अमेरिका जपानला ‘एफ-३५’ तर तैवानला ‘पॅट्रिऑट मिसाईल्स’ पुरविणार

अमेरिका जपानला ‘एफ-३५’ तर तैवानला ‘पॅट्रिऑट मिसाईल्स’ पुरविणार

वॉशिंग्टन – चीनकडून साऊथ चायना सी व ईस्ट चायना सीवर ताबा मिळवण्यासाठी जोरदार कारवाया सुरू असल्याचे इशारे गेल्या काही महिन्यात सातत्याने देण्यात येत आहेत. चीनच्या या कारवाया रोखण्यासाठी अमेरिकेनेही आक्रमक पावले उचलली असून त्यात या क्षेत्रातील प्रमुख देशांची संरक्षणसज्जता वाढविण्याचा धोरणाचा समावेश आहे. याअंतर्गत, अमेरिकेने जपानला १०५ प्रगत ‘एफ-३५’ लढाऊ विमाने देण्याचा तसेच तैवानकडील ‘पॅट्रिऑट मिसाईल्स’ यंत्रणा अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला आहे. तैवानला क्षेपणास्त्र यंत्रणा पुरविण्याच्या निर्णयावर चीनमधून तीव्र प्रतिक्रिया उमटली असून अमेरिका व तैवान युद्धाला चिथावणी देत असल्याचा आरोप चिनी प्रसारमाध्यमांनी केला आहे.

कोरोना साथीला चीन जबाबदार असल्याचा आरोप करून अमेरिकेने चीनला गंभीर परिणामांचा इशारा दिला होता. मात्र अमेरिकेच्या धमक्यांचा आपल्यावर परिणाम झालेला नाही, हे दाखविण्यासाठी चीनने गेल्या काही महिन्यात साऊथ चायना सीसह इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील कारवाया मोठ्या प्रमाणात वाढविल्या आहेत. हॉंगकॉंग व तैवानसह संपूर्ण साऊथ चायना सी तसेच ईस्ट चायना सीवर ताबा मिळवण्याची वर्चस्ववादी महत्त्वाकांक्षा यामागे आहे. चीन आशिया-पॅसिफिक क्षेत्रात सातत्याने आपल्या नौदलसामर्थ्याचे प्रदर्शन करीत आहे. व्हिएतनाम, तैवान या देशांच्या विरोधात चिनी नौदलाने आक्रमक भूमिका घेणाऱ्या चिनी नौदलाने व्हिएतनामचे जहाज देखील बुडविले होते.

चीनच्या लढाऊ विमानांकडून तैवानच्या हवाईक्षेत्रात घुसखोरीही सुरू आहे. त्याचवेळी ईस्ट चायना सीमध्ये चीनच्या विनाशिका, पाणबुड्या व गस्तीनौका जपानच्या सार्वभौमत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न करीत आहेत. या पार्श्वभूमीवर, चीनच्या महत्त्वाकांक्षेला वेसण घालण्यासाठी अमेरिका पुढे सरसावली असून जपान, भारत, ऑस्ट्रेलिया व तैवानसह आग्नेय आशियाई देशांचे सहाय्य घेत आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील अमेरिकेची वाढती संरक्षणतैनाती आणि या क्षेत्रातील देशांना मोठ्या प्रमाणात पुरविण्यात येणारी संरक्षणसामुग्री अमेरिकेच्या व्यापक धोरणाचा भाग ठरतो.

गुरुवारी अमेरिकेच्या ‘डिफेन्स सिक्युरिटी कोऑपरेशन एजन्सी’ने जपानला १०५ ‘एफ-३५’ लढाऊ विमाने देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. हा निर्णय अमेरिकेच्या संसदेला कळविण्यात आला असून हा करार २३ अब्ज डॉलर्सचा आहे. करारानुसार जपानला ६३ ‘एफ-३५ए’ व ४२ ‘एफ-३५बी’ पुरविण्यात येणार आहेत. हा करार पूर्णत्वास गेल्यानंतर जपानच्या हवाई दलात एकूण १४७ ‘एफ-३५’ लढाऊ विमाने कार्यरत होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. ‘एफ-३५’ विकसित करणाऱ्या अमेरिकेव्यतिरिक्त या लढाऊ विमानांचा सर्वाधिक ताफा असणारा जपान हा पहिलाच देश ठरेल.

सध्या जगात कार्यरत असणाऱ्या लढाऊ विमानांपैकी सर्वात प्रगत व अत्याधुनिक ‘फिफ्थ जनरेशन फायटर’ म्हणून ‘एफ-३५’ ओळखण्यात येते. चीनचा धोका रोखण्यासाठी अमेरिकेकडून ही प्रगत विमाने घेत असतानाच जपानने स्वतंत्ररित्या ‘एफ-एक्स’ नावाने ‘सिक्स्थ जनरेशन स्टेल्थ फायटर जेट’ विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी त्यासाठी सुमारे २६ कोटी डॉलरचा निधी राखून ठेवण्यात आला असून २०३१ सालापर्यंत नवे लढाऊ विमान जपानच्या संरक्षणदलात सामील होईल, असा दावा जपानी सूत्रांनी केला आहे.

दरम्यान, गेल्या काही वर्षात तैवानबरोबरील सहकार्य वाढविण्यावर भर देणाऱ्या ट्रम्प प्रशासनाने तैवानकडील ‘पॅट्रिऑट मिसाईल्स’ यंत्रणा अद्ययावत करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार सध्या तैवानकडे असणाऱ्या ‘पीएसी-३’ यंत्रणेची मारक क्षमता व कालावधी वाढविण्यात येणार आहे. हा करार सुमारे ६२ कोटी डॉलरचा असून अद्ययावत केलेली ‘पॅट्रिऑट मिसाईल्स’ पुढील तीन दशके तैवानच्या संरक्षणदलात कार्यरत राहतील अशी माहिती अमेरिकी तसेच तैवानी सूत्रांनी दिली.

जून महिन्याच्या सुरुवातीला तैवान अमेरिकेकडून हार्पून क्षेपणास्त्रे खरेदी करण्याची तयारी करत असल्याचेही सांगण्यात आले होते. त्यापूर्वी अमेरिकेने तैवानला टॉर्पेडो देण्यास मान्यता दिल्याचेही वृत्त प्रसिद्ध झाले होते. तैवानच्या सुरक्षेसाठी अमेरिकेकडून सुरू असलेल्या या वाढत्या हालचालींनी चीनची सत्ताधारी राजवट चांगलीच बिथरली असून चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी धमकावण्यास सुरुवात केली आहे. ग्लोबल टाइम्स या चीनच्या सरकारी मुखपत्राने क्षेपणास्त्रांचा नवा करार म्हणजे युद्धाला चिथावणी देण्याचा प्रकार असल्याची टीका केली आहे. त्याचवेळी युद्ध भडकलेच तर चीनचे लष्कर काही तासातच ताइवान वर ताबा मिळवेल अशी धमकीही दिली आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info