अबुजा – नायजेरियाच्या वायव्येकडील झामफारा प्रांतात दहशतवाद्यांनी माध्यमिक शाळेवर केलेल्या हल्ल्यात ३०० हून अधिक विद्यार्थीनींचे अपहरण केले आहे. गेल्या दहा दिवसात या भागातून दुसर्यांदा एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थीनींचे अपहरण झाले आहे. विद्यार्थीनींच्या अपहरणासाठी बोको हराम या दहशतवादी संघटनेवर संशय व्यक्त केला जातो. दरम्यान, या घटनेच्या दोन दिवस आधी दहशतवाद्यांनी चढविलेल्या हल्ल्यात ३६ जणांचा बळी गेला होता.
झामफारा प्रांतातील जानेबे गावात मुलींसाठी स्वतंत्र माध्यमिक शाळा आहे. या शाळेत मुलींच्या शिक्षणाबरोबर राहण्याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. गुरुवारी मध्यरात्री दहशतवाद्यांनी या शाळेवर हल्ला केला त्यावेळी येथे तीनशेहून अधिक विद्यार्थीनींचा समावेश होता. स्थानिक प्रशासनाने दहशतवाद्यांनी किती विद्यार्थीनींचे अपहरण केले, याची माहिती दिली नाही. पण येथील शिक्षकाने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी बंदूकीच्या धाकावर ३०० हून अधिक मुलींचे मोठ्या ट्रक्स व मोटारीतून अपहरण केले.
या अपहरणाच्या आधी दहशतवाद्यांनी येथील लष्कराच्या सुरक्षा चौकीवर हल्ला चढविला. या हल्ल्यात नायजेरियन सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिकांनी सुरक्षा यंत्रणेच्या साथीने मुलींचा शोध सुरू केला आहे. आठवड्याभरापूर्वीच दहशतवाद्यांनी उत्तर नायजेरियातून अशाच प्रकारे एका शाळेवर हल्ला चढवून विद्यार्थीनींचे अपहरण केले होते. या दोन्ही अपहरणांची जबाबदारी कुठल्याही गटाने स्वीकारलेली नाही. पण या भागात सक्रीय असलेल्या बोको हराम या दहशतवादी संघटनेवर यासाठी संशय व्यक्त केला जातो. पैशासाठी बोको हरामचे हदशतवादी विद्यार्थी-विद्यार्थीनींचे अपहरण करतात.
याआधी डिसेंबर महिन्यात दहशतवाद्यांनी कात्सिना प्रांतातील कंकारा भागातून ३०० हून अधिक विद्यार्थ्यांचे अपहरण केले होते. बोको हरामचे दहशतवादी या विद्यार्थ्यांचा वापर ‘चाईल्ड सोल्जर’ म्हणून करू शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर याचे तीव्र पडसाद उमटले होते. पण काही दिवसांनी दहशतवाद्यांनी या विद्यार्थ्यांची सुटका केली होती.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून नायजेरिया आणि नायजर यांच्या सीमेजवळील प्रांतात बोको हरामच्या कारवायांचे सत्र वाढले आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |