अफगाणिस्तानातील उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे सांगून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची सैन्यमाघारीची घोषणा

अफगाणिस्तानातील उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे सांगून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची सैन्यमाघारीची घोषणा

वॉशिंग्टन/काबुल – ‘अफगाणिस्तानच्या एकजुटीसाठी अमेरिकेने या देशात आपले जवान तैनात केले नव्हते. ओसामा बिन लादेनला संपविणे आणि अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांची आश्रयस्थाने नष्ट करणे, या दोन उद्दिष्टांसाठी अमेरिकेच्या लष्कराने अफगाणिस्तानात पाऊल ठेवले होते. ही दोन्ही उद्दिष्ट गाठण्यात अमेरिका यशस्वी ठरली असून आता अफगाणिस्तानातील युद्ध कायमस्वरुपी संपवून आपल्या जवानांना घरी बोलविण्याची वेळ आली आहे’, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी केली. त्याचबरोबर अफगाणिस्तानात शांती प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तान, रशिया, चीन, भारत आणि तुर्कीने अधिक प्रयत्न करावे, असे आवाहन राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी केले आहे.

सैन्य माघार

२००१ साली झालेल्या ९/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानात दहशतवादविरोधी युद्ध पुकारले होते. गेल्या वीस वर्षांमध्ये या युद्धात अमेरिकेने ट्रिलियन्स डॉलर्स खर्च केले असून २४०० हून अधिक अमेरिकी जवानांचा यात बळी गेला आहे. यापुढे अफगाणिस्तानातील युद्ध पिढांपिढ्यांसाठी सुरू ठेवता येणार नाही, असे सांगून बायडेन यांनी आपल्या या निर्णयाचे समर्थन केले. १ मे पासून अमेरिकेची अफगाणिस्तानातील सैन्यमाघार सुरू होईल. ही सैन्यमाघार टप्प्याटप्प्याने केली जाईल. यात कुठल्याही प्रकारची घाई केली जाणार नाही. ११ सप्टेंबरआधी ही सैन्यमाघार पूर्ण होईल, असे बायडेन म्हणाले.

त्याचबरोबर अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांची आश्रयस्थाने नष्ट करण्यात अमेरिकेला यश मिळाले आहे. त्यामुळे यापुढे अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांनी अमेरिकेवर हल्ला चढविला तर त्यासाठी तालिबानला जबाबदार धरले जाईल, असा इशारा बायडेन यांनी दिला. याबाबत आपण अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश आणि बराक ओबामा यांच्याशी चर्चा केल्याची माहिती बायडेन यांनी दिली.

बायडेन यांच्या या घोषणेनंतर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी अफगाणिस्तानचा दौरा करून कार्यकारी प्रमुख डॉ. अब्दुल्ला अब्दुल्ला यांची भेट घेतली. अमेरिकेपाठोपाठ ब्रिटन, जर्मनी या नाटो सदस्य देशांनी देखील ११ सप्टेंबर रोजी अफगाणिस्तानातून सैन्यमाघारी घेतले जाईल, असे जाहीर केले. नाटोने देखील बायडेन यांच्या या घोषणेचे स्वागत केले. पण अमेरिकेच्या या सैन्यमाघारीच्या घोषणेवर चीनने चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या या सैन्यमाघारीचा दहशतवादी संघटना फायदा घेतील, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

दरम्यान, बायडेन यांनी अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीबाबत केलेल्या या घोषणेवर तालिबानने संताप व्यक्त केला आहे. अमेरिकेने १ मेच्या आधी अफगाणिस्तानातून पूर्ण माघार घ्यावी, अशी मागणी तालिबानने याआधी केली होती. पण बायडेन यांनी ही सैन्यमाघार सहा महिन्यांसाठी पुढे ढकलल्यानंतर तालिबानने तुर्कीत होणार्‍या शांतीचर्चेत सहभागी होण्यास नकार दिला आहे.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info