चीनला न रोखल्यास ‘लॉस्ट डिकेड’चा सामना करावा लागेल

- ऑस्ट्रेलियाच्या संरक्षणमंत्र्यांचा सहकारी देशांना इशारा

कॅनबेरा/वॉशिंग्टन – साऊथ चायना सीच्या मुद्यावर चीनने दिलेल्या आश्‍वासनांवर आंतरराष्ट्रीय समुदाय विसंबून राहिला व त्याचा चीनने गैरफायदा घेतला. मात्र यापुढे आंतरराष्ट्रीय समुदाय चीनविरोधात ठामपणे खडा ठाकला नाही तर आपल्याला पुढील दशकही गमवावे लागेल, असा खरमरीत इशारा ऑस्ट्रेलियाचे संरक्षणमंत्री पीटर डटन यांनी दिला. या आठवड्यात ऑस्ट्रेलियात ‘क्वाड’ गटाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार असून त्या पार्श्‍वभूमीवर डटन यांनी दिलेला इशारा लक्ष वेधून घेत आहे.

‘लॉस्ट डिकेड’

‘गेली अनेक वर्षे आपण साऊथ चायना सीच्या मुद्यावर चीनने दिलेल्या आश्‍वासनांवर विसंबून राहिलो. चीनच्या कारवायांचा विचार करता हा सारा काळ आपण गमावलेला आहे. अमेरिकेसह बहुतांश देशांनी चीनच्या हालचालींना कोणताही विरोध न करता मान्यता दिली. याचा गैरफायदा उचलून चीनने साऊथ चायना सीचे लष्करीकरण सुरू केले. आजच्या घडीला या क्षेत्रात जवळपास २० ठिकाणी चीनचे तळ आहेत. ही बाब साऊथ चायना सीच्या स्थैर्यासाठी हिताची नाही. यापुढेही असेच चालत राहिले तर साऊथ चायना सीच्या मुद्यावर आंतरराष्ट्रीय समुदायाला पुढील दशकही गमवावे लागेल’, अशा परखड शब्दात संरक्षणमंत्री डटन यांनी आपल्या देशासह आंतरराष्ट्रीय समुदायालाही सावध केले आहे.

येत्या आठवड्यात ऑस्ट्रेलियात ‘क्वाड’ गटाची बैठक होणार आहे. या बैठकीत अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान व भारत या देशांचे परराष्ट्रमंत्री सहभागी होणार आहेत. चीनच्या कारवाया हा बैठकीतील प्रमुख मुद्दा असेल. ‘क्वाड’ने गेल्या काही वर्षात चीनविरोधात पावले उचलण्यास सुरुवात केली असून सहकार्य वाढविण्यावर भर दिला आहे. म्हणूनच चीन ‘क्वाड’मुळे अस्वस्थ झाला असून सदस्य देशांना सातत्याने धमकावत आहे. अशा वेळी क्वाडने ठामपणे चीनविरोधी भूमिका घेऊन हालचाली करणे आवश्यक असल्याचे संकेत ऑस्ट्रेलियाच्या संरक्षणमंत्र्यांनी दिले आहेत.

दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एच. आर. मॅकमास्टर यांनीही साऊथ चायना सीच्या मुद्यावरून चीनला लक्ष्य केले. चीनच्या साऊथ चायना सीमधील कारवाया म्हणजे बळजबरीने जागा बळकावण्याची इतिहासातील सर्वात मोठी घटना ठरते, असा दावा मॅक्मास्टर यांनी केला. चीनच्या कम्युनिस्ट राजवटीवर टीकास्त्र सोडताना त्यांनी तैवान, हॉंगकॉंग व झिंजिआंगमध्ये सुरू असलेल्या हालचालींचाही दाखला दिला.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info