रशिया व युक्रेनमध्ये सेव्हेरोडोनेत्स्कसाठी संघर्ष अधिकच तीव्र झाला

मॉस्को/किव्ह – डोन्बासच्या ताब्यासाठी निर्णायक मानल्या जाणाऱ्या सेव्हेरोडोनेत्स्कसाठी रशिया व युक्रेनमधील संघर्ष अधिकच भडकला आहे. सेव्हेरोडोनेत्स्कमधील रस्त्यांसह छोट्या भागांमध्ये दोन्ही देशांच्या फौजा समोरसमोर उभ्या ठाकल्या असून प्रत्येक तासाला स्थिती बदलत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र रशियाच्या माऱ्यापुढे युक्रेनी लष्कराचा निभाव लागणे कठीण असल्याची कबुली स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली असून शहरातील मोठा भाग रशियाच्या ताब्यात गेल्याचेही स्पष्ट केले. हा संघर्ष सुरू असतानाच शहरात जवळपास 10 हजारांहून अधिक नागरिक अडकल्याची माहिती समोर आली आहे.

सेव्हेरोडोनेत्स्कसाठी

गेल्या काही दिवसात रशियाचे वरिष्ठ अधिकारी सातत्याने सेव्हेरोडोनेत्स्क व डोन्बासच्या ताब्याबाबत आक्रमक वक्तव्ये करीत असल्याचे समोर येत आहे. यामागे रशियन फौजांना या भागात मिळणारे यश कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते. रशियाने क्रिमिआ तसेच मारिपोलमधील तुकड्या डोन्बासमधील मोहिमेसाठी तैनात केल्या असून काही नवी पथकेही रवाना केल्याचे उघड झाले आहे. सेव्हेरोडोनेत्स्कची जबाबदारी दिलेल्या लष्करी अधिकाऱ्याला या आठवड्याच्या अखेरपर्यंत शहर ताब्यात घेण्यासाठी मुदत दिल्याचे वृत्तही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहे.

त्यामुळे रशियाने सर्व शक्ती पणाला लावली असून हल्ल्याची तीव्रता कमी होऊ दिलेली नाही. यापूर्वी काही भागांमध्ये रशियन फौजांना मागे लोटण्यात यश मिळविलेल्या युक्रेनी फौजांसाठी ही लढाई आवाक्याबाहेर जात असल्याचे समोर येऊ लागले आहे. त्यामुळे आता युक्रेनी अधिकारी माघारीसाठी नवनवी कारणे पुढे करु लागले आहेत. गुरुवारी युक्रेनच्या एका अधिकाऱ्याने परदेशातून योग्य वेळेत न मिळालेल्या शस्त्रांवर खापर फोडण्याचा प्रयत्न केला. पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला वेळेत दीर्घ पल्ल्याची शस्त्रे पुरविली असती तर दोन ते तीन दिवसात सेव्हेरोडोनेत्स्क युक्रेनच्या ताब्यात असते, असा दावा लुहान्स्कमधील गव्हर्नर सर्चिय हैदाई यांनी केला.

दरम्यान, डोन्बासवरील नियंत्रणासाठीची मोहीम अधिक आक्रमक व वेगवान करण्याचे संकेत रशियन फौजांनी दिले आहेत. त्यासाठी डोन्बासच्या शेजारी असलेल्या खार्किव्हमधील इझियम शहरातून रशियन तुकड्यांनी आगेकूच सुरू केली आहे. डोन्बासच्या सीमेबाहेरून या क्षेत्रातील भाग काबीज करण्याच्या उद्देशाने ही कारवाई सुरू करण्यात आल्याचे रशियन सूत्रांनी म्हटले आहे.

तसेच रशियाने युक्रेनमधील परदेशी शस्त्रसाठा तसेच परदेशी भाडोत्री जवानांच्या तळांना लक्ष्य करण्यासही सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसात परदेशी शस्त्रसाठा तसेच जवानांचे अनेक तळ उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली. रशियाच्या या नव्या मोहिमेमुळे युक्रेनवरील दबाव अधिकच वाढण्याची शक्यता आहे. सेव्हेरोडोनेत्स्कसाठी तीव्र संघर्ष सुरू असतानाच या शहरात जवळपास 10 हजारांहून अधिक नागरिक अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. या नागरिकांची सध्याच्या स्थितीत सुटका शक्य नसल्याचा खुलासा युक्रेनी अधिकाऱ्यांनी केला.

English     हिंदी

इस समाचार के प्रति अपने विचार एवं अभिप्राय व्यक्त करने के लिए नीचे क्लिक करें:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info