तैपेई – तैवानच्या मुद्यावरून अमेरिका व चीनमधील संबंध ताणलेले असतानाच, तैवानने चीनचा हल्ला रोखण्याची रंगीत तालीम असणार्या लष्करी सरावाला सुरुवात केली आहे. तैवानी लष्कराच्या ‘५८४ ब्रिगेड’चा भाग असलेल्या ‘कम्बाईन्ड् आर्म्स बटालियन’कडून घेण्यात आलेल्या या सरावात प्रथमच ‘हेलिकॉप्टर ड्रोन्स’ची चाचणी घेण्यात आल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले. हा सराव सुरू असतानाच चीनच्या दोन टेहळणी विमानांनी तैवानच्या हवाईहद्दीत घुसखोरी केल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या वर्षभरात अमेरिकेने तैवानबरोबरील लष्करी व राजनैतिक सहकार्य मोठ्या प्रमाणात वाढविले आहे. अमेरिका-तैवान वाढत्या सहकार्यामुळे चीन चांगलाच बिथरला असून आता त्यांनी थेट अमेरिकी अधिकार्यांवर निर्बंध टाकण्याचा इशारा दिला आहे. त्याचवेळी चीनकडून तैवानविरोधात ‘कॉग्निटिव्ह वॉरफेअर’चा वापर सुरू असल्याचा अहवाल तैवानी अभ्यासगटाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर तैवानने चीनचा हल्ला रोखण्याची रंगीत तालीम असणार्या सरावाचे आयोजन करणे लक्ष वेधून घेणारे ठरते.
राजधानी तैपईच्या दक्षिणेला असणार्या ‘हुकोउ आर्मी बेस’वर मंगळवारपासून सरावाला सुरुवात झाली. तिन्ही दलांच्या जवानांचा समावेश असलेली ‘कम्बाईन्ड् आर्म्स बटालियन’ सरावात सहभागी झाली आहे. वेगवेगळ्या परिस्थितीत चीनच्या संरक्षणदलांकडून तैवानच्या विमानतळाचा ताबा घेण्याचा प्रयत्न उधळून लावणे, हे सरावाचे उद्दिष्ट असल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले. सरावात पहिल्यांदाच ‘ड्रोन हेलिकॉप्टर’चा वापर करण्यात आल्याची माहिती तैवानच्या संरक्षण विभागाने दिली. ‘तैवानची सामुद्रधुनी व परिसरात काहीही घडले तरी मातृभूमीचे रक्षण करण्याच्या आमच्या निर्धारावर त्याचा परिणाम होणार नाही’, या शब्दात तैवानी अधिकारी मेजर जनरल चेन चोंग-जी यांनी सरावावर प्रतिक्रिया दिली.
तैवानच्या लष्कराकडून सराव सुरू असतानाच चीनने आपले घुसखोरीचे प्रयत्न थांबविले नसल्याचे उघड झाले. मंगळवारी सकाळी चीनच्या दोन टेहळणी विमानांनी तैवानच्या ‘एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन’मध्ये प्रवेश केल्याची माहिती संरक्षण विभागाने दिली. या विमानांमध्ये ‘इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर’ची क्षमता असणार्या विमानाचा समावेश होता.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
![]() |
https://twitter.com/WW3Info |
![]() |
https://www.facebook.com/WW3Info |