इराणच्या कराज प्रकल्पावरील घातपाताला इस्रायल जबाबदार – इराणच्या सरकारचा आरोप

कराज

तेहरान – ‘इराणचा अणुकार्यक्रम आपण रोखू शकतो व यासाठी पाश्‍चिमात्य देशांना इराणबरोबर चर्चा करण्याची आवश्यकता नाही, हे दाखवून देण्यासाठी इस्रायलने गेल्या महिन्यात कराज प्रकल्पावर हल्ला चढविला होता’, असा आरोप इराणच्या सरकारचे प्रवक्ते अली राबेई यांनी केला. मात्र या हल्ल्यात इराणचे विशेष नुकसान झाले नव्हते, असे राबेई पुढे म्हणाले. त्यांच्या या दाव्याला छेद देणारी माहिती इस्रायली माध्यमांनी दिली असून कराजवरील हल्ल्यात इराणी प्रकल्पाचे मोठे नुकसान झाल्याचा दावा केला आहे. दरम्यान, सोमवारी कराज येथील एका गोदामात चमत्कारिकरित्या आगीने पेट घेतला. यात सदर गोदामाचे मोठे नुकसान झाले. इराणमध्ये याआधी झालेल्या स्फोटांप्रमाणे या घटनेकडे संशयाने पाहिले जात आहे.

गेल्या महिन्यात इराणची राजधानी तेहरानजवळ असणार्‍या कराज शहरातील आण्विक प्रकल्पावर ड्रोन्सचे हल्ले झाले होते. कराज प्रकल्पावर एक नाही तर ड्रोन्सच्या स्वार्म्सनी हल्ले चढविल्याची माहिती इराणमधील सूत्रांनी दिल्याचे इस्रायली माध्यमांनी म्हटले होते. तसेच या हल्ल्यात कराज प्रकल्पाचे मोठे नुकसान झाल्याचा दावाही या सूत्रांनी केला. या हल्ल्यामुळे इराणला हा प्रकल्प बंद ठेवावा लागला होता.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/iran-karaj-project-damage/