अमेरिका तैवानला ४०० ‘अँटी शिप क्रूझ मिसाईल्स’ पुरविणार – चीनकडून अमेरिकी कंपन्यांवर निर्बधांचा इशारा

अमेरिका तैवानला ४०० ‘अँटी शिप क्रूझ मिसाईल्स’ पुरविणार – चीनकडून अमेरिकी कंपन्यांवर निर्बधांचा इशारा

तैपेई/वॉशिंग्टन – चीनच्या धमकावण्यांकडे दुर्लक्ष करीत अमेरिकेने तैवानला तब्बल ४०० ‘अँटी शिप क्रूझ मिसाईल्स’ पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने ही माहिती दिली असून, त्यानुसार २.३७ अब्ज डॉलर्सची ‘हार्पून’ क्षेपणास्त्रे देण्यात येणार आहेत. चार दिवसांपूर्वीच अमेरिकेने तैवानला हवेतून जमिनीवर मारा करणार्‍या १३५ क्षेपणास्त्रांनी सज्ज करण्याचा निर्णय जाहीर केला होता. अमेरिकेकडून तैवानला एकामागोमाग पुरविण्यात येणाऱ्या या क्षेपणास्त्रांमुळे चीन बिथरला असून, अमेरिकेच्या संरक्षण कंपन्यांवर निर्बंध टाकण्याचा इशारा दिला आहे.

‘ऐंटी शिप क्रूज़ मिसाइल’

गेल्या काही महिन्यात अमेरिकेने तैवानची संरक्षणसज्जता वाढविण्याच्या हालचालींना वेग दिला आहे. दोन आठवड्यांपूर्वीच अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने तैवानला नवी शस्त्रास्त्रे विकण्यास मंजुरी दिली होती. त्यात ‘हायमार्स’ ही रॉकेट यंत्रणा, ‘स्लॅम-इआर’ ही हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे व ‘एफ-१६’ लढाऊ विमानांसाठी ‘एक्सटर्नल सेन्सर पॉड्स’ यांचा समावेश होता. ऑगस्ट महिन्यात अमेरिकेने तैवानला ६६ प्रगत ‘एफ-१६ व्ही’ लढाऊ विमाने देण्याच्या करारावरही स्वाक्षऱ्या केल्या होत्या. याव्यतिरिक्त ड्रोन्स, स्मार्ट माईन्स व पॅलाडिन हॉवित्झर्स यांच्यासाठीही बोलणी सुरू असल्याची माहिती तैवानने दिली होती. या पार्श्वभूमीवर, ‘हार्पून’ क्षेपणास्त्रे देण्याचा निर्णय लक्ष वेधून घेणारा ठरतो.

‘ऐंटी शिप क्रूज़ मिसाइल’

‘हार्पून ब्लॉक २’ ही सबसोनिक प्रकारातील जहाजविरोधी क्षेपणास्त्रे असून त्यांचा पल्ला सुमारे २८० किलोमीटर्सचा आहे. पाण्यापासून अगदी कमी उंचीवरून मारा करण्यात सक्षम असलेले हे ‘हार्पून’ क्षेपणास्त्रभेदी यंत्रणांना चकवा देऊ शकते. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने ४०० क्षेपणास्त्रांसह १०० सिस्टिम लाँचर युनिट्स, २५ रडार ट्रक्स व सुटे भाग देण्यासही मंजुरी दिली आहे. अमेरिकेने यापूर्वीही तैवानला क्षेपणास्त्रे पुरवली असली तरी एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रे देण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी दिलेली क्षेपणास्त्रे तसेच तैवानने विकसित केलेली स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे आणि हार्पून या सर्वांच्या बळावर तैवान चीनविरोधात प्रभावी ‘डिफेन्स वॉल’ उभारू शकेल, असा दावा विश्लेषकांकडून करण्यात येतो.

दरम्यान, अमेरिकेकडून एकापाठोपाठ तैवानला देण्यात येणाऱ्या शस्त्रहाय्यावर चीन चांगलाच बिथरला आहे. यापूर्वी अमेरिकेला देण्यात आलेल्या इशाऱ्यांचा काहीही परिणाम झाला नसल्याने चीनने आता अमेरिकी कंपन्यांना लक्ष्य करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या संरक्षण क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या असणाऱ्या ‘लॉकहिड मार्टिन’, ‘बोईंग’ व ‘रेथॉन’ वर निर्बंध लादण्याचा इशारा चीनच्या परराष्ट्र विभागाने दिला. चीनच्या राष्ट्रीय हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते झाओ लिजिअन यांनी सांगितले.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info