Breaking News

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून रशियाबरोबरील सहकार्याचे समर्थन

हेल्सिन्की – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याबरोबरील आपली चर्चा यशस्वी ठरली, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. सिरिया, युक्रेन, चीन व व्यापारयुद्ध आणि अण्वस्त्रांचे साठे, असे महत्त्वाचे विषय या चर्चेत होते, अशी माहिती राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिली. महत्त्वाचे म्हणजे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी २०१६ सालच्या अमेरिकेतील निवडणुकीत रशियाने हस्तक्षेप केलेला नाही, असा निर्वाळा दिला आहे. यावर अमेरिकेतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र ट्रम्प यांनी त्याची पर्वा न करता अण्वस्त्रांचे सर्वाधिक साठे असलेल्या अमेरिका आणि रशियाने भविष्यातील सहकार्याकडे लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन केले आहे.

अमेरिका आणि रशिया

फिनलंडच्या हेल्सिन्की येथे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि राष्ट्रध्यक्ष पुुतिन यांची चर्चा पार पडली. या चर्चेत महत्त्वाच्या विषयांचा समावेश होता. मात्र या विषयांपेक्षाही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी २०१६ सालच्या निवडणुकीतील रशियाच्या हस्तक्षेपाबाबत केलेली विधानेच अधिक प्रमाणात गाजत आहेत. अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने २०१६ सालच्या निवडणुकीत रशियाने हस्तक्षेप केल्याचे दावे केले होते. तसेच यासंदर्भात सबळ पुरावे आढळल्याचेही काही अमेरिकी अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. मात्र हेल्सिन्की येथे बोलताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी रशियन राष्ट्राध्यक्षांनी आपल्याबरोबरील चर्चेत हे आरोप नाकारल्याची माहिती दिली. तसेच आपला त्यांच्या बोलण्यावर पूर्ण विश्‍वास असल्याचेही ट्रम्प यांनी सांगून टाकले.

‘आम्ही राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जोरदार प्रचारमोहीम हाती घेतली होती आणि त्याला यश मिळाले म्हणून मी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करून राष्ट्राध्यक्षपदावर आलो’, असे सांगून ट्रम्प यांनी आपल्या विजयामागे रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा हात असल्याचा आरोप धुडकावला. त्यांच्या या विधानावर अमेरिकेतून जोरदार टीका होत आहे. ट्रम्प यांना आधीपासूनच लक्ष्य करणारी माध्यमे त्यांच्यावर तुटून पडली असून हेल्सिन्की येथील ट्रम्प यांची कामगिरी लाजिरवाणी असल्याची टीका अमेरिकी माध्यमे करीत आहेत. मात्र ट्रम्प यांनी या टीकेची पर्वा न करता, अमेरिका व रशियामध्ये उत्तम सहकार्य प्रस्थापित करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला.

अमेरिका आणि रशिया हे अण्वस्त्रांचे सर्वाधिक साठे असलेले देश आहेत. म्हणूनच या देशांमधील सहकार्य अत्यंत आवश्यक असल्याचे सांगून उभय देशांनी आधी काय झाले, यावर विचार करण्यात शक्ती खर्च करण्यापेक्षा भविष्यातील सहकार्याकडे लक्ष केंद्रित करावे, अशी अपेक्षा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केली. तसेच २०१६ सालच्या निवडणुकीत रशियाने हस्तक्षेप केला होता, या आरोपाचा पिंजर्‍यात उभय देशांचे संबंध कैद करता येऊ शकत नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. दरम्यान, यावेळी उभय नेत्यांनी अनेक आघाड्यांवर सहकार्याची भूमिका घेतली असून यामध्ये दहशतवादविरोधी कारवायांचा समावेश आहे. इस्लामधर्मिय कट्टरपंथियांचा प्रभाव रोखण्यासाठी अमेरिका व रशियामधला संवाद वाढविण्यावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे एकमत झाले आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info