ड्रोन्सच्या हल्ल्यात इराणच्या आण्विक प्रकल्पाचे नुकसान – इराणमधील सूत्रांच्या हवाल्याने इस्रायली माध्यमांचा दावा

जेरूसलेम – इराणच्या बुशेहर प्रकल्पाच्या इमर्जन्सी शटडाऊनचे कारण अद्याप उघड झालेले नसताना बुधवारी राजधानी तेहरान येथील आण्विक प्रकल्पावर ड्रोन्सचे हल्ले झाले. याआधी इराणच्या लष्कर आणि सरकारशी संलग्न माध्यमांनी प्रकल्पावरील ड्रोन हल्ल्याचा कट उधळल्याचा दावा केला होता. पण हे ड्रोन्सचे हल्ले यशस्वी ठरले असून यामध्ये प्रकल्पाचे मोठे नुकसान झाल्याचे इस्रायलच्या माध्यमांनी म्हटले आहे. इराणबरोबरचा अणुकरार नव्याने लागू करण्यासाठी बायडेन प्रशासनाने हालचाली तीव्र केल्या आहेत. अशा परिस्थितीत, इराणच्या अणुप्रकल्पांवरचे हे हल्ले म्हणजे इराणबरोबरच बायडेन प्रशासनाला इस्रायलने दिलेले इशारे असल्याचे संकेत मिळत आहेत.

अमेरिकेच्या न्यायविभागाने दोन दिवसांपूर्वी इराणमधील व इराणशी संलग्न असलेल्या सुमारे 36 वृत्तसंस्थांवर बंदी टाकली. यामध्ये इराणच्या सरकारी मुखपत्रापासून, वृत्तवाहिन्या, रिव्होल्युशनरी गार्ड्ससंबंधित संकेतस्थळे, रेडिओवाहिन्यांचा समावेश आहे. यामुळे इराणमधील घडामोडींचे तपशील समोर येण्यात अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत, इराणचे सरकार आणि सुरक्षा यंत्रणांनी बुधवारी सकाळी तेहरान येथील कराज प्रकल्पावरील घातपाती हल्ला उधळल्याचे जाहीर केले. इथे ड्रोनच्या सहाय्याने हल्ला चढविण्याचा प्रयत्न झाला, पण सुरक्षा यंत्रणांनी वेळीच कारवाई केल्याची माहिती इराणी यंत्रणांनी सोशल मीडियाद्वारे दिली.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/iran-nuclear-centrifuge-plant-damaged-to-in-drone-attack/