इस्रायलबरोबरील द्विपक्षीय सहकार्यामुळे युएई व बहारिन असुरक्षित बनले आहेत – इराणची धमकी

इस्रायलबरोबरील द्विपक्षीय सहकार्यामुळे युएई व बहारिन असुरक्षित बनले आहेत – इराणची धमकी

तेहरान – ‘संयुक्त अरब अमिरात’ युएई आणि बहारिनने इस्रायलबरोबर द्विपक्षीय सहकार्य करुन स्वत:ला असुरक्षित बनविले आहे. यापुढे इस्रायलने या क्षेत्रात एखादी चिथावणीखोर कारवाई केली तर त्याची जबाबदारी या दोन्ही देशांवर असेल. यासाठी इराण युएई आणि बहारिन यांच्यावर कारवाई केल्याखेरीज राहणार नाही, अशी धमकी इराणने दिली आहे. दोन दिवसांपूर्वी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डसने बहारिनचे राजे ‘हमाद बिन इसा अल खलिफा’ यांना इस्रायलबरोबरील संबंधांवरुन धमकावले होते.

द्विपक्षीय सहकार्य

अवघ्या महिन्याभरात युएई आणि बहारिन या अरब देशांनी इस्रायलशी संबंध सुरळीत करण्यासंबंधी घेतलेल्या निर्णयाने इराण अस्वस्थ झाला आहे. या अस्वस्थतेमुळे इराणने आपल्या शेजारी अरब देशांना धमकावण्याचे सत्र सुरू केले आहे. इराणच्या संसदेतील ‘राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण समिती’ने युएई आणि विशेषत: बहारिनला गंभीर परिणामांचा घडामोडींसाठी इशारा दिला. अमेरिकेशी मैत्री असणार्‍या युएई आणि बहारिन यांच्या सुरक्षेला याआधीही धोका होता. पण इस्रायलशी जुळवून घेतल्यामुळे युएई आणि बहारिनच्या सुरक्षेला इराणकडून असलेला धोका अधिकच वाढल्याचे इराणच्या संसदीय समितीने धमकावले. बहारिनमधील राजे ‘हमाद बिन इसा अल खलिफा’ यांची राजवट अमेरिकेच्या हातातील बाहुले असून इस्रायलशी मैत्री केल्यामुळे बहारिनमधील राजवट लवकर कोसळणार असल्याचा दावा इराणच्या संसदीय समितीने केला.

द्विपक्षीय सहकार्य

बहारिनने इस्रायलशी द्विपक्षीय सहकार्य प्रस्थापित करण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयानंतर गेल्या चार दिवसात इराणने बहारिनला दिलेली ही दुसरी धमकी ठरते. याआधी शनिवारी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डसने बहारिनच्या जनतेला राजे खलिफा यांच्या राजवटीविरोधात बंड पुकारण्याची चिथावणी दिली होती. ‘जेरूसलेमला स्वतंत्र्य करण्यासाठी संघर्ष करणार्‍या पॅलेस्टिनी मुजाहिद्दींपासून बहारिनच्या राजवटीला जबर प्रत्युत्तर मिळेल’, अशी धमकी रिव्होल्युशनरी गार्डसने दिली. बहारिन तसेच पॅलेस्टाईमध्ये देखील बहारिनच्या राजवटीविरोधात निदर्शने सुरू झाली आहेत.

याआधी २०११ साली अरब-इस्लामी देशांमध्ये आलेल्या अरब स्प्रिंगच्या काळात इराणने बहारिनमधील खलिफा राजवट उलथण्याचा प्रयत्न केला होता. पण सौदी अरेबियाने खलिफा राजवटीला दिलेल्या पाठिंब्यामुळे इराणचा डाव फसला होता. तसाच प्रयत्‍न इराण यावेळीही करील, असा दावा आखाती विश्लेषक व युरोपिय माध्यमे करीत आहेत. तर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डसनी दिलेल्या या धमकीवर इस्रायलच्या लष्करी विश्लेषकांनी चिंता व्यक्त केली आहे. सागरी क्षेत्राचा वापर करुन इराण बहारिनमध्ये ‘टेरर सेल’ उभारून येथील इस्रायली नागरिकांवर हल्ले चढविल, अशी भीती इस्रायली विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, बहारिनला दिलेल्या या धमकीबरोबरच इराणने होर्मूझच्या आखातात नौदल सराव सुरू केला आहे. त्याचबरोबर अमेरिकेच्या युद्धनौकांनी या युद्धसरावापासून दूर रहावे, असेही इराणने धमकावले आहे. या युद्धसरावाच्या निमित्ताने इराण होर्मूझच्या आखातात ‘लाईव्ह फायरिंग’चा सराव करीत असून या सरावामुळे जगभरातील दोन तृतियांश इंधनाचा व्यापार करणार्‍या या सागरी क्षेत्रातील तणाव वाढला आहे.

हिंदी  English

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info