युक्रेन युद्धातील अमेरिका व ब्रिटनच्या ‘स्पेशल फोर्सेस’चा सहभाग उघड

वॉशिंग्टन/लंडन – युक्रेनमधील युद्धात अमेरिकेसह नाटोचा सहभाग असल्याचे आरोप रशियाने सुरुवातीपासून केले होते. काही दिवसांपूर्वी उघड झालेल्या ‘पेंटॅगॉन लीक’मधून या आरोपांना दुजोरा मिळाला आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागातील गोपनीय कागदपत्रांमध्ये ब्रिटन, अमेरिका व नाटो देशांच्या ‘स्पेशल फोर्सेस’चा उल्लेख असून हे जवान युक्रेनमधील संघर्षात सहभागी असल्याची माहितीही समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर, अमेरिकेने पोलंडमधील कायमस्वरुपी संरक्षण तळासह अतिरिक्त लष्करी तैनातीला मान्यता दिल्याचा दावा पोलंडच्या पंतप्रधानांनी केला.

गेल्या वर्षी रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेसह इतर पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला मोठ्या प्रमाणात सहाय्य पुरविण्यास सुरुवात केली होती. यात शस्त्रास्त्रे तसेच आर्थिक मदतीचा समावेश होता. मात्र शस्त्रास्त्रांबरोबरच पाश्चिमात्य देशांच्या गुप्तचर यंत्रणा तसेच लष्करी तुकड्याही युक्रेनमध्ये सक्रिय झाल्याचे दावे रशियाने केले होते. मात्र अमेरिका तसेच नाटोने फक्त सल्लागार तसेच प्रशिक्षण देण्यासाठी तात्पुरत्या तुकड्या धाडल्याचा खुलासा केला होता.

मात्र ‘पेंटॅगॉन लीक’मध्ये समोर आलेल्या कागदपत्रांमध्ये अमेरिकेसह नाटो सदस्य देशांच्या ‘स्पेशल फोर्सेस’च्या तैनातीचा उल्लेख आहे. ‘स्पेशल फोर्सेस’च्या तुकड्या युक्रेनी तुकड्यांबरोबर तैनात असल्याचेही यात सांगण्यात आले. कागदपत्रांमध्ये अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, लाटव्हिया व नेदरलॅण्डस्‌‍ या देशांच्या स्पेशल फोर्सेसचा सहभाग समोर आला आहे. ब्रिटनच्या ‘स्पेशल फोर्सेस’चे सर्वाधिक जवान युक्रेनमध्ये असल्याचेही उघड झाले आहे. ब्रिटनच्या माजी अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत याची कबुली दिली आहे.

युक्रेन युद्धातील अमेरिका व नाटोचा सहभाग उघड होत असतानाच युक्रेनचा शेजारी देश असलेल्या पोलंडने अमेरिकेचा संरक्षण तळ व लष्करी तैनातीची व्याप्ती वाढविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पोलंडचे पंतप्रधान मॅत्युस्झ मोराविकी यांनी नुकताच अमेरिकेचा दौरा केला. दौऱ्यादरम्यान झालेल्या चर्चेत अमेरिकेने पोलंडमधील कायमस्वरुपी संरक्षणतळाची तसेच त्यावरील तैनातीची व्याप्ती वाढविण्यास मान्यता दिल्याचा दावा पंतप्रधान मोराविकी यांनी केला.

English    हिंदी

इस समाचार के प्रति अपने विचार एवं अभिप्राय व्यक्त करने के लिए नीचे क्लिक करें:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info