Breaking News

तैवानला ‘रिपर’ ड्रोन पुरविणार्‍या अमेरिकेला प्रत्युत्तर मिळेल – चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचा इशारा

वॉशिंग्टन/बीजिंग – चीनकडून तैवानला देण्यात येणार्‍या धमक्यांची तीव्रता वाढत असून अमेरिकेने देखील तैवानबरोबरील संरक्षण सहकार्य वाढविले आहे. या संरक्षण सहकार्याचा भाग म्हणून अमेरिकेने तैवानला टेहळणी तसेच हल्ले चढविण्यासाठी वापरले जाणारे ‘एमक्यू-९’ रिपर ड्रोन पुरविण्याची घोषणा केली. यामुळे अस्वस्थ झालेल्या चीनने अमेरिकेलाच धमकावले. अमेरिकेने तैवानला शस्त्रसज्ज ड्रोन पुरविण्याच्या आपल्या निर्णयापासून माघार घेतली नाही तर चीन अमेरिकेला नेमके व अत्यावश्यक प्रत्युत्तर देईल, असा इशारा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला. हा इशारा देत असताना चीनने तैवानच्या सागरी क्षेत्राजवळ अॅम्फिबियस युद्धनौका तैनात केल्याची माहिती समोर येत आहे.

‘रिपर’

तैवानच्या सुरक्षेसाठी प्रगत शस्त्रास्त्रे पुरविणार असल्याची घोषणा अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तैवानला ६० कोटी डॉलर्स किंमतीचे रिपर ड्रोन पुरविण्याचा निर्णय घेतल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. यामध्ये शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेले चार रिपर ड्रोन्स, टेहळणी आणि संपर्कासाठी आवश्यक असलेली यंत्रणा यांचा समावेश असेल. अमेरिकेचे राष्ट्रीय, आर्थिक व सुरक्षाविषयक हितसंबंध जपण्यासाठी तैवानला ही शस्त्रास्त्रे पुरविण्यात आल्याची माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली. तैवानने याआधीच टेहळणीसाठी ड्रोन विकसित केले असून काही आठवड्यांपूर्वी तैवानने अमेरिकेकडे एमक्यू-९ या हल्लेखोर रिपर ड्रोन्सच्या खरेदीची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने तैवानला सदर ड्रोन्सचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘रिपर’

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने केलेल्या या घोषणेमुळे बिथरलेल्या चीनने अमेरिकेला धमकावले आहे. तैवान हा चीनचा भूभाग असून तैवानला हल्ला चढविणारे ड्रोन्स पुरवून अमेरिका चीनच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करीत आहे व चीनचे सार्वभौमत्व आणि सुरक्षाविषयक हितसंबंधांसाठी ही बाब धोकादायक ठरते, अशी टीका चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेंबिन यांनी केली. अमेरिका-चीन संबंधांची हानी करायची नसेल आणि तैवानच्या आखातात शांती व स्थैर्य हवे असेल तर अमेरिकेने तैवानला या ड्रोन्सचा पुरवठा करू नये. अन्यथा चीन त्याला नेमके व अत्यावश्यक प्रत्युत्तर देईल, अशी धमकी वेंबिन यांनी दिली. साधारण दोन आठवड्यांपूर्वी देखील अमेरिकेने तैवानसाठी मंजूर केलेल्या शस्त्र सहकार्यावर आक्षेप घेऊन अमेरिकेला इशारा दिला होता.

चीनच्या तैवानवरील हल्ल्याची शक्यता वाढल्याने अमेरिकेने तैवानला प्रगत शस्त्रास्त्रांनी सज्ज करण्याचा वेग वाढविला आहे. गेल्या महिन्याभरात अमेरिकेने तैवानला हार्पून तसेच विनाशिकाभेदी, हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे पुरविण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर अमेरिकी युद्धनौका आणि लढाऊ विमानांच्या तैवानच्या हद्दीतील गस्तीही वाढल्या आहेत. चीनने देखील तैवानवर क्षेपणास्त्रे रोखून आपले इरादे स्पष्ट केले होते. तर गेल्या ऑक्टोबर महिन्यातच २५ वेळा तैवानच्या आपली हद्दीत लढाऊ विमाने रवाना करुन चीनने तणाव निर्माण केला होता. त्याच्याही आधी चीनने तैवान काबीज करण्यासाठी युद्धसरावाचे आयोजन केले होते.