युरोपिय देशांसह ‘युएई’ला तुर्कीची धमकी

अंकारा – ‘भूमध्य समुद्रातील आपल्या सार्वभौम अधिकारांचे संरक्षण करण्यात तुर्की नक्कीच यशस्वी ठरेल आणि याबाबतच्या तुर्कीच्या दृढ निर्धारावर इतर कुणीही शंका घेऊ नये. तुर्कीची उपेक्षा करणे महागात पडू शकते’, असा इशारा तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी दिला. युरोपिय महासंघाचा इशारा धुडकावून तुर्कीने शनिवारपासून भूमध्य समुद्रात १२ दिवसांचा युद्धसराव सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर एर्दोगन यांनी ग्रीससह युरोपिय महासंघाला धमकावले. त्याचबरोबर ‘संयुक्त अरब अमिरात’च्या लढाऊ विमानांवर हल्ले चढविण्यात मागेपुढे पाहणार नसल्याची धमकी तुर्कीने दिली आहे.

तुर्कीची धमकी

आधुनिक तुर्कीचे संस्थापक म्हणून ओळखले जाणारे ‘मुस्तफा केमाल अतातुर्क’ यांनी १९२२ साली ग्रीसच्या सैन्याला पिटाळून तुर्कीला स्वतंत्र केलेल्या घटनेला रविवारी ९८ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने तुर्कीमध्ये ‘व्हिक्टरी डे’ साजरा केला जात असून राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी यावेळी ग्रीस व युरोपिय महासंघावर टीका केली. ‘आज भूमध्य समुद्रावरील तुर्कीचा सार्वभौम अधिकार डावलण्यासाठी ज्या देशाकडून प्रयत्‍न सुरू आहेत, त्याच देशाने शतकभरापूर्वी तुर्कीवर आक्रमण केले होते. शतकभरापूर्वी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी तुर्कीला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला होता. आजही तुर्की आपल्या स्वातंत्र्याला आव्हान देणार्‍यांना इतिहासाची आठवण करुन देण्यास कचरणार नाही’, अशा शब्दात एर्दोगन यांनी ग्रीसला धमकावले. भूमध्य समुद्रातील तुर्कीच्या या निर्धारावर कुणीही शंका घेऊ नये, असे सांगून एर्दोगन यांनी युरोपिय महासंघावर निशाणा साधला.

तुर्कीची धमकी

तर, ‘एकीकडे भूमध्य समुद्रातील वादावर तुर्कीला चर्चेचा प्रस्ताव देणारे युरोपिय महासंघ दुसरीकडे तुर्कीवर निर्बंधांची कारवाई करण्याचा इशारा देत आहे. यातून युरोपिय महासंघाचा ढोंगीपणा उघड होत आहे’, अशी जळजळीत टीका तुर्कीचे उपराष्ट्राध्यक्ष फौत ओक्ते यांनी केली. त्याचबरोबर ‘शांती आणि राजनैतिक वाटाघाटींच्या स्तरावर तुर्की पारंगत आहे. पण तुर्कीचे अधिकार आणि हितसंबंधांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होतो, तेव्हा तुर्की कधीच मागे हटत नाही. ग्रीस आणि फ्रान्सला याची पुरेपूर माहिती आहे’, असे तुर्कीच्या उपराष्ट्राध्यक्षांनी म्हटले आहे. त्याचबरोबर युरोपिय महासंघाने दिलेला इशारा डावलून भूमध्य समुद्रात युद्धसराव सुरू केल्याचे तुर्कीने जाहीर केले. शनिवारपासून सुरू झालेला हा युद्धसराव ११ सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार आहे.

तुर्कीची धमकी

याआधीच भूमध्य समुद्रातील क्रेटे बेटावर ग्रीस आणि ‘संयुक्त अरब अमिरात’च्या (युएई) लढाऊ विमानांचा युद्धसराव सुरू झाला आहे. या युद्धसरावाच्या पहिल्या दिवशी ग्रीस आणि तुर्कीची लढाऊ विमाने आमनेसामने आल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यातच ग्रीसबरोबरच्या युद्धसरावात सहभागी झालेल्या ‘युएई’च्या लढाऊ विमानांनाही तुर्कीने धमकावले आहे. युएईच्या लढाऊ विमानांनी तुर्कीच्या जहाजांच्या जवळून भरारी घेण्याची किंवा सागरी क्षेत्रात प्रवेश करण्याची चूक केली तर या विमानांवर हल्ले चढविण्यापासून अजिबात कचरणार नसल्याचे तुर्कीने धमकावले आहे.

दरम्यान, नाटोचे सदस्य असलेल्या तुर्की आणि ग्रीसमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून तणाव प्रचंड प्रमाणात वाढला आहे. त्यात लिबियातील संघर्ष आणि भूमध्य समुद्रातील इंधनवायूच्या साठ्यावरुन या दोन्ही देश संघर्षाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत. काही दिवसांपूर्वी तुर्कीने सदर सागरी क्षेत्रावर आपला सार्वभौम अधिकार असल्याचे सांगून इंधनाच्या उत्खननासाठी जहाज रवाना केले. त्याचबरोबर ग्रीस, सायप्रस या देशांना धमकावण्यासही सुरुवात केली आहे. तुर्कीच्या या आक्रमकतेविरोधात युरोपिय देशांमध्ये नाराजी असून फ्रान्सने उघडपणे याविरोधात तुर्कीला ‘रेड लाईन्स’ न ओलांडण्याचे बजावले आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info