वॉशिंग्टन/बीजिंग – चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे महासचिव शी जिनपिंग यांनी तिबेटमधील बौद्ध धर्माचे चिनीकरण करण्यासंदर्भात केलेले वक्तव्य व त्या भागात सुरू असलेल्या हालचाली तीव्र चिंताजनक असल्याची टीका अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी केली. तिबेटी नेते डॉ. लॉबसांग सांगेय यांनीही जिनपिंग यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली असून, चीनने तिबेटी संस्कृतीचा संहार करण्याचा डाव आखल्याचा आरोप केला आहे. गेल्या आठवड्यात चीनच्या कम्युनिस्ट पार्टीची तिबेट मुद्द्यावर विशेष बैठक झाली होती. त्यात राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी, तिबेटमधील बौद्ध धर्म चीनमधील समाजवादी व्यवस्थेच्या अनुषंगाने विकसित व्हायला हवा, अशी विचित्र मागणी केली होती.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आपले विस्तारवादी धोरण पुढे रेटणाऱ्या चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने आंतरराष्ट्रीय करार धुडकावत जबरदस्तीने हॉंगकॉंगचा ताबा घेतला आहे. त्याचवेळी तैवानसह साऊथ चायना सी क्षेत्रातील भाग गिळंकृत करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. चीनच्या या कारवायांमुळे आंतरराष्ट्रीय समुदायात तीव्र नाराजीची भावना असून अनेक देशांनी उघडपणे विरोध करण्यास सुरुवात केली आहे. तिबेटसह उघुरवंशीयां विरोधातील चीनचे धोरण तीव्र चिंतेचा विषय असल्याची जाणीव अमेरिकेसह युरोपीय देश तसेच जपान, ऑस्ट्रेलिया व भारतासारख्या प्रमुख देशांनी करून दिली आहे. अमेरिकेच्या संसदेत स्वतंत्र तिबेटच्या मुद्द्यावर विधेयकही दाखल करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर, चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्याकडून तिबेटमध्ये ‘चिनी’करणाची नवी मोहीम सुरू करण्यासंदर्भात देण्यात आलेले संकेत लक्ष वेधून घेणारे ठरतात. गेल्या आठवड्यात चीनच्या कम्युनिस्ट पार्टीने बीजिंगमध्ये ‘सेव्हन्थ सेंट्रल सिम्पोसिअम ऑन तिबेट’ या नावाने बैठकीचे आयोजन केले होते. त्यात जिनपिंग यांनी, तिबेटच्या स्थैर्यासाठी चीनने एक अभेद्य किल्ला उभारण्याची गरज असल्याचा दावा केला. ‘चीनची सुरक्षा मजबूत करण्यासाठी तिबेटमधील विघटनवादी चळवळी रोखणे गरजेचे असून त्यासाठी या भागातील जनतेला शिक्षित करण्याची आवश्यकता आहे. नवा आधुनिक समाजवादी तिबेट निर्माण करण्याची गरज असून, त्यासाठी शैक्षणिक सुधारणा करायला हव्यात. तिबेट मधील बौद्ध धर्माने समाजवादी व्यवस्थेशी जुळवून घ्यायला हवे आणि तिबेटी बौद्ध धर्माचे चिनीकरण करण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे’, असे आवाहन शी जिनपिंग यांनी केले.
चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने यापूर्वीच तिबेटचा भूभाग गिळंकृत करुन इथल्या जनतेचे मुलभूत, राजकीय व धार्मिक अधिकारही नाकारले आहेत. तसेच तिबेटच्या वैशिष्ट्यपूर्ण धार्मिक संस्कृतीचा संहार करण्याचे धोरण चीनच्या सत्ताधारी राजवटीकडून राबविण्यात आहे. तिबेटींच्या स्वातंत्र्याची नाही तर, स्वायत्ततेची मागणीही चीनने धुडकावून लावली आहे. आपल्या आर्थिक, राजकीय व लष्करी बळाच्या जोरावर चीनने आजवर तिबेटी जनतेचा आवाज दडपला असला तरी गेल्या काही महिन्यात परिस्थिती बदलत असल्याचे दिसू लागले आहे. त्यामुळे चीनच्या सत्ताधारी राजवटीने पुन्हा एकदा तिबेट गिळंकृत करण्यासाठी आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केल्याचे जिनपिंग यांच्या वक्तव्यावरून दिसते. या वक्तव्यावर अमेरिका तसेच तिबेटी गटांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
‘महासचिव जिनपिंग यांच्याकडून तिबेटी बौद्ध धर्माचे चिनीकरण व विघटनवादी चळवळीविरोधातील संघर्षाबाबत करण्यात आलेली वक्तव्ये अमेरिकेसाठी तीव्र चिंतेचा विषय आहेत. चीनकडून तिबेटमध्ये सुरू असलेल्या कारवायांकडेही अमेरिकेचे लक्ष आहे. तिबेटी नेते दलाई लामांबरोबर विनाअट चर्चा सुरू करून चीनने आपले मतभेद मिटवावेत, अशी अमेरिकेची मागणी आहे’, या शब्दात अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांनी चीनला फटकारले. भारतातील ‘तिबेटन गव्हर्मेंट इन एक्झाईल’चे प्रमुख डॉ. लॉबसांग सांगेय यांनीही जिनपिंग यांच्या योजनेवर तीव्र टीकास्त्र सोडले आहे.
‘तिबेटी जनतेसाठी चीनच्या कम्युनिझमपेक्षा बौद्ध धर्म जास्त महत्त्वाचा आहे. तिबेटी जनतेवर धर्मापेक्षा कम्युनिझमला जास्त महत्त्व देण्यासाठी जबरदस्ती करणे, हे धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन ठरते. हा तिबेटची सांस्कृतिक व धार्मिक ओळख संपविण्याचा प्रयत्न आहे. मात्र तिबेटी बौद्ध धर्माचे चिनीकरण कधीच यशस्वी ठरणार नाही’, अशी टीका डॉ. लॉबसांग सांगेय यांनी केली. ‘ह्युमन राईट्स वॉच’, ‘ स्टुडंट्स फॉर फ्री तिबेट’ व ‘इंटरनॅशनल कॅम्पेन फॉर तिबेट’ यासारख्या गटांनीही जिनपिंग यांच्या योजनेवर असंतोष व्यक्त केला आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |