अमेरिका पुन्हा हल्ले चढविल, हे तालिबानने ध्यानात घ्यावे

अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचा इशारा

वॉशिंग्टन – ‘अफगाणिस्तानात दहशतवादविरोधी कारवाईअंतर्गत पुन्हा हवाई हल्ले चढविण्याचा अमेरिकेला पूर्ण अधिकार आहे व अमेरिका त्याचा पुरेपूर वापर करील, हे तालिबानने ध्यानात ठेवावे’, असा सज्जड इशारा अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने दिला. अमेरिकेचे लोकप्रतिनिधी, आजी-माजी लष्करी व गुप्तचर अधिकार्‍यांनी तालिबानच्या दहशतवादी धोरणामुळे अमेरिका पुन्हा असुरक्षित बनल्याची चिंता व्यक्त केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेला हा इशारा लक्षवेधी ठरतो. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी अमेरिकेला पुन्हा अफगाणिस्तानात सैन्य तैनात करावे लागेल, असे बजावले होते.

पुन्हा हल्ले

गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानात आयएस व अल कायदा या दहशतवादी संघटनांच्या हालचाली वाढल्या आहेत. तालिबानने अफगाणिस्तानातील आयएसचा प्रभाव नाकारण्याचा प्रयत्न केला. पण आयएसच्या दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानच्या जलालाबाद शहरात सलग चार दिवस बॉम्बहल्ले चढवून तालिबानच्या दहशतवाद्यांना लक्ष्य केले. या हल्ल्यांमध्ये अफगाणी नागरिकांचा देखील बळी गेला. आयएसने या हल्ल्यांची जाहीररित्या जबाबदारी स्वीकारली.

तर तालिबानच्या मंत्रीमंडळात ओसामा बिन लादेनच्या दोन अंगरक्षकांना मिळालेले पद आंतरराष्ट्रीय विश्‍लेषकांच्या चर्चेचा विषय ठरले. दोन दशकानंतर सत्तेवर आलेली तालिबान अल कायदाशी सहकार्य ठेवून आहे, याकडे लष्करी विश्‍लेषकांनी लक्ष वेधले. नेमक्या याच काळात अल कायदाचा प्रमुख अयमन अल जवाहिरीची व्हिडिओ प्रसिद्ध होते आणि यातून पाश्‍चिमात्य देशांना धमकी दिली जाते, हे देखील आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी चिंताजनक असल्याचे विश्‍लेषकांनी म्हटले होते. अफगाणिस्तानचा वापर करून अल कायदा अमेरिका तसेच युरोपिय देशांवर नवे हल्ले चढवू शकते, असे इशारे या विश्‍लेषकांनी दिले.

अशा परिस्थितीत, अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी तालिबानला इशारा दिला. अमेरिकेने सैन्यमाघार घेतली असली तरी अफगाणिस्तानात दहशतवादी हल्ले चढविण्याचा अधिकार गमावलेला नसल्याचे किर्बी यांनी स्पष्ट केले. तसेच अमेरिका कधीही अफगाणिस्तानात हवाई हल्ले चढवू शकते आणि त्यापासून अमेरिकेला कुठलेही नियम रोखू शकत नसल्याचे किर्बी यांनी बजावले. अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या या इशार्‍यावर तालिबान तसेच पाकिस्तानातून तीव्र प्रतिक्रिया उमटू शकते. कारण अफगाणिस्तानात हवाई हल्ले चढविण्यासाठी अमेरिका पाकिस्तानच्या हवाईहद्दीचा वापर करील. अमेरिकेला हवाईहद्द नाकारण्याची हिंमत पाकिस्तानात नाही. त्यामुळे अमेरिकेच्या हवाईहल्ल्यांना सहाय्य करणार्‍या पाकिस्तानला तालिबान लक्ष्य करण्याची दाट शक्यता आहे. तशी धमकीही तालिबानने याआधी स्पष्टपणे दिली होती.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info