Breaking News

काहीही झाले तरी इस्रायल इराणला अण्वस्त्रसज्ज बनू देणार नाही – इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू

तेल अविव – इराणला अण्वस्त्रसज्ज होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, असे या देशाचे सर्वोच्च धर्मगुरू आयातुल्ला खामेनी यांनी घोषित केले होते. इराणच्या व्यवस्थेनुसार सर्वोच्च राजकीय अधिकार असलेल्या खामेनी यांनी ही घोषणा केल्यानंतर, अवघ्या काही तासात त्यावर इस्रायलची प्रतिक्रिया उमटली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन इराणबरोबर अणुकरार करण्याच्या तयारीत आहेत. मात्र बायडेन यांनी हा अणुकरार केला अथवा न केला, त्याने इस्रायलला काहीच फरक पडत नाही. कुठल्याही परिस्थितीत इस्रायल इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ देणार नाही, असा सज्जड इशारा इस्रयालचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी दिला.

गुरुवारच्या संध्याकाळपासून ज्यूधर्मियांचा ‘पुरिम’ सण सुरू होईल. या पार्श्‍वभूमीवर, आपल्या देशबांधवांना संबोधित करताना पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी अणुकराराच्या दिशेने पावले टाकणार्‍या अमेरिका आणि इराणला इशारा दिला. ‘इराणसारख्या दहशतवादी राजवटीसोबत केल्या जाणार्‍या कराराकडून इस्रायलला कुठल्याही अपेक्षा नाहीत. उत्तर कोरियाबरोबर केलेल्या करारांचे पुढे काय झाले, हे इस्रायलला पुरते ठाऊक आहे’, अशा शब्दात इस्रायलच्या पंतप्रधानांनी अमेरिकेवर टीका केली.

‘तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी इराणबरोबर अणुकरार केला काय अथवा न केला काय, यापैकी कुठल्याही परिस्थितीत इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखण्यासाठी इस्रायल काहीही करील’, असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी दिला. त्याचबरोबर पुरिमचे महत्त्व सांगताना इस्रायलच्या पंतप्रधानांनी इराणला इतिहासाची आठवण करून दिली.

‘अडीच हजार वर्षांपूर्वी पर्शियाच्या जुलमी राज्यकर्त्याने ज्यू नागरिकांची भीषण हत्याकांड घडविण्याचा प्रयत्न केला होता. पण तो असे करण्यात अपयशी ठरला. आज इराण देखील तेच करायच्या प्रयत्नात आहे. मात्र याला यश मिळू शकणार नाही. आम्ही आयातुल्लांच्या काराभाराला परवानगी देण्यासाठी हजारो वर्षांचा प्रवास करून इस्रायलमध्ये दाखल झालो नाही’, असे नेत्यान्याहू म्हणाले.

त्याआधी इस्रायलच्या पंतप्रधानांनी संरक्षणमंत्री बेनी गांत्झ, परराष्ट्रमंत्री गाबी अश्केनाझी, संरक्षणदलप्रमुख लेफ्टनंट जनरल अविव कोशावी, मोसाचे प्रमुख योसी कोहेन, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मिर बेन-शबात, अमेरिकेतील इस्रायलचे राजदूत गिलाड एर्डन आणि वरिष्ठ अधिकार्‍यांबरोबर विशेष बैठक घेतली. अमेरिका आणि इराणमध्ये अणुकराराबाबत सुरू असलेल्या गोपनीय चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर, ही बैठक पार पडल्याचा दावा केला जातो.

दरम्यान, गेल्या आठवड्यात अमेरिकेने अणुकरार करण्याची तयारी व्यक्त केल्यानंतर इराण अधिकच आक्रमक झाला आहे. अमेरिकेने आपल्या मागण्या मान्य कराव्या आणि निर्बंध पूर्ण मागे घेतल्याशिवाय चर्चा करणार नसल्याची ठाम भूमिका इराणने स्वीकारली आहे. त्याचबरोबर इराणने अणुऊर्जा आयोगाच्या निरिक्षकांच्या अणुप्रकल्पातील प्रवेशासाठी अटी जाहीर केल्या आहेत.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info