माजी राष्ट्राध्यक्ष निक्सन यांचे ‘चिनी भस्मासुराचे’ भाकित खरे ठरते आहे – परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांचा चीनविरोधात घणाघात

माजी राष्ट्राध्यक्ष निक्सन यांचे ‘चिनी भस्मासुराचे’ भाकित खरे ठरते आहे – परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांचा चीनविरोधात घणाघात

वॉशिंग्टन – ‘चीनच्या कम्युनिस्ट पार्टीला जगाचे दरवाजे खुले करून एका भस्मासुराची निर्मिती करीत असल्याची भीती मला वाटते आहे, असे भाकित अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी वर्तविले होते. चीनचा कम्युनिस्ट पार्टीच्या कारवायांकडे पाहिले तर हे भाकित दुर्दैवाने खरे होताना दिसत आहे’, अशा शब्दात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी चीनच्या सत्ताधारी राजवटीवर घणाघाती प्रहार केला. चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या कारवायांना विरोधात उभे ठाकण्याची हीच वेळ असून, जर आता आपण त्यांच्यासमोर गुडघे टेकले तर आपल्या भावी पिढ्यांवर कम्युनिस्ट पार्टीच्या दयेवर जगण्याची वेळ ओढवेल, अशा कठोर शब्दात पॉम्पिओ यांनी कम्युनिस्ट राजवटीच्या धोक्याची जाणीव करून दिली.

भाकित ,मेरिका, चीन

अमेरिकेसह जगभरात लाखो बळी घेणाऱ्या कोरोना साथीमागे चीनच सूत्रधार असल्याचा आरोप करून अमेरिकेने चीनच्या विरोधात आक्रमक राजनैतिक संघर्ष छेडला आहे. याच संघर्षा अंतर्गत अमेरिकी जनतेला चीनच्या कारस्थानाची माहिती करून देण्यासाठी प्रचार मोहीम आखण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ट्रम्प प्रशासनातील सर्वोच्च अधिकारी अमेरिकेतील विविध कार्यक्रमांमध्ये चीनबाबतची कठोर भूमिका मांडत आहेत. गेल्या महिन्याभरात अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन, तपासयंत्रणा ‘एफबीआय’चे प्रमुख ख्रिस्तोफर रे व अॅटर्नी जनरल विल्यम बार यांनी, आपल्या भाषणांमधून चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या कारवायांकडे लक्ष वेधले होते. परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी, कॅलिफोर्नियातील ‘द रिचर्ड निक्सन प्रेसिडेन्शियल लायब्ररी अँड म्युझियम’मध्ये केलेले वक्तव्य त्याचाच पुढचा टप्पा आहे.

‘कम्युनिस्ट चायना अँड फ्री वर्ल्डस् फ्युचर’ या शीर्षकाखाली अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलेल्या भाषणात माजी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचा उल्लेख लक्ष वेधून घेणारा ठरला आहे. चीनबरोबर कोणत्याही स्वरूपाचे राजनैतिक संबंध नसताना १९७२ साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी चीनला भेट दिली होती. निक्सन यांच्या या भेटीमागे, अमेरिकेतील ज्येष्ठ मुत्सद्दी व माजी परराष्ट्रमंत्री हेन्री किसिंजर यांचे प्रयत्न कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात येते. निक्सन दौऱ्यानंतर अमेरिका व चीनमध्ये सुरू झालेले सहकार्य, त्यावेळी सोव्हिएत रशियाविरोधात सुरू असलेल्या शीतयुद्धातील महत्त्वाचा टप्पा ठरला होता. या अमेरिका-चीन सहकार्याला जवळपास पाच दशके पूर्ण होत असतानाच, परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी निक्सन यांच्या वक्तव्याचा उल्लेख करून सदर सहकार्याची अखेर होत असल्याचे संकेत दिले आहेत.

भाकित ,मेरिका, चीन

आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी, चीनचा सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीच्या वर्चस्ववादी धोरणांकडे लक्ष वेधले. कोरोनाच्या साथीसह हॉंगकॉंग व झिंजिआंगमध्ये सुरू असलेली दडपशाही, व्यापारी लूट व चिनी लष्कराच्या आक्रमक हालचाली, हा सर्व कम्युनिस्ट पार्टीच्या विस्तारवादी कारवायांचा भाग असल्याची जाणीव अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांनी करून दिली. जगातील मुक्त व लोकशाहीवादी देशांनी याविरोधात उभे राहण्याची गरज असल्याचे पॉम्पिओ यांनी यावेळी सांगितले. ‘मुक्त व लोकशाहीवादी जगाने कम्युनिस्ट चीनला बदलण्यासाठी ठोस प्रयत्न केले नाहीत तर चीनची कम्युनिस्ट पार्टी आपल्याला बदलून टाकेल’, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

‘आपल्याला चीनचे सर्वेसर्वा शी जिनपिंग यांच्या स्वप्नातील चिनी जग नाही, तर मुक्त व स्वतंत्र २१वे शतक हवे आहे. त्यासाठी चीनशी आंधळेपणाने जुळवून घ्यायची जुनी चौकट बदलावीच लागेल. यापुढे हे चालणार नाही आणि पुन्हा माघार घेऊन त्याकडे परत जाताही येणार नाही’, असे सांगून अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांनी यापुढे अमेरिका-चीन संबंध पूर्वीप्रमाणे राहणार नाहीत असे स्पष्ट संकेत दिले. चिनी कम्युनिझमच्या घातक विषाणूकडे पाश्चात्य जगाने आतापर्यंत दुर्लक्ष केले. मात्र यापुढे इतर देशांप्रमाणे एक सर्वसाधारण देश म्हणून चीनशी व्यवहार करता येणार नाहीत, असेही पॉम्पिओ यांनी यावेळी बजावले.

भाकित ,मेरिका, चीन

कम्युनिस्ट नेहमीच खोटे बोलतात, असा आरोप करून चीनची कम्युनिस्ट पार्टी आणि चीनचे लष्कर हे चिनी जनतेशी बांधील नसल्याचा दावा अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांनी केला. कम्युनिस्ट पार्टीच्या कारवायांविरोधात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प व प्रशासनाने स्वीकारलेल्या कठोर धोरणाचा उल्लेख करताना पॉम्पिओ यांनी, ह्युस्टनमध्ये चिनी दूतावासावर टाकलेल्या बंदीची माहिती दिली. हा दूतावास चीनकडून सुरू असलेल्या हेरगिरी व बौद्धिक संपदेच्या चोरीचे केंद्र बनले होते, अशा शब्दात त्यांनी बंदीचे समर्थन केले.

अमेरिके परराष्ट्रमंत्र्यांनी चीनच्या कम्युनिस्ट राजवटीवर केलेल्या घणाघाती प्रहारांवर तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. ‘पॉम्पिओ यांचे वक्तव्य म्हणजे मुंगीकडून झाड हलविण्याचा निरर्थक प्रयत्न आहे. चीनविरोधात नवी मोहीम सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत’, अशी टीका चीनच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यांनी केली. अमेरिकेने ह्युस्टन दूतावासावर टाकलेल्या बंदीलाही चीनने प्रत्युत्तर दिले असून, अमेरिकेचा चेंगदू शहरातील दूतावास बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info