रशियाने ‘एन्गल्स-२’ हवाईतळावरील बॉम्बर्सची तैनाती वाढविली

- युक्रेनसह पाश्चिमात्य देशांकडून नव्या हल्ल्याची तयारी असल्याचे दावे

मॉस्को – रशियाने दक्षिण भागात असलेल्या साराटोव्ह प्रांतातील ‘एन्गल्स-२’ या हवाईतळावर नवी बॉम्बर्स विमाने तैनात केली आहेत. ही नवी तैनाती गेल्या काही दिवसांमध्ये झाल्याचा दावा युक्रेन व पाश्चिमात्य यंत्रणांनी केला. ही येत्या काही दिवसात युक्रेनवर मोठे हवाई तसेच क्षेपणास्त्र हल्ले चढविण्याची तयारी असल्याची भीतीही या यंत्रणांनी व्यक्त केली. पाश्चिमात्य देश ही भीती व्यक्त करीत असतानाच रशियाचे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू यांनी, रशियन संरक्षणदलांनी युक्रेनमध्ये अत्याधुनिक शस्त्रांचा वापर वाढवायला हवा, असे आवाहन केले आहे. दरम्यान, रशियाने खेर्सन शहरावर केलेल्या तीव्र हल्ल्यांमुळे या शहरातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाल्याची माहिती युक्रेनी अधिकाऱ्यांनी दिली.

‘एन्गल्स-२’

रशियाने ऑक्टोबर महिन्यापासून युक्रेनवर मोठ्या प्रमाणात हवाई व क्षेपणास्त्र हल्ल्यांना सुरुवात केली होती. यामुळे युक्रेनमधील वीजपुरवठा तसेच पाणीपुरवठा यंत्रणा मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाल्या आहेत. युक्रेनमधील एक कोटींहून अधिक नागरिकांना वीजटंचाई तसेच पाण्याची कमतरता यासारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. युक्रेनमध्ये कडक हिवाळा सुरू असल्याने या संकटांची तीव्रता अधिकच वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पाश्चिमात्य देशांनी युक्रेनमधील पायाभूत सुविधा तसेच सुरक्षेसाठी एकापाठोपाठ एक अर्थसहाय्याची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे.

‘एन्गल्स-२’

पाश्चिमात्य देशांच्या या वाढत्या हस्तक्षेपावर रशियाने यापूर्वीही घणाघाती टीका केली होती. ज्या प्रमाणात हस्तक्षेप वाढेल तितक्या तीव्रतेने रशिया प्रत्युत्तर देईल, असे रशियन नेत्यांनी बजावले होते. अशा स्थितीत ‘एन्गेल्स-२’ तळावर नव्या बॉम्बर्सची तैनाती लक्ष वेधून घेणारी ठरते. बॉम्बर्सबरोबरच क्रूझ क्षेपणास्त्रांचे मोठे क्रेट्स तसेच इतर यंत्रणाही मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आल्याचे सॅटेलाईट फोटोग्राफ्सवरून दिसून येत आहे. यापूर्वी रशियाने बेलारुस तसेच कॅलिनिनग्रॅड तळावरील तैनाती वाढविल्याचे वृत्त समोर आले होते.

‘एन्गल्स-२’

बॉम्बर्सची तैनाती वाढवितानाच रशियन फौजांनी डोन्बास व खेर्सनमध्येही प्रखर हल्ले केले आहेत. खेर्सनमधील हल्ल्यांनी या शहरातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाल्याचे सांगण्यात येते. त्याचवेळी डिनिप्रो नदीच्या दुसऱ्या बाजूला रशियन सैन्याने भक्कम लष्करी आघाडी तयार केल्याचेही दावे करण्यात येत आहेत. यामुळे पुढील काळात खेर्सनमधील युक्रेनी फौजांवरील हल्ल्यांचे प्रमाण अधिकच वाढेल, असे सूत्रांनी म्हटले आहे. डोन्बासमधील महत्त्वाचे शहर असलेल्या बाखमतच्या सीमेनजिक रशियन फौजा आल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली. शहराभोवतालचे दोन महत्त्वाचे भाग गेल्ाय २४ तासांमध्ये ताब्यात घेतल्याचेही संरक्षण विभागाने सांगितले.

युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर २०२३ सालासाठी रशियाच्या संरक्षणखर्चात मोठी वाढ करण्यात येईल, असे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू यांनी म्हटले आहे. संरक्षण विभागाच्या एका बैठकीत ही माहिती देताना, रशियन फौजांनी युक्रेनमध्ये अधिक प्रगत शस्त्रांचा वापर करायला हवा, असे आवाहनही संरक्षणमंत्री शोईगू यांनी केले आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info