नागोर्नो-कॅराबखमधील ‘शुशा’ शहर ताब्यात घेतल्याचा अझरबैजानचा दावा – आर्मेनियाने दावा फेटाळला

नागोर्नो-कॅराबखमधील ‘शुशा’ शहर ताब्यात घेतल्याचा अझरबैजानचा दावा – आर्मेनियाने दावा फेटाळला

बाकु/येरेवान – नागोर्नो-कॅराबखमधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून ओळख असणाऱ्या ‘शुशा’वर ताबा मिळविल्याचा दावा अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इलहाम अलीयेव्ह यांनी केला. अलीयेव्ह यांच्या दाव्यानंतर अझरबैजानची राजधानी बाकुसह अनेक शहरात जल्लोष करण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. मात्र आर्मेनियाने ‘शुशा’संदर्भातील अझरबैजानचे दावे फेटाळले आहेत. आर्मेनियाचे राष्ट्राध्यक्ष निकोल पशिनयान यांनी सोमवारी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून, ‘शुशासाठी लढाई सुरु आहे’, अशी ग्वाही दिली आहे. दरम्यान, शनिवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पुन्हा एकदा फ्रान्स व तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांशी आर्मेनिया-अझरबैजान युद्धाबाबत चर्चा केल्याची माहिती रशियाने दिली आहे.

गेल्या काही दिवसात अझरबैजानने नागोर्नो-कॅराबखमधील आपल्या हल्ल्यांची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढवली होती. हे हल्ले ‘शुशा’वर ताबा मिळविण्यासाठी असल्याचा दावा पत्रकार तसेच विश्लेषकांनी केला होता. त्याचवेळी या शहरासाठी होणारी लढाई रक्तरंजित व निर्णायक असेल, असे इशारेही देण्यात आले होते. त्यामुळे अझरबैजानच्या राष्ट्राध्यक्षांनी रविवारी केलेली घोषणा लक्ष वेधून घेणारी ठरते.

‘शुशा स्वतंत्र करण्यात आले आहे. ८ नोव्हेंबर हा दिवस अझरबैजानच्या जनतेसाठी इतिहासात खास नोंदविला जाईल. शुशा पुन्हा एकदा अझरबैजानमध्ये परतले आहे’, असे अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष अलीयेव्ह यांनी जाहीर केले. अझरबैजानच्या परराष्ट्र विभागानेही ‘शुशा’बाबत निवेदन जारी केले असून आता पूर्ण नागोर्नो-कॅराबख स्वतंत्र केल्याशिवाय अझरबैजान थांबणार नाही, असा इशाराही दिला आहे. अझरबैजानचे हे दावे आर्मेनियाने फेटाळले आहेत.

‘शुशासाठी मोठी व निर्णायक लढाई सुरू आहे. शुशा ताब्यात घेणे हे अझरबैजानसाठी दिवास्वप्नच ठरेल’, असे आर्मेनिया सरकारने म्हटले आहे. आर्मेनियाच्या संरक्षण विभागानेही लष्करावर विश्वास ठेवा, असे सांगून संघर्ष कायम असल्याचे सांगितले आहे. आर्मेनियाच्या राष्ट्राध्यक्षांनीही, शुशासाठी लढाई सुरु आहे, अशी ग्वाही देऊन शहर गमावले नसल्याचा खुलासा केला आहे. नागोर्नो-कॅराबख राजधानी असणाऱ्या स्टेपनकर्टला आर्मेनियाशी जोडणारा दुवा म्हणून ‘शुशा’ सामरिकदृष्ट्या निर्णायक मानले जाते. आर्मेनियन नागरिकांसाठी सांस्कृतिक व धार्मिक दृष्टीनेही ‘शुशा’चे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे.

दरम्यान आर्मेनिया-अझरबैजान युद्धात संघर्षबंदीसाठी रशियाने नव्याने प्रयत्न सुरू केले आहेत. शनिवारी रशियन राष्ट्राध्यक्षांनी फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन व तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांच्याशी फोनवर चर्चा केल्याची माहिती रशियाने दिली.

हिंदी