प्योनग्यँग/टोकिओ – उत्तर कोरियाने गुरुवारी ‘सी ऑफ जपान’मध्ये दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. दोन्ही क्षेपणास्त्रांनी ४०० किलोमीटर्सहून अधिक टप्पा गाठल्याची माहिती जपानच्या संरक्षण विभागाने दिली. या चाचणीवर जपानकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. ‘उत्तर कोरियाच्या चाचणीने जपान व सभोवतालच्या क्षेत्रातील शांतता तसेच सुरक्षितता धोक्यात आली आहे’, असे जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी बजावले. अमेरिकेच्या पॅसिफिक कमांडनेही, सदर क्षेपणास्त्रे उत्तर कोरियाचा वाढता धोका दाखवून देणारी असल्याचे म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वीच उत्तर कोरियाने ‘शॉर्ट रेंज मिसाईल सिस्टिम’ची नवी चाचणी घेतल्याचे समोर आले होते. या चाचणीवर प्रतिक्रिया देताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी त्यात चिथावणीखोर काहीच नसल्याचे वक्तव्य केले होते. जपान व दक्षिण कोरियाच्या माध्यमांनी मात्र या चाचण्या नव्या व आक्रमक चाचण्यांच्या मालिकेची सुरुवात ठरु शकते, अशी भीती व्यक्त केली होती. ही भीती खरी ठरल्याचे गुरुवारी डागलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या घटनेने दाखवून दिले आहे.
गेल्या वर्षी उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जॉंग-उन यांनी मार्च महिन्यात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसह ‘टॅक्टिकल गायडेड वेपन्स’च्या चाचण्या घेतल्या होत्या. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात उत्तर कोरियाने लष्करी संचलनात नवे आंतरखंडीय क्षेपणास्त्र जगासमोर आणले होते. गेल्या काही महिन्यात उत्तर कोरियाने नव्या अण्वस्त्रांची तयारी सुरू केल्याचे अहवालही समोर आले होते. मात्र २०२१च्या मार्च महिन्यापर्यंत कोणत्याही नव्या क्षेपणास्त्राची चाचणी केली नव्हती.
बायडेन प्रशासनाने गेल्या महिन्याभरात जपान व दक्षिण कोरियाबरोबर चर्चा केली असून त्याचवेळी दक्षिण कोरियाबरोबर युद्धसरावही पार पडला आहे. याच काळात उत्तर कोरिया व चीनमधील सहकार्य अधिक मजबूत झाल्याची माहितीही समोर आली आहे. पाच दिवसांच्या अवधीत उत्तर कोरियाने एकापाठोपाठ केलेल्या क्षेपणास्त्रांच्या प्रदर्शनामागे ही पार्श्वभूमी आहे. रविवारी उत्तर कोरियाने केलेली चाचणी कमी पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्रांची होती. मात्र गुरुवारची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी संयुक्त राष्ट्रसंघटनेने टाकलेल्या निर्बंधांचा भंग करणारी ठरली आहे.
उत्तर कोरियाच्या राजवटीने गुरुवारच्या चाचण्यांबाबत कोणत्याही प्रकारची माहिती जाहीर केलेली नाही. मात्र गेल्याच आठवड्यात उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जॉंग-उन यांची बहीण किम यो जोंगने अमेरिकेला धमकावले होते, याकडे माध्यमांनी लक्ष वेधले आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |