Breaking News

सिरियातील इराणच्या ठिकाणांवर इस्रायलचे जोरदार हवाई हल्ले – आपल्या मालवाहू जहाजावरील हल्ल्याला इस्रायलने प्रत्युत्तर दिले

दमास्कस/जेरूसलेम – सिरियाची राजधानी दमास्कसजवळ इस्रायलने हल्ले चढविल्याचा आरोप सिरियन माध्यमांनी केला. या हल्ल्यात किती नुकसान झाले, याचे तपशील सिरियन लष्कर किंवा माध्यमांनी दिलेले नाही. पण दमास्कसमधील इराणच्या लष्करी तळांना इस्रायलने लक्ष्य केल्याचा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत. गेल्या आठवड्यात ओमानच्या आखातात इस्रायली मालवाहू जहाजात झालेल्या स्फोटाला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने ही कारवाई केल्याचे इस्रायली माध्यमांनी म्हटले आहे.

सोमवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी ‘हेलियॉस रे’ या मालवाहू जहाजातील गूढ स्फोटासाठी स्पष्टपणे इराण जबाबदार असल्याचा आरोप केला. ‘इराण हा इस्रायलचा सर्वात मोठा शत्रू आहे व इस्रायल इराणला आखातात सर्व ठिकाणी ठोकून काढले आहे’, असेही पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी इस्रायली वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. नेमक्या कुठल्या भागात इस्रायलने इराणवर कारवाई केली, याचा खुलासा करण्याचे इस्रायलच्या पंतप्रधानांनी टाळले.

पण या मुलाखतीच्या काही तास आधी, रविवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास राजधानी दमास्कसजवळ इस्रायलने हवाई हल्ले चढविल्याचा आरोप सिरियन माध्यमांनी केला आहे. वेळीच हवाई सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केल्यामुळे कित्येक क्षेपणास्त्रे हाणून पाडल्याचे सिरियन लष्कराने म्हटले आहे. याआधीही इस्रायलचे हवाई हल्ले यशस्वीरित्या उधळल्याचे दावे सिरियन लष्कराने केले होते. पण इस्रायलच्या हल्ल्यांमध्येे इराण आणि इराणसंलग्न गटांचे दहशतवादी ठार झाल्याची माहिती सिरियातील मानवाधिकार संघटनांनी प्रसिद्ध केली होती. त्यामुळे रविवारी रात्रीच्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तविण्यात येते. इस्रायली लष्कराने नेहमीप्रमाणे सिरियन माध्यमांमध्ये प्रसिद्ध होणार्‍या बातम्यांवर खुलासे देण्याचे टाळले आहे. मात्र रविवारी सकाळी इस्रायलच्या सुरक्षा समितीची विशेष बैठक पार पडली. ओमानच्या आखातात इस्रायली जहाजावर झालेल्या स्फोटाला उत्तर देण्याबाबत यावेळी चर्चा झाल्याचा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत.

दरम्यान, ‘हेलियॉस रे’ या इस्रायली जहाजावर झालेल्या गूढ स्फोटामागे आपण नसल्याचे इराणचे नेते गेल्या दोन दिवसांपासून सांगत आहेत. पण इराणच्या राजकारणात सर्वाधिकार असलेल्या सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांच्याशी संलग्न असलेल्या वर्तमानपत्राने इराणनेच इस्रायली जहाजावर हल्ला चढविल्याचे मान्य केले. सिरिया आणि इराकमधील इराण व इराणसंलग्न गटांवर होणार्‍या हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी हा हल्ला चढविल्याचे या इराणी वर्तमानपत्राने म्हटले आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info