‘किन स्वोर्ड’द्वारे अमेरिका व जपानचा चीनला खणखणीत इशारा

‘किन स्वोर्ड’द्वारे अमेरिका व जपानचा चीनला खणखणीत इशारा
टोकिओ – तब्बल ४६ हजार जवान, विमानवाहू युद्धनौका, हेलिकॉप्टर कॅरिअर व लढाऊ विमानांचा समावेश असलेल्या ‘किन स्वोर्ड’ युद्धसरावाच्या माध्यमातून अमेरिका व जपानने चीनला खणखणीत इशारा दिला आहे. गेल्या वर्षभरात चीनने आपले संरक्षणसामर्थ्य प्रचंड प्रमाणात वाढविले असून लष्करी हालचालींनाही वेग दिला आहे. या बळावर चीनकडून शेजारी देशांच्या हद्दीत घुसखोरी करून त्यांना धमकविण्याचे व दडपण आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चीनच्या या वर्चस्ववादी कारवायांना अमेरिकेसह शेजारी देश उघड आव्हान देत असून, नवा युद्धसराव त्याचाच भाग आहे.
‘किन स्वोर्ड’
सोमवारी जपानच्या सागरी हद्दीत ‘किन स्वोर्ड २१’ या संयुक्त युद्धसरावाला सुरुवात झाली. या युद्धसरावात,  अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका ‘युएसएस रोनाल्ड रिगन’, ‘कॅरिअर स्ट्राईक ग्रुप’, १००हून अधिक लढाऊ व लष्करी विमाने आणि ‘मरिन कॉर्प्स’सह अमेरिकेच्या तिन्ही दलांचे सुमारे नऊ हजार जवान सहभागी झाले आहेत. जपानकडून सर्वात मोठी युद्धनौका असणाऱ्या ‘हेलिकॉप्टर कॅरिअर जे एस कागा’सह प्रमुख युद्धनौका, लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर्स, पाणबुड्या व जवळपास ३५ हजार जवान सरावात सहभागी झाले आहेत. ५ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या सरावात सायबर व इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरचाही समावेश आहे. जपानच्या सागरी हद्दीतील बेटांवर अचानक करण्यात आलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी हा सरावामागील उद्देश असल्याचा दावा जपानच्या लष्करी सूत्रांनी केला.
‘किन स्वोर्ड’
‘जपानच्या भोवतालची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. जपान व अमेरिकेच्या  आघाडीचे सामर्थ्य दाखविण्याची ही चांगली संधी आहे’, या शब्दात जपानचे लष्करप्रमुख जनरल कोजी यामाझाकी  यांनी हा सराव चीनला संदेश असल्याचे स्पष्ट केले. यावेळी उपस्थित असलेले अमेरिकेचे वरिष्ठ अधिकारी लेफ्टनंट जनरल केव्हिन श्ऩायडर यांनीही चीनच्या वाढत्या धोक्याकडे लक्ष वेधले. ‘साऊथ चायना सीमधील वाढत्या लष्करी हालचाली आणि तैवानविरोधात चाललेल्या कारवाया अमेरिका व जपानसाठी चिंतेचा विषय आहेत’, असे जनरल केव्हिन श्ऩायडर यांनी बजावले.
‘किन स्वोर्ड’
अमेरिका व जपानच्या या सरावावर चिनी प्रसारमाध्यमे तसेच विश्लेषकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. ‘अमेरिका व जपान उघडपणे चीनला लक्ष्य करीत असल्याचे दाखवीत असून, सेंकाकू बेटांच्या मुद्यावर चीनविरोधात संघर्ष करण्याची तयारी सुरू केल्याचे नव्या युद्धसरावावरून दिसत आहे’, असा दावा चिनी विश्लेषक ली हायडाँग यांनी केला. तर ‘ग्लोबल टाईम्स’ या सरकारी मुखपत्राने अमेरिका-जपान सराव शेजारील देशांसाठी धोकादायक संकेत असल्याची चिंता व्यक्त करून, चीनच्या सत्ताधारी राजवटीत असणारी वाढती अस्वस्थता दाखवून दिली.
चीनने गेल्या काही महिन्यात साऊथ चायना सीसह इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील कारवाया मोठ्या प्रमाणात वाढविल्या आहेत. संपूर्ण साऊथ चायना सी व ईस्ट चायना सीवर ताबा मिळवण्याची वर्चस्ववादी महत्त्वाकांक्षा यामागे आहे. चीन आशिया-पॅसिफिक क्षेत्रात सातत्याने आपल्या संरक्षणसामर्थ्याचे आक्रमक प्रदर्शन करीत आहे. जपाननजिक ईस्ट चायना सीमध्ये चीनच्या विनाशिका, पाणबुड्या व गस्तीनौका जपानच्या सार्वभौमत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मे महिन्यात चीनने आपली ‘लिओनिंग’ ही विमानवाहू युद्धनौका व ‘स्ट्राईक ग्रुप’ जपाननजीकच्या ईस्ट चायना सी क्षेत्रात तैनात केली होती. चीनच्या काही लढाऊ विमानांनी जपानच्या हवाईहद्दीत घुसखोरीचे प्रयत्न केल्याचे वृत्तही समोर आले होते. या पार्श्वभूमीवर, अमेरिका व जपानचा नवा युद्धसराव लक्ष वेधून घेणारा ठरतो.

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info