इस्रायलने गाझातील इमारत जमीनदोस्त केल्यानंतर हमासकडून सूड घेण्याची धमकी

इस्रायलने गाझातील इमारत जमीनदोस्त केल्यानंतर हमासकडून सूड घेण्याची धमकी
  • अमेरिकेचे विशेषदूत इस्रायलमध्ये दाखल
  • इस्रायलच्या हवाईतळाजवळ हल्ले
  • ऑस्ट्रियन दूतावासाजवळ रॉकेट कोसळले
  • सिरियातूनही इस्रायलवर रॉकेट प्रक्षेपित

जेरूसलेम – इस्रायलच्या लष्कराने शनिवारी गाझातील ‘अल-जाला’ इमारत जमीनदोस्त केली. सदर इमारतीमध्ये आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था आणि वृत्तवाहिन्यांची कार्यालये होती. पण हमासचे दहशतवादी या इमारतीचा वापर इस्रायलविरोधी कारवायांसाठी तसेच मानवी ढाल म्हणून करीत होते, असा आरोप इस्रायली लष्कराने केला आहे. या कारवाईनंतर संतापलेल्या हमासने याचा सूड घेण्याची धमकी दिली. यानंतर हमासने इस्रायलवरील रॉकेट हल्ल्यांची तीव्रता वाढविल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

इस्रायलने गाझातील इमारत जमीनदोस्त

येत्या काही तासात इस्रायल आणि हमासमध्ये संघर्षबंदी होईल, असा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमांनी शुक्रवारी केला होता. रविवारपर्यंत हा संघर्ष संपुष्टात येईल, असे बोलले जात होते. पण यानंतर गेल्या चोवीस तासात इस्रायल आणि गाझापट्टीतील हमास व इस्लामिक जिहाद यांच्यातील संघर्ष अधिकच भडकला आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये गाझापट्टीतून चारशेहून अधिक रॉकेट व क्षेपणास्त्रांचे हल्ले झाले. गेल्या सहा दिवसांमध्ये गाझापट्टीतून इस्रायलवर २३००हून अधिक रॉकेट हल्ले झाले आहेत. सिरियातून इस्रायलच्या गोलान भागात तीन रॉकेट्स कोसळल्याचे इस्रायली लष्कराने जाहीर केले.

तर इस्रायली लष्कराने गाझापट्टीत चढविलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये एकाच परिवारातील दहा जणांचा बळी गेल्याचा आरोप हमास करीत आहे. यामध्ये लहान मुलांचा समावेश असल्याचा दावा गाझातील हमास नियंत्रित आरोग्य यंत्रणांनी केला आहे. इस्रायली लष्कराने याचे तपशील दिलेले नाहीत. हमासच्या अल-कासम ब्रिगेडने इस्रायलच्या बिरशेबा शहरातील हवाईतळावर रॉकेट्सचे हल्ले चढविले. या हल्ल्यात इस्रायली हवाईतळाचे फारसे नुकसान झालेले नाही. पण येथील घराची पडझड झाल्याची माहिती इस्रायली लष्कराने दिली. शनिवार सकाळपासून तेल अविव व बिरशेबा या शहरांवर किमान शंभर रॉकेट्स हल्ले झाले आहेत. तेल अविवच्या रमात गान भागातील ऑस्ट्रियन दूतावासाजवळ रॉकेट कोसळले. काही तासांपूर्वी ऑस्ट्रियन पंतप्रधान सेबास्टियन कर्झ यांनी आपल्या कार्यालयावर इस्रायलचा ध्वज फडकावून या संघर्षात आपला देश इस्रायलच्या पाठिशी असल्याचे जाहीर केले होते. त्यानंर ऑस्ट्रियन दूतावासाजवळ रॉकेट हल्ला चढवून हमासने इस्रायलसमर्थक देशांना इशारा दिल्याचे दिसत आहे.

इस्रायलने गाझातील इमारत जमीनदोस्त

इस्रायलने देखील गाझातील अल-जाला इमारत जमीनदोस्त केली. या इमारतीवर हल्ले चढविण्याच्या एक तास आधी इस्रायली लष्कराने आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला फोन करून सदर इमारत रिकामी करण्याची सूचना केली होती. तसेच हल्ल्याच्या काही मिनिटे आधी या इमारतीच्या मालकाला फोन करून इमारत रिकामी झाल्याची खातरजमा करून घेतली. त्यानंतरच इस्रायली विमानांनी अल-जावावर हल्ला चढविला. ‘हमासचे दहशतवादी या इमारतीचा वापर मानवी ढाल म्हणून करीत होते. हमासच्या दहशतवाद्यांची कोंडी करण्यासाठी या इमारतीवर कारवाई करावी लागली’, असे इस्रायली लष्कराने म्हटले आहे. पण आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या कार्यालयावर कारवाई केल्यामुळे इस्रायलवर टीका सुरू झाली आहे.

दरम्यान, इस्रायल आणि पॅलेस्टिनींमधील संघर्षावर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे विशेषदूत हॅडी अम्र शनिवारी तेल अविवमध्ये दाखल झाले. अमेरिकेचे हे विशेषदूत इस्रायल, पॅलेस्टाईन तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले जाते.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info