अमेरिका-चीन युद्धाची शक्यता अकल्पनीय राहिलेली नाही – ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचा इशारा

अमेरिका-चीन युद्धाची शक्यता अकल्पनीय राहिलेली नाही – ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचा इशारा

कॅनबेरा – अमेरिका व चीनमध्ये युद्धाचा भडका उडणे ही गोष्ट आता अकल्पनिय राहिलेली नाही, असा इशारा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरीसन यांनी दिला. यापूर्वी अशा थेट युद्धाची कल्पना किंवा शक्यताही वर्तविली जात नव्हती; मात्र आता परिस्थिती बदलली आहे, या शब्दात ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील संभाव्य संघर्षाचे संकेत दिले. अमेरिका व चीनमधील युद्धाबाबत बोलताना ऑस्ट्रेलियाचे चीनबरोबरील संबंध विकोपाला गेल्याची माहितीही पंतप्रधान मॉरिसन यांनी दिली. या पार्श्वभूमीवरच चीनच्या नौदलाने प्रगत ‘अँफिबियस ॲसॉल्ट शिप’च्या चाचण्या सुरू केल्याचे जाहीर केले आहे.

स्कॉट मॉरिसन

ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान केव्हिन रूड यांनी ‘फॉरेन अफेअर्स’ या द्वैमासिकात लिहिलेला एका लेखात, अमेरिका व चीनमध्ये लवकरच युद्ध भडकेल असा दावा केला आहे. ‘बिवेअर द गन्स ऑफ ऑगस्ट- इन आशिया’ नावाच्या लेखात रुड यांनी, येत्या तीन महिन्यात साऊथ चायना सीमध्ये अमेरिका व चीनदरम्यान युद्धाची शक्यता सर्वाधिक असल्याचे म्हटले आहे. असे युद्ध भडकल्यास त्याचे गंभीर परिणाम ऑस्ट्रेलियालाही भोगावे लागतील, असा इशाराही रूड यांनी या लेखात दिला आहे. अमेरिका व चीनमधील संभाव्य युद्ध टाळण्यासाठी या दोन देशांमध्ये विकोपाला केलेले संबंध सुरळीत करण्यासाठी इतर देशांना पुढाकार घ्यावा लागेल, असा सल्लाही ऑस्ट्रेलियाच्या माजी पंतप्रधानांनी लेखात दिला आहे.

माजी पंतप्रधानांच्या लेखावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान स्कॉट मॉरीसन यांनी, आपले सरकार याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत असल्याचे म्हटले आहे. ‘रुड यांनी वर्णन केल्याप्रमाणे नाट्यमय रीतीने संघर्षाला सुरुवात होईल असे वाटत नाही. मात्र अमेरिका व चीनमधील युद्ध पूर्वीप्रमाणे अकल्पनीय गोष्ट राहिलेली नाही, याची ऑस्ट्रेलिया सरकारला पूर्ण जाणीव आहे. अशी शक्यता किंवा कल्पना आधी व्यक्त केले जात नव्हती, मात्र आता परिस्थिती बदललेली आहे’, या शब्दात पंतप्रधान स्कॉट मॉरिसन अमेरिका व चीनमधील संभाव्य युद्धबाबत बजावले आहे. ‘ॲस्पेन सिक्युरिटी फोरम’च्या कार्यक्रमात युद्धाचा इशारा देतानाच, ऑस्ट्रेलिया व चीनमधील संबंध विकोपाला गेल्याची कबुलीही पंतप्रधान मॉरिसन यांनी दिली.

स्कॉट मॉरिसन

साऊथ चायना सी क्षेत्रात अमेरिका व चीन या दोन्ही देशांनी आपल्या लष्करी हालचाली तीव्र केल्या असून, त्यातून दोन देशांमध्ये कधीही संघर्षाचा भडका उडू शकतो, अशा स्वरूपाचे इशारे लष्करी अधिकारी तसेच तज्ञांकडून गेले काही दिवस सातत्याने देण्यात येत आहेत. अमेरिका व चीनमधील नेते दोन देशांमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याचेही संकेत देत आहेत. मात्र ऑस्ट्रेलियासारख्या आघाडीच्या देशाच्या पंतप्रधानांकडून थेट अमेरिका-चीन युद्धाबाबत झालेला उल्लेख लक्ष वेधून घेणारा ठरतो. युद्धाचा उल्लेख करतानाच ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी इंडो-पॅसिफिक क्षेत्राच्या सुरक्षिततेवरही आपली भूमिका मांडली.

स्कॉट मॉरिसन

‘इंडो पॅसिफिक क्षेत्राच्या सुरक्षिततेसाठी समविचारी देशांची आघाडी तयार करणे हे ऑस्ट्रेलियासाठी अत्यंत महत्त्वाचे असून आपले सरकार त्याला प्राधान्य देईल. गेल्या काही वर्षात या क्षेत्रात वेगाने लष्करीकरण सुरू असून इंडो-पॅसिफिक सामरिक स्पर्धेचे केंद्र बनला आहे. प्रादेशिक हक्कांचे वाद व त्यावरील तणाव वाढतो आहे’, असे सांगून पंतप्रधान मॉरिसन यांनी पुन्हा एकदा धोक्याची जाणीव करून दिली. चीनचा प्रबळ आर्थिक सत्ता म्हणून झालेला उदय जागतिक अर्थव्यवस्थेसाठी चांगला असला, तरी या आर्थिक प्रगतीबरोबर जबाबदारीही येते हे चीनने लक्षात ठेवायला हवे, या शब्दात ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी चीनला फटकारले.

ऑस्ट्रेलियाकडून अमेरिका-चीन युद्धाचे संकेत दिले जात असतानाच चीनकडून आक्रमक लष्करी हालचाली सुरू झाल्याचे समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वी तर चीनच्या नौदलाने आपल्या प्रगत ‘अँफिबियस ॲसॉल्ट शिप’च्या सागरी चाचण्यांना सुरुवात केली आहे. ‘टाईप ०७५’ म्हणून ओळखण्यात येणारी ही ‘अँफिबियस ॲसॉल्ट शिप’ जगातील सर्वात मोठी ‘अँफिबियस ॲसॉल्ट शिप’ असल्याचा दावा चीनकडून करण्यात आला आहे. या प्रकारातील अजून तीन ‘अँफिबियस ॲसॉल्ट शिप्स’ची उभारणी सुरू असून या युद्धनौकांच्या जोरावर साऊथ चायना सीवर वर्चस्व गाजवण्याचा चीनचा उद्देश असल्याचे सांगण्यात येते. ‘अँफिबियस ॲसॉल्ट शिप’च्या चाचणी पाठोपाठ चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने नुकताच लष्कराची अटॅक हेलिकॉप्टर्स व युद्धनौकेचा संयुक्त सराव घेतल्याचे उघड झाले. तैवानवरील हल्ल्याची तालीम हा हेतू यामागे होता, असा दावाही चीनच्या प्रसारमाध्यमांनी केला आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info