चिनी विमानांच्या वाढत्या घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर तैवानकडून ‘लाईव्ह फायर’ युद्धसराव

चिनी विमानांच्या वाढत्या घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर तैवानकडून ‘लाईव्ह फायर’ युद्धसराव

तैपेई – चीनच्या लढाऊ तसेच टेहळणी विमानांनी गेल्या नऊ दिवसात तब्बल ४६ वेळा तैवानच्या हवाईहद्दीत घुसखोरी केल्याची माहिती तैवानच्या संरक्षण विभागाने दिली. ही बाब चीनच्या चिथावणीखोर कारवायांची तीव्रता वाढल्याचे संकेत देणारी असल्याची टीका तैवानच्या संरक्षण विभागाने केली आहे. चीनच्या या कारवायांपुढे न झुकता त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी तैवाननेही युद्धसज्ज होण्याची तयारी केली असून, नव्या लष्करी सरावाला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर चीनचे सरकारी मुखपत्र ‘ग्लोबल टाईम्स’ने तैवानला पुन्हा एकदा युद्धाची धमकी दिल्याचे समोर आले आहे.

'लाईव्ह फायर'

गेल्याच आठवड्यात अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे वरिष्ठ अधिकारी किथ क्रॅक यांनी तैवानला भेट दिली होती. क्रॅक यांचा दौरा सुरू असतानाच दोन दिवसात चीनच्या लढाऊ व टेहळणी विमानांनी तब्बल ३७ वेळा तैवानच्या हद्दीत घुसखोरी केल्याचे उघड झाले होते. त्यानंतरही चीनकडून तैवानच्या हद्दीत घुसखोरी सुरू असल्याचे नव्या माहितीतून समोर आले आहे. अमेरिकी अधिकाऱ्यांच्या भेटीपासून ते गुरुवार २४ सप्टेंबर या नऊ दिवसांच्या कालावधीत चीनच्या विमानांनी तब्बल ४६ वेळा तैवानच्या हद्दीत घुसखोरी केली. घुसखोरी करणाऱ्या विमानांमध्ये लढाऊ विमाने, टेहळणी विमाने तसेच ‘अँटी सबमरीन एअरकराफ्ट्स’चा समावेश होता, अशी माहिती तैवानच्या संरक्षण विभागाने दिली. घुसखोरीच्या या घटना चीनच्या चिथावणीखोर कारवायांची तीव्रता वाढल्याचे दाखवून देतात, या शब्दात तैवानने टीकास्त्र सोडले आहे.

विमानांच्या घुसखोरीच्या माध्यमातून तैवानवर दबाव टाकणे सुरू असतानाच चीनच्या माध्यमांनीही धमक्यांचे सत्र सुरूच ठेवले आहे. चीनचे सरकारी मुखपत्र असणाऱ्या ‘ग्लोबल टाईम्स’ने तैवानला पुन्हा एकदा युद्धाची धमकी दिली. चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने नुकत्याच तैवाननजीक केलेल्या युद्धसरावात दोन विमानवाहू युद्धनौकांचा समावेश होता व या विमानवाहू युद्धनौका तैवानचा ताबा घेण्यात महत्त्वाची भूमिका निभावू शकतात, असे ‘ग्लोबल टाईम्स’च्या लेखात बजावण्यात आले आहे. त्याचवेळी चीनच्या विमानांनी तैवानच्या हद्दीजवळ केलेली उड्डाणे हा तैवानसाठी इशारा असून ही विमाने कोणत्याही क्षणी पुढचे पाऊल उचलू शकतात, असा इशारा चीनच्या मुखपत्राने दिला आहे.

'लाईव्ह फायर'

चीनकडून सुरू असलेल्या चिथावणीखोर कारवाया व धमक्यांच्या पार्श्वभूमीवर तैवाननेही आपल्या सज्जतेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. चीनच्या सीमेपासून जवळ असलेल्या ‘मात्सु’ बेटावर तैवानच्या ‘लाईव्ह फायर’ युद्धसराव सुरू केला आहे. या युद्धसरावात ‘अँटी एअरक्राफ्ट गन्स’, ‘हॉवित्झर्स’, ‘मोर्टर्स’ यांचा समावेश असल्याची माहिती तैवानच्या डिफेन्स कमांडने दिली. या युद्धसरावात सागरी किनाऱ्यावरील हल्ले, जहाजांविरोधातील कारवाई व ‘एअर डिफेन्स टार्गेट्स’ यांचा सराव करण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्सु बेटावरील कमांड चीनविरोधातील ‘फ्रंटलाईन डिफेन्स’चा भाग असल्याचे मानले जाते. त्यामुळे हा युद्धसराव लक्ष वेधून घेणारा ठरतो.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info