राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना संपविण्यासाठी रशियाच्या क्रेमलिनवर युक्रेनचा ड्रोन हल्ला

- रशियाचा गंभीर आरोप

मॉस्को/किव्ह – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना संपविण्यासाठी युक्रेनने ‘क्रेमलिन’वर ड्रोन हल्ला चढविला होता. पण आपल्या संरक्षणदलांनी हा हल्ला हाणून पडला, असा दावा करून रशियाने खळबळ माजविली आहे. हा हल्ला झाला त्यावेळी राष्ट्राध्यक्ष पुतिन क्रेमलिनमध्ये नव्हते, तसेच या हल्ल्यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी दिली. मात्र हा दहशतवादी हल्ला होता आणि त्याला रशियाकडून प्रत्युत्तर मिळाल्यावाचून राहणार नाही. कधीही आणि कुठेही रशिया या हल्ल्याला प्रत्युत्तर देईल, असे पेस्कोव्ह यांनी बजावले आहे. यामुळे गेल्या १४ महिन्यांपासून सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध आता अधिक संहारक बनणार असल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे.

पुतिन यांना संपविण्यासाठी

बुधवारी युक्रेनने क्रेमलिनवर ड्रोनद्वारे केलेला हल्ला रशियन राष्ट्राध्यक्षांना लक्ष्य करण्यासाठीच होता व हा दहशतवादी हल्ला ठरतो, असे घणाघाती आरोप रशियाच्या प्रवक्त्यांनी केले. युक्रेनने आपल्यावरील हे आरोप नाकारले आहेत. युक्रेनी राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार मिखाईलो पोदोल्याक यांनी या हल्ल्याशी युक्रेनचा काहीही संबंध नाही, असे म्हटले आहे. तर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी रशियाच्या आरोपांवर संशय व्यक्त केला आहे. आपला आरोप सर्वांनी जसाच्या तसा स्वीकारावा, अशी रशियाची अपेक्षा असल्याचा टोला अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी लगावला आहे.

युक्रेन तसेच युरोपिय देशांची माध्यमे देखील रशियाच्या या आरोपांवर शंका उपस्थित केली आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी आपला देश रशियावर प्रतिहल्ले चढविण्याची तयारी करीत असल्याचे दावे केले होते. अशा परिस्थितीत युक्रेनवरील हल्ले तीव्र करण्यासाठी रशियाने ड्रोन हल्ल्याच बहाणा पुढे केला आहे. याचा वापर करून रशिया युक्रेनच्या जनतेवर तसेच पायाभूत सुविधा प्रकल्पांवर हल्ले चढविल, अशी चिंता युक्रेनसह युरोपिय देशांमध्ये व्यक्त करण्यात येत आहे. हा हल्ला झाला तेव्हा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष पाच नॉर्डिक देशांशी चर्चा करण्यासाठी फिनलँडच्या दौऱ्यावर गेले होते. मॉस्कोमधील या हल्ल्यापूर्वी युक्रेनी राष्ट्राध्यक्षांनी पुढच्या काळात आपले रशियावर प्रतिहल्ले सुरू होतील, असे जाहीर करून टाकले होते. याचा दाखला रशियाकडून दिला जात आहे. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीवर रशियाने मिळविलेल्या विजयाचा ‘व्हिक्टरी डे’ ९ मे रोजी रशियात साजरा केला जाईल. मॉस्कोमध्ये होणारा याचा सोहळा बाधित करण्याची तयारी युक्रेनने केली आहे, असा आणखी एक आरोप रशियन प्रवक्त्यांनी केला आहे. मात्र काहीही झाले तरी रशियाची ही व्हिक्टरी परेड झाल्यावाचून राहणार नाही, असे रशियन प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले.

बुधवारच्या या ड्रोन हल्ल्यापूर्वी युक्रेनने रशियाच्या सेव्हेस्टीपोल शहरातील इंधनाच्या साठ्यांवर ड्रोन हल्ले चढविले होते. यात इंधनाचा भडका उडाला होता. तसेच रशियाच्या राजधानीपर्यंत आपण ड्रोन हल्ले चढवू शकतो, याची जाणीव युक्रेनने करून दिली होती. यावर रशियाने युक्रेनला भयंकर परिणामांचे इशारेही दिले होते. पण बुधवारच्या हल्ल्यानंतर रशियाने नेमक्या शब्दात युक्रेनला दिलेली धमकी साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेत आहे. लवकरच रशिया युक्रेनवरील हल्ल्यांची तीव्रता वाढविणार असून हे हल्ले युक्रेनची वाताहत करणारे असतील, असे संकेत मिळत आहेत.

Englishहिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info