चीन व रशियाविरोधातील संभाव्य संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकी लष्कराकडून ‘नॅशनल गार्ड’ची पुनर्रचना

चीन व रशियाविरोधातील संभाव्य संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकी लष्कराकडून ‘नॅशनल गार्ड’ची पुनर्रचना

वॉशिंग्टन – चीनसह रशियाविरोधात नजीकच्या काळात मोठ्या संघर्षाचा भडका उडण्याची शक्यता लक्षात घेऊन अमेरिकेच्या संरक्षण विभागाने ‘नॅशनल गार्ड’च्या पुनर्रचनेचा निर्णय घेतला आहे. ‘आर्मी नॅशनल गार्ड’चे नवे संचालक लेफ्टनंट जनरल डॅनियल हॉकन्सन यांनी ही माहिती दिली. प्रत्यक्ष युद्धात लढणाऱ्या लष्कराच्या ‘डिव्हिजन्स’च्या धर्तीवर ‘आर्मी नॅशनल गार्ड’ च्याही डिव्हिजन्स तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे पुढील काळात अमेरिकी लष्कराला मोठ्या संघर्षासाठी अतिरिक्त बळ उपलब्ध होईल, असा दावा अधिकाऱ्यांनी केला.

नॅशनल गार्ड, अमेरिका, चीन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली २०१८ साली ‘नॅशनल डिफेन्स स्ट्रॅटेजी’ला मान्यता देण्यात आली होती. पुढील काळात जगातील महासत्तांमधील स्पर्धा अधिक तीव्र होऊन मोठा संघर्ष भडकू शकतो, यावर भर देऊन नवीन संरक्षण धोरण तयार करण्यात आले होते. या ‘ग्रेट पॉवर कॉम्पिटिशन’चा संदर्भ देऊन, नॅशनल गार्ड’चे नवे संचालक लेफ्टनंट जनरल डॅनियल हॉकन्सन यांनी, पुनर्रचनेसंदर्भात माहिती दिली. ‘संभाव्य युद्धांमध्ये लष्कराच्या ‘डिव्हिजन’च्या स्तरावर संघर्ष होण्याची शक्यता आहे. त्यासाठी अमेरिकी संरक्षण दलांची गरज लक्षात घेऊन पुनर्रचनेचा निर्णय घेण्यात आला आहे’, असे लेफ्टनंट जनरल डॅनियल हॉकन्सन यांनी सांगितले.

नॅशनल गार्ड, अमेरिका, चीन

नव्या रचनेत ‘आर्मी नॅशनल गार्ड’च्या आठ स्वतंत्र डिव्हिजन्स तयार करण्यात येणार आहेत. अमेरिकन लष्कराच्या नियमानुसार प्रत्येक डिव्हिजनमध्ये कमीत कमी १० हजार ते जास्तीत जास्त २५ हजार जवानांचा समावेश असतो. नॅशनल गार्डच्या आठ डिव्हिजन्स तयार झाल्यानंतर अमेरिकी लष्कराला मोठ्या संघर्षासाठी ८० हजारांपासून ते दीड लाखांपर्यंत अतिरिक्त बळ उपलब्ध होऊ शकते. चीन किंवा रशियाशी थेट संघर्ष उडाल्यास हे अतिरिक्त सामर्थ्य निर्णायक ठरू शकते, असे संकेत लष्करी सूत्रांनी दिले आहेत. सध्या अमेरिकेच्या नॅशनल गार्डमध्ये साडेचार लाख जवानांचा समावेश आहे.

गेल्या काही महिन्यात अमेरिका व चीन मधील संबंध विकोपाला गेले असून ‘साऊथ चायना सी’च्या मुद्द्यावरून दोन देशात युद्ध भडकू शकते, असे इशारे देण्यात येत आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अफगाणिस्तान तसेच युरोपमधून अमेरिकी सैन्याच्या माघारी बाबत घेतलेल्या निर्णयावर राजकीय वर्तुळातून टीकाही होत आहे. अशा माघारीमुळे अमेरिकेचे लष्करी महासत्ता म्हणून असलेले जगातील स्थान धोक्यात येईल, असा दावा काही राजकीय नेते व माजी लष्करी अधिकाऱ्यांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे संरक्षणदलातील ‘रिझर्व्ह फोर्स’ असलेल्या ‘नॅशनल गार्ड’ पुनर्रचना व त्याद्वारे अमेरिकी लष्कराला मिळणारे अतिरिक्त सामर्थ्य लक्ष वेधून घेणारे ठरते.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info