तेहरान/न्यूयॉर्क – इराणचे अणुशास्त्रज्ञ मोहसिन फखरीझादेह यांची शुक्रवारी हत्या झाली आहे. अज्ञात मारेकऱ्यांनी फखरीझादेह यांची मोटार जवळ आल्यानंतर ट्रकचा स्फोट घडवून आणला आणि त्यानंतर पाच हल्लेखोरांनी फखरीझादेह यांच्यावर बेछूट गोळीबार केला. फखरीझादेह यांच्या हत्येला इस्रायल व अमेरिका जबाबदार असल्याचे आरोप करून खवळलेल्या इराणच्या नेत्यांनी याचा सूड घेतला जाईल, अशी गर्जना केली आहे. इस्रायलच्या कंत्राटी सैनिकांनी ही हत्या घडविल्याचा आरोप इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी केला आहे.
जानेवारी महिन्यात इराणी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी कासेम सुलेमानी ठार झाल्यानंतर, इराणला बसलेला हा दुसरा मोठा हादरा ठरतो. मोहसिन फखरीझादेह हे इराणचे वरिष्ठ व अतिशय महत्त्वाचे अणुशास्त्रज्ञ होते. इराणच्या राजवटीने त्यांना विशेष सुरक्षाही पुरविलेली होती. शुक्रवारी राजधानी तेहरानजवळच्या ‘अब्सार्द’ या गावाजवळ त्यांच्या मोटारीवर हल्ला झाला त्यावेळी देखील फखरीझादेह यांचे तीन अंगरक्षक देखील सोबत होते. हे तिन्ही अंगरक्षक जागीच ठार झाले. तर फखरीझादेह यांना रुग्णालयात नेईपर्यंत त्यांचाही मृत्यू झाला. फखरीझादेह यांची हत्या घडविणाऱ्यांना तसेच या हत्येचे आदेश देणाऱ्यांचा निश्चित सूड घेतला जाईल, अशी धमकी सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांनी दिली आहे. तर इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी फखरीझादेह यांच्या हत्येसाठी थेट इस्रायलला जबाबदार धरले. ‘इस्रायलच्या कंत्राटी सैनिकांनी आपल्या शास्त्रज्ञाची हत्या घडविली आहे, असा घणाघाती आरोप राष्ट्राध्यक्ष रोहानी यांनी केला. पण फखरीझादेह यांच्या हत्येमुळे इराणचा अणुकार्यक्रम अजिबात थांबणार नसल्याचे राष्ट्राध्यक्ष रोहानी यांनी निक्षून सांगितले. इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरीफ त्याचबरोबर संरक्षणदलांच्या प्रमुखांनी देखील लवकरच फखरीझादेह यांच्या हत्येचा भीषण बदला घेतला जाईल, असे बजावले आहे.
संयुक्त राष्ट्रसंघातील इराणचे राजदूत माजिद तख्त रवांची यांनी राष्ट्रसंघाचे महासचिव गुतेरस यांना लिहिलेल्या पत्रात फखरीझादेह यांच्या हत्येसाठी इस्रायल व अमेरिकेला जबाबदार धरले. तसेच फखरीझादेह यांची हत्या घडविणाऱ्या अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात कुठलेही साहस करण्याची घोडचूक करू नये. अन्यथा आपल्या हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी इराण आवश्यक ती पावले उचलेल, अशी धमकी रवांची यांनी दिली.
इस्रायलने मात्र इराणच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिलेली नाही. याआधी 2010 ते 12 या तीन वर्षांच्या कालावधीत इराणमध्ये चार अणुशास्त्रज्ञांची हत्या झाली होती. यासाठी इराणने इस्रायलवरच ठपका ठेवला होता.
दरम्यान, इराणने दिलेल्या धमकीनंतर इस्रायलने जगभरातील आपल्या दूतावासांसाठी अलर्ट जारी केला आहे. इराणच्या हल्ल्याची शक्यता वर्तवून इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने आपल्या संरक्षणदलांना आधीपासूनच सुसज्ज ठेवल्याच्या बातम्या दोन दिवसांपासून प्रसिद्ध होत आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |