काबुल – अफगाणिस्तानच्या हेल्मंड प्रांतात दहशतवाद्यांनी घडविलेल्या बॉम्बस्फोटात नऊ जणांचा बळी गेला. या हल्ल्याच्या काही तासांपूर्वीच अफगाणी लष्कराने हेल्मंडसह देशातील 16 प्रांतांमध्ये केलेल्या कारवाईत 176 तालिबानी दहशतवाद्यांना ठार केले होते. याखेरीज अल कायदाचा कमांडर मारला गेल्याची माहिती अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली. दरम्यान, दोहा येथील वाटाघाटी फिस्कटल्यानंतर अफगाणिस्तानातील तालिबानचे हल्ले वाढतील, असा इशारा अफगाणिस्तानातील अमेरिकेचे कमांडर जनरल स्कॉट मिलर यांनी दिला आहे.
गेल्या आठवड्यात अफगाण सरकार आणि तालिबानने तीन दिवसांच्या संघर्षबंदीची घोषणा केली होती. या काळात अफगाणिस्तानमध्ये कुठल्याही प्रकारचा हल्ला झाला नाही. तालिबानने यापुढेही अशीच संघर्षबंदी कायम ठेवावी, अशी मागणी अफगाण सरकारने केली होती. पण तालिबानने अफगाणिस्तानच्या गनी सरकारची ही मागणी धुडकावली. त्यानंतर अफगाणी लष्कराने तालिबान तसेच तालिबान संलग्न दहशतवादी संघटनांवरील कारवाई तीव्र केली आहे.
अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चोवीस तासात लष्कराने नांगरहार, मैदान वरदाक, गझनी, लोगार, खोस्त, झाबूल, कंदाहर, बदघीस, फराह, हेरात, बल्ख, कोंदूझ, हेल्मंड, बडाखशान, बघलान आणि राजधानी काबुलमध्ये तालिबानविरोधात कारवाई केली. यामध्ये 176 तालिबानी दहशतवाद्यांचा खातमा केला तर या संघर्षात तालिबानचे 112 जण जखमी झाले. तर त्याआधी मंगळवारी अफगाणी लष्कराने केलेल्या कारवाईत 251 तालिबानी ठार तर 193 जण जखमी झाल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे गेल्या दोन दिवसांमध्ये अफगाणी लष्कराने सव्वा चारशेहून अधिक तालिबान्यांना ठार केल्याची माहिती समोर येत आहे.
अफगाणी संरक्षण मंत्रालयाने आत्तापर्यंत केलेले दावे तालिबानने खोडून काढलेले नाहीत. त्यामुळे अफगाणी लष्कराच्या कारवाईत तालिबानला मोठी हानी सोसावी लागल्याचे दिसत आहे. यानंतरही तालिबानकडून अफगाणी जनता व लष्करावरील हल्ले सुरू आहेत. गुरुवारी हेल्मंड प्रांताच्या लश्कर गह भागात दहशतवाद्यांनी एका वाहनावर केलेल्या बॉम्बहल्ल्यात नऊ जणांचा बळी गेला. यामध्ये महिला आणि मुलांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.
या हल्ल्याची जबाबदारी कुठल्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. पण अफगाणी सुरक्षा यंत्रणा तालिबानवर संशय व्यक्त करीत आहेत. याशिवाय अफगाणी लष्कराने गुरुवारी दुपारी हेल्मंड प्रांतातच केलेल्या कारवाईत 11 दहशतवादी ठार झाले. यामध्ये अल कायदाचा वरिष्ठ कमांडर व त्याचे चार साथीदार आणि सहा तालिबानी दहशतवाद्यांचा देखील समावेश असल्याची माहिती अफगाणी संरक्षण मंत्रालयाने दिली.
तालिबानने अफगाण सरकारबरोबरच्या वाटाघाटीतून माघार घेतली आहे. कतार येथील चर्चेत सहभागी होऊ, मात्र राष्ट्राध्यक्ष गनी यांच्याबरोबर आघाडी सरकार स्थापन करणार नसल्याची भूमिका तालिबानने स्वीकारली आहे. त्याचबरोबर तालिबानने अफगाणी लष्कर, पोलीस, शासकीय कर्मचारी व महिलांवरील हल्ले वाढविल्याचा दावा स्थानिक माध्यमे करीत आहेत. अफगाणिस्तानातील अमेरिकेचे कमांडप्रमुख जनरल स्कॉट मिलर यांनी देखील येत्या काळात तालिबानचे हल्ले वाढू शकतात, अशी चिंता ब्रिटिश वृत्तवाहिनीकडे व्यक्त केली आहे.
दरम्यान, अफगाणिस्तानातील शांती व स्थैर्यासाठी पाकिस्तानने घोषणाबाजी करण्यापेक्षा कृती करून दाखवावी, असा टोला अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद हनीफ अत्मार यांनी लगावला. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्या शिष्टमंडळाने अफगाणिस्तानचा दौरा केला होता. त्यांच्या या भेटीवर परराष्ट्रमंत्री अत्मार यांनी हा शेरा मारला आहे.
हिंदीया बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |