येरेवान/बाकु – मध्य आशियातील आर्मेनिया व अझरबैजानमध्ये भडकलेल्या युद्धात ५० हून अधिक जवानांचा बळी गेला असून शेकडो जखमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. रविवारी झालेला संघर्ष हा आर्मेनियाच्या स्वातंत्र्य व स्वाभिमानावरील हल्ला असल्याचा आरोप आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिनयान यांनी, केला असून आर्मेनियाची जनता युद्धासाठी तयार असल्याचा इशारा दिला. तर अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इलहाम अलियेव्ह यांनी, अझरबैजानी लष्कर मातृभूमीसाठी लढत असून विजय आमचाच होईल, असा दावा केला. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंसाचार थांबविण्यासाठी मध्यस्थीची तयारी दर्शवली असून, तुर्कीने मात्र आंतरराष्ट्रीय प्रयत्न अपयशी ठरल्याचा दावा करून आर्मेनियाला धमकावले आहे.
रविवारी पहाटेपासून आर्मेनिया व अझरबैजानमध्ये असलेल्या ‘नागोर्नो -कॅराबख’ या वादग्रस्त भागात जबरदस्त संघर्ष भडकला आहे. दोन्ही देशांनी मोठ्या प्रमाणात लष्कर उतरविण्यात आले असून, कायमचा निकाल लागेपर्यंत संघर्ष चालू राहील, असे बजावले आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही दोन्ही बाजूंकडून जोरदार हल्ले सुरू असून प्रतिस्पर्ध्यांची प्रचंड हानी केल्याचे दावे केले आहेत. अझरबैजानचे ४३ रणगाडे, २७ ड्रोन्स व चार हेलिकॉप्टर्स उद्ध्वस्त केल्याची माहिती आर्मेनियाने दिली. त्याचवेळी अझरबैजानचे अनेक जवान ठार झाल्याचाही दावा केला असून आपल्या ३० हून अधिक जवानांचा बळी गेल्याचेही सांगितले आहे. तर आर्मेनियाचे २२ रणगाडे, १८ ड्रोन्स व १५ ‘एअर डिफेन्स सिस्टिम्स’ नष्ट केल्याचे अझरबैजानकडून सांगण्यात आले.
दोन्ही बाजूंच्या हल्ल्यात २०हून अधिक नागरिकांचाही बळी गेला असून, शेकडो जण जखमी झाल्याचे सांगण्यात येते. ‘नागोर्नो -कॅराबख’मधील हजारो नागरिकांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर बहुतांश देशांनी हिंसाचार रोखण्यासाठी दोन्ही बाजुंना आवाहन केले आहे. यात रशियासह, अमेरिका व युरोपचाही समावेश आहे. मात्र तुर्कीने अझरबैजानला पाठिंबा देत आक्रमक भूमिका घेतली असून, आर्मेनियाला माघारीसाठी धमकावण्यास सुरुवात केली आहे.
‘गेली ३० वर्षे नागोर्नो -कॅराबख मुद्दा सोडविण्यासाठी जागतिक पातळीवर सुरू असलेल्या वाटाघाटी पूर्ण अपयशी ठरल्या आहेत. या भूभागावरील आक्रमणामुळे जी समस्या निर्माण झाली आहे, ती कायमची निकालात काढण्याची वेळ आली आहे’, अशी धमकी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी दिली. तुर्कीने अझरबैजानला मोठ्या प्रमाणात लष्करी सहाय्य पुरविल्याचे दावेही समोर आले असून, सिरियन बंडखोरांच्या तुकड्या अझरबैजानमध्ये दाखल होत असल्याचे व्हिडीओही प्रसिद्ध झाले आहेत. तुर्कीने गेल्याच महिन्यात अझरबैजानबरोबर मोठा लष्करी सरावही केला होता. त्यामुळे या नव्या संघर्षामागे तुर्कीचा हात असावा, असेही मानले जाते. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, आर्मेनिया-अझरबैजान संघर्षात मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली आहे.
यापूर्वी १९९१ ते १९९४ या कालावधीत आर्मेनिया-अझरबैजान झालेल्या युद्धात जवळपास ३० हजार जणांचा बळी गेला होता. तर २०१६ साली झालेल्या युद्धात २०० हून अधिक जण ठार झाले होते. या दोन्ही युद्धात रशियाने मध्यस्थी केली असली तरी संघर्षबंदीचा करार घडवून आणण्यात रशियाला यश आले नव्हते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |