इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ न देण्याच्या निर्णयावर इस्रायल ठाम – इस्रायलच्या पंतप्रधानांनी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांना सुनावले

इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ न देण्याच्या निर्णयावर इस्रायल ठाम – इस्रायलच्या पंतप्रधानांनी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांना सुनावले

वॉशिंग्टन/जेरूसलेम – इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांच्याशी फोनवर चर्चा केली. दोन्ही देशांकडून या चर्चेबाबत वेगवेगळे तपशील दिले जात आहेत. इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत अमेरिका इस्रायलबरोबर सहकार्य करीत असल्याचे उपराष्ट्राध्यक्षा हॅरिस यांच्या कार्यालयाने स्पष्ट केले. तर या चर्चेत कुठल्याही परिस्थितीत इस्रायल इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ देणार नाही, असे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी बजावल्याचे इस्रायलने म्हटले आहे.

‘इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट’ने (आयसीसी) दोन दिवसांपूर्वीच इस्रायलच्या विरोधात युद्धगुन्ह्यांची चौकशी करणार असल्याची घोषणा केली आहे. ‘आयसीसी’ची ही घोषणा राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा संताप इस्रायलने व्यक्त केला होता. या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष हॅरिस यांनी इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांना फोन केल्याचे अमेरिकेने प्रसिद्ध केले. यावेळी इराणचा अणुकार्यक्रम, इस्रायलमधील कोरोनाव्हायरस प्रतिबंधक लसीकरण आणि आयसीसीच्या घोषणेवर चर्चा पार पडली. पण या चर्चेबाबत हॅरिस यांच्या कार्यालयाने आणि इस्रायल सरकारने प्रसिद्ध केलेल्या माहितीत मोठी तफावत असल्याचे दिसत आहे.

इराणच्या आण्विक मुद्यावर अमेरिका आणि इस्रायलमधील सहकार्य यापुढेही सुरू राहिल. त्याचबरोबर या क्षेत्रातील इराणच्या धोकादायक हालचालींवरही चर्चा पार पडल्याचे उपराष्ट्राध्यक्षा हॅरिस यांच्या कार्यालयाने सांगितले. पण पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी या चर्चेत इराणबाबत अधिक कठोर भूमिका घेतल्याची माहिती इस्रायल सरकारने स्पष्ट केले. ‘इराण इस्रायलच्या विनाशासाठी अण्वस्त्रे विकसित करीत आहे. त्यामुळे काही झाले तरी इस्रायल इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ देणार नाही. यासाठी इस्रायल वचनबद्ध आहे’, असे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी फटकारल्याची माहिती इस्रायलने प्रसिद्ध केली.

याआधी फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी इस्रायली पंतप्रधानांशी फोनवरुन चर्चा केली होती. राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल तीन आठवड्यानंतर बायडेन यांनी इस्रायलच्या पंतप्रधानांना फोन केला होता. त्याचबरोबर अमेरिकेने इराणबरोबरचा २०१५ सालचा अणुकरार पुनर्जिवित करू नये, या इस्रायलच्या आवाहनालाही बायडेन प्रशासनाने प्रतिसाद दिलेला नाही. याशिवाय काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी जाहीर केलेल्या परराष्ट्र धोरणाच्या प्राधान्यक्रमात इस्रायलचा उल्लेख करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे अमेरिकेचे बायडेन प्रशासन एकेकाळचा अमेरिकेचा मित्रदेश असलेल्या इस्रायलला धक्का देण्याची भूमिका स्वीकारीत असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमांनी केला होता.

दरम्यान, काही तासांपूर्वीच इस्रायलने इराणच्या अणुकार्यक्रमांवरील हल्ल्याचा प्लॅन अपडेट करीत असल्याचा इशारा दिला. त्याचबरोबर इराणच्या धोक्याविरोधात अरब देशांबरोबर विशेष संरक्षण सहकार्य शक्य असल्याची घोषणा इस्रायलने केली. यानंतर अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष हॅरिस यांनी इस्रायली पंतप्रधानांना फोन केल्याचे दिसत आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info