लंडन/मॉस्को – रशियाच्या तब्बल नऊ युद्धनौका ब्रिटनच्या सागरी हद्दीजवळ वावरताना आढळल्याची माहिती ब्रिटीश नौदलाने दिली आहे. अवघ्या दोन आठवड्यांच्या कालावधीत इतक्या मोठ्या प्रमाणात रशियन युद्धनौका या क्षेत्रात आढळण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात येते. दोन महिन्यांपूर्वीच नाटोच्या प्रमुखांनी रशिया आपल्या प्रभावक्षेत्राबाहेर लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन घडवून नवे शीतयुद्ध छेडण्याच्या तयारीत असल्याचे बजावले होते.
गेल्या काही वर्षात ब्रिटन व रशियामधील संबंधांमध्ये सातत्याने खटके उडत आहेत. 2014 साली रशियाने युक्रेनवर हल्ला करून क्रिमिआवर ताबा मिळविल्यानंतर ब्रिटनने रशियाविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. तत्कालिन पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी रशियाबरोबरील लष्करी सहकार्य थांबवून निर्बंधांची घोषणा केली होती. ब्रिटनमध्ये ‘स्कॉटलंड’ तसेच ‘ब्रेक्झिट’च्या मुद्यावर झालेल्या सार्वमतादरम्यान रशियाने हस्तक्षेपाचे प्रयत्न केल्याचे दावेही करण्यात आले होते.
2018 साली ब्रिटनमध्ये वास्तव्यास असलेल्या माजी रशियन अधिकाऱ्याला तसेच त्याच्या मुलीला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणात रशियाचा हात उघड झाल्यानंतर ब्रिटन व रशियामधील तणाव जबरदस्त चिघळला होता. ब्रिटनने आपल्याकडील 23 रशियन राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली होती. प्रत्युत्तरादाखल रशियानेही ब्रिटीश अधिकाऱ्यांना मायदेशी धाडले होते. रशियाविरोधात संभाव्य कारवाईचा भाग म्हणून ब्रिटनने मोठा सायबरहल्ला घडविण्याचीही योजना आखल्याचे नंतर समोर आले होते. त्याचवेळी रशियानेही ब्रिटनमधील सुमारे 40 शहरे व लष्करी तळांवर अणुहल्ला करण्याची तयारी केल्याचा दावाही ब्रिटीश माध्यमांनी केला होता.
याच काळात रशिया व नाटोमधील संबंधांमधील तणावही वाढू लागला होता. या तणावाच्या पार्श्वभूमीवर नाटो सदस्य देशांवर दबाव वाढविण्यासाठी रशियन युद्धनौका, पाणबुड्या व लढाऊ विमानांनी युरोपच्या हद्दीत धडका मारण्यास सुरुवात केली. शीतयुद्धाच्या काळात रशियाकडून या क्षेत्रात पाठविण्यात येणाऱ्या युद्धनौका व विमानांपेक्षा या धडकांची व्याप्ती व तीव्रता अधिक असल्याकडे बाब पाश्चात्य विश्लेषकांनी सातत्याने लक्षात आणून दिली होती. रशियाचे हे दबावतंत्र अजूनही कायम असल्याचे ब्रिटनच्या सागरी हद्दीनजिक वाढलेल्या हालचालींवरून स्पष्ट झाले आहे.
ब्रिटनच्या नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 14 दिवसांमध्ये रशियाच्या पाणबुडीसह नऊ युद्धनौका सागरी हद्दीनजिक वावरताना आढळल्या आहेत. त्यात रशियन विनाशिका ‘ॲडमिरल कुलाकोव’ व ‘बोयकि’, रशियन पाणबुडी ‘स्तारि ओस्कोल’ आणि गस्तीनौका ‘व्हॅसिली बायकोव्ह’ यांच्यासह सपोर्ट शिप्सचा समावेश आहे. रशियाच्या इतर युद्धनौकांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. ब्रिटननजिकच्या ‘नॉर्थ सी’, ‘सेल्टिक सी’, ‘डोव्हर स्ट्रेट’ तसेच इंग्लिश खाडीच्या क्षेत्रात रशियन युद्धनौका आढळल्याची माहिती ब्रिटनने दिली. रशियाच्या या सर्व युद्धनौका ब्रिटनच्या हद्दीनजिकच्या क्षेत्रातून पूर्णपणे बाहेर पडेपर्यंत त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात आल्याचेही ब्रिटनकडून सांगण्यात आले.
रशियन युद्धनौकांच्या या वाढत्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर, ब्रिटनचे नौदल कोणत्याही धोक्याचा मुकाबला करण्यास सज्ज असल्याची ग्वाही नौदलप्रमुख ‘फर्स्ट सी लॉर्ड ॲडमिरल टोनी रॅडाकिन’ यांनी दिली आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |