणाचा भाग आहे. चीनला याची जाणीव झाल्याने तो शेजारी देशांना धमकावून अमेरिकेच्या डावपेचांना शह देण्याचा प्रयत्न करीत आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info