भूमध्य सागरी क्षेत्रातील इंधन उत्खननावरून युरोपिय महासंघाचे तुर्कीवर निर्बंध

भूमध्य सागरी क्षेत्रातील इंधन उत्खननावरून युरोपिय महासंघाचे तुर्कीवर निर्बंध

ब्रुसेल्स/अंकारा – भूमध्य सागरी क्षेत्रातील इंधनाच्या साठ्यांवरून युरोपिय देशांना धमकविणाऱ्या तुर्कीवर युरोपिय महासंघाने निर्बंध लादले आहेत. तुर्की भूमध्य सागरी क्षेत्रात बेकायदेशीररित्या इंधन उत्खनन करीत असल्याची स्पष्ट भूमिका घेत महासंघाने पुढील वर्षापर्यंत निर्बंध कायम राहतील, असे जाहीर केले आहे. तुर्कीच्या इंधन कंपनीला यात लक्ष्य करण्यात आले असून त्यांची व्याप्ती वाढविण्याचेही संकेत देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर फ्रान्सने तुर्कीविरोधात अधिक आक्रमक धोरण राबविण्याची गरज असल्याची मागणी केली आहे. युरोपिय महासंघाने लादलेले निर्बंध तसेच फ्रान्सची मागणी यामुळे युरोप व तुर्कीमधील तणाव अधिकच चिघळण्याचे संकेत मिळत आहेत.

गेल्या दोन वर्षात तुर्कीने भूमध्य सागरी क्षेत्रात इंधनासाठी वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. ग्रीस तसेच सायप्रस या देशांनजिक असलेल्या सागरी क्षेत्रांवर आपला हक्क असल्याचे दावे करून त्यात घुसखोरी करण्याचे प्रयत्न चालू आहेत. तुर्कीच्या या प्रयत्नांवर युरोपिय देशांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली असून गेल्या वर्षी महासंघाने तुर्कीविरोधात निर्बंध लादले होते. तुर्कीकडून सायप्रसनजिक सुरू असलेल्या कारवायांवरून हे निर्बंध लादण्यात आले होते. गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत या निर्बंधांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय घेतानाच निर्बंधांची व्याप्ती वाढू शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.

ऑगस्ट महिन्यात, तुर्कीने ‘नॅव्हटेक्स अलर्ट’ जारी करून आपले ‘ओरुक रेईस’ हे ‘रिसर्च शिप’ दोन जहाजांसह भूमध्य सागरी क्षेत्रात संशोधनासाठी धाडले होते. त्यावर अमेरिकेसह युरोपिय महासंघ व नाटोनेही नाराजी व्यक्त केली होती. अमेरिका व युरोपने ग्रीसचे समर्थन करीत तुर्कीवर दबाव टाकण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात तुर्कीने आपले जहाज भूमध्य सागरी क्षेत्रातून माघारी घेऊन ग्रीसबरोबर चर्चेस सुरुवात केली होती. मात्र गेल्या महिन्यात तुर्की नौदलाने ‘नॅव्हटेक्स अलर्ट’ जारी करून ‘ओरुक रेईस’ ही ‘रिसर्च शिप’, ‘अतामान’ व ‘सेंगीज हान’ या दोन जहाजांसह ‘कॅस्टेलोरिझो’ या ग्रीक बेटानजिक रवाना केली होती. सुरुवातीला ही जहाजे २२ ऑक्टोबरपर्यंत सक्रिय असतील, असे सांगणाऱ्या तुर्कीने या मोहिमेला सलग तीनदा मुदतवाढ देत १४ नोव्हेंबर पर्यंत तळ ठोकण्याचा इशारा दिला आहे.

तुर्कीच्या या कारवाईवर ग्रीससह युरोपिय महासंघ व नाटोकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ग्रीसने तुर्कीवर कठोर निर्बंध लादण्याची मागणी लावून धरली आहे. यापूर्वी सायप्रसच्या मुद्यावरून लादलेल्या निर्बंधांना मुदतवाढ देणाऱ्या महासंघाने आपण ग्रीसची मागणीही मान्य करू शकतो, असे संकेत दिल्याचे नव्या निर्णयातून दिसून येत आहे. फ्रान्ससारख्या आघाडीच्या देशाने याबाबत आक्रमक भूमिका घेतल्याने, नजिकच्या काळात तुर्कीला युरोपकडून नव्या निर्बंधाचा झटका बसण्याची शक्यताही वाढली आहे. यापूर्वी अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांमुळे तुर्कीच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. त्यात युरोपच्या कठोर निर्बंधांचा धक्का बसल्यास तुर्की चांगलाच अडचणीत येऊ शकतो.

English      हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info